स्पर्धेची तयारी...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
अनेक करिअर्ससंदर्भात अपेक्षांचे ओझे व प्रत्यक्ष वास्तवाची वाटचाल याची एक चुणूक पाहिली. मात्र वास्तवाची वाटचाल करताना आपल्यापैकी प्रत्येकालाच कोणाशीतरी स्पर्धा करावीच लागते. शिक्षण, नोकरी, प्रगती, प्रमोशन यादरम्यान स्पर्धेला तोंड दिल्याशिवाय करिअर नावाचा शब्दच सुरू होत नाही. इथे स्पर्धक कोण, स्पर्धा किती तीव्र व त्याचवेळी स्पर्धकाचे गुणदोष कोणते याची किमान माहिती असेल तर निदान तशी शारीरिक, मानसिक, भावनिक तयारी करण्याचा अंदाज येऊ शकतो. 

एक-दोन छोट्या उदाहरणातून हे नीट स्पष्ट होऊ शकेल. शंभर मीटर रेसमध्ये माझ्या शेजारी उसेन बोल्ट असेल तर पहिल्या क्रमांक अशक्‍य हे सहज कळते. याउलट सेरेना विल्यम्सचे वय व तिची दमछाक याचा अंदाज घेऊन १९ वर्षीय बियांका आंद्रेस्कू यंदाची अमेरिकन ओपन ग्रॅंडस्लम जिंकली. हे झाले अतितीव्र स्पर्धेचे उदाहरण. 

मला संगीतात, त्यातही वाद्यवादनात करिअर करायची आहे, असे वाटणाऱ्या एखाद्या मुलासंदर्भात हीच स्पर्धा कशी असेल? गिटार किंवा सिंथेसायझरवर प्रभुत्व हजारोंचे असते. अनेकांच्या घरी दोन्ही वाद्ये असतात. याउलट ड्रॅम्स मशीन घरी घेणे परवडत नाही. बोंगो वाजवणे व ड्रम मशिनवर प्रभुत्व यात पुन्हा स्पर्धा कमी झाली. व्हायोलीन शिकून उत्तम जमणे यालाही काही वर्षे द्यावी लागणारच. याउलट मेंडोलिनचा विचार केला तर? सहज विचार करा पेटी, तबला, बासरी, व्हायोलिन, सतारवादकांची सहज डझनभर नावे आठवतात. मात्र मेंडोलिनसाठी फक्त यू. श्रीनिवासनच आठवतात. तीच गोष्ट क्‍लॅरिओनेटची. आता कोणी म्हणेल माझी आवड महत्त्वाची, मग स्पर्धेला तोंड देण्याची तयारी करणे गरजेचे असेल ना? 
मागच्याच आठवड्यात ‘ॲक्युरिअल सायन्स’मधील करिअरबद्दल आपण माहिती घेतली. त्यात स्पर्धा खूप कमी मात्र अभ्यासाची, तल्लख बुद्धिमत्तेची गरज खूप असणार. तेव्हा प्रत्येक करिअरसंदर्भात अशी स्पर्धा कोणाशी हे जर समजून घेतले तर रस्ता स्पष्ट दिसू लागतो. अडथळे व धोक्‍याचे टप्पे लक्षात येऊ लागतात. खरे तर हे प्रत्येक शाखेत, प्रत्येक पदवीच्या दरम्यान किंवा सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांसंदर्भात लागू असते. मात्र जेव्हा कधी आलेले यश हिसकावून घेतो त्यावेळचे भरकटलेले मन पुन्हा ताळ्यावर येण्यासाठी त्या वेळच्या स्पर्धेचा शांत चित्ताने ताळेबंद मांडावा लागतो. म्हणूनच हेच सारे एका वाक्‍यात सांगायचे तर? You must understand, with whom you are competing with येत्या काही लेखात अशा स्पर्धेविषयी व स्पर्धांबद्दल पाहूयात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr shriram git edu supplement sakal pune today