#MokaleVha : मानसिक स्वास्थासाठी संगीतोपचार!

Music
Music

तानसेनने गाणे म्हटले आणि दिवे पेटले किंवा पाऊस पडू लागला, या कथा आपण पूर्वापार ऐकत आलो आहोत. सुरांमध्ये अशी प्रचंड ऊर्जा असते. ही ऊर्जा मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी वापरणे म्हणजेच संगीतोपचार. संगीतोपचाराची एक विशिष्ट शास्त्रीय पद्धत असते. रस्त्यावरून चाललेला बँड ऐकणे, रेडिओवर चोवीस तास चालू असलेली गाणी ऐकणे म्हणजे संगीतोपचार नव्हे. चांगले गाणे ऐकून मनाला छान वाटते म्हणजे संगीतोपचार नव्हे. अमुक एक रोग आणि त्यासाठी अमुक एक राग हा देखील संगीतोपचार नव्हे. संगीतोपचार म्हणजे नेमके काय, हे समजण्यासाठी काही शास्त्रीय सत्यांची सर्वप्रथम ओळख करून घेऊ.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेक रोग शारीरिक असले तरी त्यांचे मूळ मनात असते. अशा रोगांना मनोकायिक आजार म्हणतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, वंध्यत्व अशी अनेक उदाहरणे देता येतील. संगीतोपचार हा प्रामुख्याने अशा रोगांवर वापरता येतो. हर्नियासारख्या शुद्ध शारीरिक रोगांवर आपण संगीतोपचार करायला गेलो, तर ते योग्य ठरणार नाही. तसेच, आधुनिक वैद्यकीय उपचारांना जोड अथवा पूरक म्हणूनच संगीतोपचार देता येतात. संगीतोपचार हे मुख्य उपचार होऊ शकत नाहीत.

संगीतोपचार कसे काम करते? 
त्याला वैज्ञानिक पाया काय आहे?

आपल्या शरीरात सायको-न्युरो-इम्यूनो ॲक्सिस (PNI) नावाचे चक्र चालू असते. शरीरातील प्रतिकारशक्ती, मज्जासंस्था आणि मनोव्यापार एका चक्रात गुंतलेले असतात. हे चक्र सुलट दिशेने फिरत असते, तेव्हा प्रकृती चांगली असते. हेच चक्र उलट फिरू लागले की प्रकृती ढासळते. संगीतोपचार वापरून हे चक्र हवे तसे भेदता येते आणि प्रकृती सुधारता येते. मानवाच्या शरीरात अब्जावधी पेशी असतात. प्रत्येक पेशीला एक आवरण असते. या आवरणातच पेशीचे मन असते, असे आता मानले जाते. पूर्वी पेशीचे मन हे केंद्रकात आहे, असे मानले जायचे. या आवरणावरती अँटीना असतात. त्या संगीत लहरी ग्रहण करू शकतात. कानाने मेंदूपर्यंत पोहोचविले जाणारे संगीत आणि यात फरक आहे. मंत्रोच्चारणासारख्या ध्वनी लहरीचा या मार्गाने संगीतोपचारात उपयोग करता येतो.

आपले अप्रकट मन अत्यंत प्रभावी असते. पॉवर ऑफ सजेशन (सूचना तंत्र) तसेच गायडेड इमेजनरी या मार्गांनी ही शक्ती उपयोगात आणलेली आपण अनेक ऑलिंपिक खेळाडूंमध्ये किंवा संमोहनशास्त्रामध्ये पाहिलेले असते. संगीतोपचार देताना याचा अभ्यास करून अतिशय छान परिणाम साधता येतात. भौतिकशास्त्रात जशी चुंबकीय, विद्युत चुंबकीय, अशी क्षेत्रे असतात; तशी शरीराभोवती एक बायो फिल्ड (जैविक प्रतिभा) असते, असे मानले जाते. संगीताचा वापर करून या प्रतिभेत अनुकूल बदल घडवून आणता येतात. आपल्या योगशास्त्रात जी सात चक्रे मानली जातात; त्यांच्यावर स्वरांच्या शक्तीने प्रभाव टाकता येतो.

रागातले वादी, संवादी स्वर यांचा विचार यात करावा लागतो. इतकेच नव्हे तर कुठल्या अवयवासाठी कुठले वाद्य वापरायचे, याचा देखील काळजीपूर्वक विचार केला जातो. संगीतोपचार म्हणजे नुसते समोर बसून अथवा इयरफोनने संगीत ऐकणे नव्हे. प्रत्येक रुग्णाचा वैद्यकीय केसपेपर केला जातो, तसा सांगीतिक केसपेपर करावा लागतो. रुग्णाची आवडनिवड, संस्कृती, संगोपनानुसार तो बदलत जातो. प्रत्येकाला ऋतुमान, दिवसाचा प्रहर, रुग्णाचा कल, यानुसार वेगळे उपचार करावे लागतात. नुसत्या श्रवणासोबत संगीतनिर्मिती, ओंकार, श्वसनक्रिया, मुद्रा, बैठक, वेद, उपनिषदे यातील ऋचा उच्चारण आदींचा यथायोग्य वापर करून ‘प्रारूप’ बनवावे लागते. काही माहिती तंत्रज्ञानाचा व प्रणालीचा वापर करून हे प्रारूप जास्तीत जास्त प्रभावीपणे अमलात आणता येते.

संगीतोपचारातील ही प्रगती केवळ आजारी व्यक्तीसाठीच वापरता येते असे नाही, तर विद्यार्थ्यांची प्रगती, सर्वसाधारण माणसांची व्यक्तिगत प्रगती, यासाठी देखील प्रभावीपणे वापरता येते, हे सिद्ध झाले आहे. आधुनिक विज्ञान आणि अत्यंत प्रगत असे आपले शास्त्रीय संगीत यांच्या मिलाफातून मानवाच्या कल्याणाची ही मैफील निश्चितपणे रंगवता येईल, यात काही शंका नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com