एमबीए करताना घ्या खबरदारी...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर
एमबीए कोणी व कधी करावे याविषयी किमान माहिती आपण घेतली. कुठे करावे, संस्था कशी निवडावी व त्यासाठीचा नेमका प्रयत्न करणे का आवश्‍यक आहे यावर आज थोडेसे. एमबीए संस्थेची निवड करणे तसे कधीच सोपे नव्हते व आजही नाही, ही बाब प्रथम लक्षात घ्यावी. याला मी सध्याच्या लग्नाच्या जोडीदार शोधण्याची उपमा देतो. खूप हुशार, खूप पैसेवाला, खूप देखणा, खूप मोठ्या घरचा असला तरी त्याची कुवत व प्रगती पाहूनच चाणाक्ष सासरा किंवा हल्लीच्या चाणाक्ष मुली जसे नापसंतीचे, नकाराचे निर्णय घेतात, तसेच निर्णय साऱ्या उत्तम संस्था घेत असतात. ज्यांना आपण टॉप पन्नास संस्था म्हणतो वा त्यांचे रेटिंग दरवर्षी विविध बिझनेस नियतकालिकात नियमित येत असते त्या विद्यार्थी निवडत असतात, निव्वळ मार्कांवर नसून, त्यांच्या शैक्षणिक आलेखावर त्यांचे मायक्रोस्कोपिक लक्ष असते. सातत्य, प्रगती, वैविध्य, अशैक्षणिक स्पर्धांतील सहभाग व त्यातील यश या साऱ्यांच्या जोडीला गटचर्चेतील निरीक्षकांचा अहवाल महत्त्वाचा ठरत असतो. 

ही सारी प्रक्रिया इतकी जटिल असते की, ‘कॅट’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेत ९९.९९ परसेंटाईल मिळवलेला विद्यार्थीसुद्धा प्रख्यात एबीसीएल या चारांकडून नाकारला जाऊ शकतो.  

अशाच संस्थांतून पास झालेल्यांचे कोटीच्या कोटी रुपयांच्या पॅकेजच्या कथा पाठ करून आपण सारेच एमबीएचे वारकरी बनायला जातो. अर्थातच नामांकित संस्थेकरता एखाद्या पदवीनंतर दोन ते तीन वर्षे कामाचा, नोकरीचा अनुभव घेत प्रवेशपरीक्षेची तयारी करणे किंवा पुन्हा पुन्हा देऊन त्यातील स्वतःचे परसेंटाईल ९० च्या पुढे नेण्याचा प्रयत्न करणे हे अनेकदा गरजेचे ठरते. 

दुर्दैवाने या साऱ्याचे भान सरसकट सुटते. शिकण्याची व मोठे होण्याची व साहेब बनण्याची घाई होते. पालकसुद्धा मुलांच्या धरसोडीला कंटाळतात. त्यांना मुलांच्या अभ्यासाच्या मागचा फोलपणाही अनेकदा जाणवत असतो. अशावेळी मिळेल ती संस्था, मिळेल ते गाव घेऊन एमबीएची सुरवात होते, ना कॅम्पस सिलेक्‍शन होऊन नोकरी मिळते, ना पॅकेज हमी येते. अशा अनेकांकडे इंडस्ट्रीसाठी एक वेगळ्याच दृष्टीने गेले दशकभर पाहिले जाते. ट्रेनी मॅनेजरऐवजी या एमबीए पदवीधरांना इंडस्ट्रीत सुपरक्‍लार्क हे नाव पडले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr shriram git edu supplement sakal pune today