फ्रोजन शोल्डर व अत्याधुनिक उपचार

frozen-shoulder
frozen-shoulder

आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, त्वचारोगतज्ज्ञ
फ्रोजन शोल्डर हा खांद्याच्या विकारांमधील सर्वसामान्य आजार आहे. त्याला शास्त्रीय भाषेत ‘ॲडेसिव्ह कॅपस्युलायटीस’ असेही म्हणतात. खांद्याच्या सांध्यामध्ये होणाऱ्या तीव्र स्वरूपाच्या वेदना, खांदा कडक होणे, जखडणे, खांद्याच्या हालचालीस मर्यादा येणे या स्वरूपाची लक्षणे यामध्ये आढळतात. ही लक्षणे हळूहळू वाढत जातात. सामान्यतः या वाढीचे तीन टप्पे आढळतात. 

१. फ्रीजिंग स्टेज : या स्थितीमध्ये खांद्याच्या कोणत्याही हालचालीमुळे खांद्यामध्ये वेदना निर्माण होतात. खांद्याच्या हालचालीस मर्यादा पडतात. 
२. फ्रोजन स्टेज : या स्थितीमध्ये खांद्यामध्ये सुरू झालेल्या वेदना कमी असतात. परंतु खांदा अधिक कडक होतो, जखडतो. खांद्याचा वापर करणे, हालचाल करणे अधिक कठीण होते. 
३. थ्वॉईंग स्टेज : या स्थितीमध्ये खांद्याच्या हालचालीत सुधारणा होते. अनेकवेळा काही लोकांमध्ये खांद्यामधील हे दुखणे इतके तीव्र स्वरूपाचे असते की रात्री रुग्ण झोपेतूनही उठतात अथवा खांदेदुखीमुळे ते झोपू शकत नाहीत. 

फ्रोजन शोल्डरची कारणे -
खांद्याच्या सांध्यामधील हाडे, बंध, टेन्डान या रचनांवर असलेले कॅप्सुलचे आवरण जाड  झाल्यावर खांद्याच्या हालचालीस अवरोध निर्माण होतो. चाळीसपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीमध्ये, मधुमेहाचा त्रास असणाऱ्या, अधिककाळ सांध्याची हालचाल नसेल अथवा हाताच्या फ्रॅक्‍चरमध्ये खांद्याच्या सांध्याची हालचाल होत नसेल, अशा व्यक्तीमध्ये याचे प्रमाण अधिक असते. खांद्यातील रोटेटर कफ टियर, मेंदूमध्ये होणारा पक्षाघात (स्ट्रोक) किंवा हातांच्या शस्त्रक्रियेनंतर खांद्याच्या हालचाली होत नसतील, तर हा आजार आढळतो. अनेक वेळा मधुमेह, थायरॉईड ग्रंथीतील हार्मोनमधील वृद्धी/कमतरता (हायथॉइरॉईड/हायपरथॉयराईड), हृदयांचे विकार, टीबी किंवा पार्किन्सन आजारांमुळेही फ्रोजन शोल्डर हा आजार होतो. या आजाराचे निदान डॉक्‍टर काही तपासणी करून, काहीवेळा भुलीचे इंजेक्‍शन देऊन तपासणी करून तसेच क्ष-किरण (एक्‍स-रे) व एमआरआयद्वारे करतात. 

फ्रोजन शोल्डरवरील उपचार -
वेदनाशामक औषधे, खांद्यामध्ये काही इंजेक्‍शने देऊन सूज कमी करणे व वेदना कमी करून काही रुग्णांमध्ये या हालचाली सुरू करण्यास मदत होते. विशिष्ट प्रकारच्या शास्त्रीय व्यायामाचाही (फिजिओथेरपी) सुरवातीस उपयोग होतो. ‘जॉइंट डिस्टेशन’ या उपचारामध्ये सांध्यामध्ये ‘स्टराईल वॉटर’चे इंजेक्‍शन देतात. त्यामुळे हा सांधा हलका होण्यास, हालचाल करण्यात सुलभता आणण्यास मदत होते. ‘शोल्डर मॅन्युपुलेशन’ या उपचारात रुग्णाला भूल देऊन, खांदा वेगवेगळ्या दिशेत फिरवून, हालवून तो हलका मोकळा करण्याचा प्रयत्न करतात. दुर्बिणीद्वारे खांद्यावरील शस्त्रक्रिया : एका छोट्या छिद्रातून कॅमेरा असलेल्या छोट्या नळीद्वारे खांद्याच्या रचनांचे परीक्षण केले जाते. खराब झालेला भाग, खांद्याच्या रचनेत चिकटलेल्या रचना या दुसऱ्या छोट्या छिद्रातून उपकरणे खालून सोडवतात. यांचाही वेदना कमी होणे व हालचाली सुलभ होण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com