जर्मनीत विद्यापीठातील प्रवेशासाठी आवश्यक गोष्टी

Education
Education

परदेशात शिकताना - दिलीप ओक, परदेशी शिक्षणविषयक मार्गदर्शक
बॅचलर्स कोर्सेस -
जर्मनीमध्ये कुठल्याही उच्चशिक्षणाशी संबंधित कॉलेज किंवा विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी जर्मन विद्यार्थ्यांना General Higher Education Entrance Qualification म्हणजेच Abitur (आबिटुअर) ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. ही परीक्षा १२/१३ वर्षे शालेय शिक्षण झाल्यावर देता येते. भारतीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या देशात दिलेली उच्च माध्यमिक परीक्षा (बारावी) ग्राह्य धरली जाते. ज्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या उच्च माध्यमिक परीक्षेला जर्मन विद्यापीठांमध्ये मान्यता नसते, त्यांना १ वर्ष प्रीपॅरोटरी कोर्स करावा लागतो आणि त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण झाल्यास विद्यापीठात प्रवेश मिळतो. काही कॉलेजेसमध्ये विशेषतः क्रीडा आणि कलेशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी एक प्रवेशपरीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत विद्यार्थ्याची संबंधित अभ्यासक्रमातील गती आणि कल तपासला जातो. जर्मनीतील बहुतांश बॅचलर्स कोर्सेस हे जर्मन माध्यमातून शिकविले जात असल्याने जर्मन भाषेचे शिक्षण घेणे आवश्यक असते. 

मास्टर्स कोर्सेस -
जर्मनीमध्ये इंटरनॅशनल कोर्समध्ये मास्टर्स करण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात मिळालेली बॅचलर्सची पदवी, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी TOEFL किंवा IELTS या आंतरराष्ट्रीय परीक्षांमधील गुण (सर्वसाधारणपणे टोफेल परीक्षेत कमीत कमी ८५-९० गुण तर IELTS परीक्षेमध्ये कमीत कमी ६.५ बँड स्कोअर लागतो.) जर्मन भाषेचे किमान ए१ ते बी१ या पातळ्यांचे प्रमाणपत्र (काही विद्यापीठात इंग्रजी माध्यमातील कोर्सेससाठी ही अट नसते; परंतु जर्मनीमध्ये केवळ जर्मनभाषेमध्येच व्यवहार होत असल्याने तेथे यशस्वीरीत्या वास्तव्य करण्यासाठी आणि शिक्षण चालू असताना आणि नंतरही नोकरी मिळविण्यासाठी जर्मन भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.); तर काही विद्यापीठांत विशेषतः इंजिनिअरिंग क्षेत्रातील कोर्सेससाठी ‘जीआरई’साठी या प्रवेशपरीक्षेतील गुणही लागतात. एमबीएसारख्या कोर्सेससाठी ‘जीमॅट’ ही परीक्षा द्यावी लागते. प्रत्येक विद्यापीठाचे प्रवेशासंबंधीचे नियम किंवा पात्रतेच्या अटी काही प्रमाणात वेगवेगळ्या असल्याने आपल्याला हवा असलेला कोर्स आणि विद्यापीठ याविषयी सखोल माहिती घेणे आवश्यक असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जर्मन विद्यापीठात प्रवेश मिळविताना विद्यार्थ्यांचे बॅचलर्स परीक्षेमधील गुण आणि पदवीच्या सर्व वर्षांचे सरासरी गुण अत्यंत महत्त्वाचे ठरतात. इंजिनिअरिंग क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कोर्सेसना प्रवेश मिळविताना प्रामुख्याने गुणांचा निकष लावला जात असल्याने पदवी परीक्षेत उत्तम गुण असणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com