Career
Career

वास्तवाची जाणीव

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
अपेक्षा व वास्तवाच्या लपंडावाबद्दल आपण सध्या माहिती घेत आहोत. इयत्ता नववीला सुरवात केली असली, तरी थेट पदव्युत्तरपर्यंतचा हा लपंडाव कोणाचीही पाठ सोडत नसतो, त्याचा विचार संपेपर्यंत आपण सर्वच क्षेत्रांतील करिअर्सबद्दलचा लपंडाव पाहणार आहोत हे नक्की. 

सायन्सच्या इयत्ता बारावीनंतरच्या अपेक्षा असतात त्या मुख्यतः आयआयटी, ‘नीट’, एनडीएच्या प्रवेशपरीक्षांवर केंद्रित झालेल्या. हे तीन इतके भरभक्कम चिरेबंद बुरूज आहेत, की त्यांच्यावर धडका देणाऱ्या लाखोंना दरवर्षी फक्त आणि फक्त कपाळमोक्षच मिळतो. तरीही पुढच्या वर्षी अशीच आंधळी चढाई करणारे तितकेच लाख पुढच्या वर्षी पुन्हा सज्ज होतात. यातील बहुतेकांचे अगदी पाठ केल्याप्रमाणे वाक्‍य दरवर्षी ऐकायला मिळते. 

‘म्हणजे आम्ही प्रयत्नसुद्धा करायचे नाहीत काय? निदान त्यानिमित्त मुलांचा अभ्यास तरी होईल ना?’ 

अपेक्षा व वास्तव अगदी साध्यासोप्या भाषेत सांगायचे झाल्यास शालेय गॅदरींगमध्ये चारशे मीटरची स्पर्धा एकदा जिंकली म्हणून यंदाच्या मॅरेथॉनला भाग घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न ठरू शकतो. त्यानिमित्त पळण्याचा सरावही होत नाही, ना प्रयत्न (म्हणजे जेमतेम दोन-तीन किलोमीटर पळून धापा टाकत घरी परत येणे व पाय चेपून घेणे तेही आईकडून) केल्याचे समाधान मिळते. 

मग या तीनही परीक्षा देण्यासाठीचे वास्तव तसे समजून घेणे नक्की शक्‍य असते. इयत्ता पाचवी ते बारावी स्वयंशिस्तीने व अभ्यासाची गोडी लागून सतत संपूर्ण शाळेमध्ये पहिल्या पाच-सहामध्ये येणारा विद्यार्थी क्‍लासच्या मदतीने परीक्षेचे टेक्‍निक शिकत असतो. क्‍लासमध्ये शिकून परीक्षा देणारा फारच क्वचित यशस्वी होतो, हे कालातीत सत्य कृपया समजून घ्यावे. 

एनडीएसाठी यातच भर घालायची तर तो विद्यार्थी अक्षरशः ऑलराउंडरच असतो. खेळ, वक्तृत्व, टीमवर्क, फिटनेस व अभ्यास यांचा सुरेख मेळ नसेल तर इथे निवड अशक्‍यच. याउलट घडते ते अत्यंत दुर्दैवी असते. जेमतेम ७५-८० टक्के गुण इयत्ता दहावीला पडणाऱ्यांपासून अगदी ९५ टक्के मिळवणाऱ्यांपर्यंत सारेच या बुरुजांवर चढाईला निघतात. आकडे काय सांगतात? आयआयटीमधल्या जागा आहेत जेमतेम बारा हजार, तर राज्यातील मेडिकलच्या जागा सहा हजार. एनडीएमध्ये तर हा आकडा आहे फक्त ३६०. मात्र, निव्वळ महाराष्ट्रातील ज्युनिअर कॉलेजांची संख्याच भरते सहा हजारांच्या आसपास. प्रत्येक कॉलेजमधील पहिल्या येणाऱ्यांची संख्याच जागांपेक्षा जास्त, हे आहे वास्तव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com