आरशात स्वतःकडे ‘नीट’ पाहा (डॉ. राजीव शारंगपाणी )

सोमवार, 15 एप्रिल 2019

शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "ऑल इज वेल" पुरवणीत..."

हेल्थ वर्क
व्यायाम कसा करावा?
आपल्याला अचानक उपरती होते, ‘आपलं वजन बेसुमार वाढले आहे, आणि काहीतरी करायला हवे!’ किंवा ‘एकंदरीतच तब्येत बरोबर वाटत नाही. काहीतरी व्यायाम करायला हवा!’ आता ‘काहीतरी’ करण्याआधी आपले शरीर कुठल्या पातळीपर्यंत पोचले आहे, याची कुणीच दखल घेत नाही. मग काहीतरी सल्ले मिळतात. कुणी सूर्यनमस्कार घालायला लागते. कुणी चालायला लागते, कुणी बॅडमिंटन खेळतात, तर कुणी आसने घालतात, कुणी धावण्यास, दोरीवरच्या उड्या मारण्यास, जोर-बैठका काढण्यास सुरवात करतात. आणखी कुणी ॲरोबिक्‍स करतात, वजन उचलतात, पोहतात. काय वाट्टेल ते करतात. त्यातही पहिल्या दिवशी नको इतके थकतात आणि घसरगुंडीला सुरवात होते. काय करायला गेलो आणि काय झाले असे होते!

यासाठी, आपल्या शरीराकडे ‘नीट’ पाहणे आवश्‍यक आहे. आरशासमोर जन्मसिद्ध अवस्थेत उभे राहून स्वतःला ‘नीट’ पाहा. पोट सुटलेय, छातीत पोक आले आहे, पाय फेंगडे झालेत, खांदे ओघळले आहेत, पृष्ठभागाची गोलाई जाऊन चपटेपणा आला आहे. हातापायाच्या काड्या झाल्या आहेत. खांदे स्नायूहीन दिसताहेत. यापैकी आपल्या शरीरात कायकाय आहे? किती गोष्टी कामातून गेल्यासारख्या दिसताहेत ते पाहा. त्यानंतरची पुढची पायरी. पुढे वाकून गुडघे न वाकवता जमिनीला स्पर्श करात येतो का? पाय किती फाकवता येतात? मान पुढे वाकवून हनुवटी छातीला टेकते का? मान मागे किती वाकवता येते? मान दोन्ही बाजूला, हनुवटी खांद्याला लागेपर्यंत वळवता येते का? यापैकी किती गोष्टी करता येत नाहीत ते पाहा.

(उद्याच्या अंकात - आता करा व्यायामाला सुरवात)