गवगवा ‘कॅट’चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
मी आजवर एक गंमत नेहमीच पाहत वा ऐकत आलो आहे. ज्या ज्या वेळी ‘एमबीए’ करण्याबद्दलचा विचार मनात आलेले विद्यार्थी त्यांचे पालक एवढेच काय विविध कॉलेज वा विद्यापीठातील प्राध्यापक भेटतात त्या वेळी अत्यंत नियमाने सुरुवात होत असते, ती कॅटच्या परीक्षेच्या उल्लेखाने.

कॉमन ॲडमिशन टेस्ट या नावाने घेतली जाणारी ही परीक्षा दिल्याशिवाय भारतातील सर्वोत्तम अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थांमध्ये ‘एमबीए’ला प्रवेश मिळत नाही अशी सर्वसाधारण माहिती घेऊन ही सारी मंडळी बोलत असतात. अर्थातच परीक्षा द्यायची तर क्‍लास लावायला लागतो व तो लावला की सारे कसे सुरळीत होऊन जाते हा एक अखिल भारतीय भ्रम इथेच सुरू होतो. 

सर्वच प्रमुख भारतीय शहरात कॅटसाठीचे क्‍लास आहेत. रुपये तीस ते पन्नास हजार फी तिथे नाव नोंदवले जाते. चार महिने क्‍लास चालतो. खरेतर पहिल्या महिन्यातच ही भानगड आपल्याला झेपणारी नाही हे लक्षात आलेले अनेक जण असतात. पण आता पैसे भरले आहेत तर जाणे भागत असते. त्यातून मी कॅटची परीक्षा देणार आहे याचा गवगवा मित्र मैत्रिणी व नात्यागोत्यात आधीच झालेला असतो ना? मग दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबरच्या पहिल्या महिन्यात कॅटची परीक्षा होते. ढोबळमानाने सांगायचे तर अडीच ते चार लाख विद्यार्थी सरासरीने ही परीक्षा देतात. मात्र ‘आयआयएम’च्या प्रवेशासाठी सहसा यातील किमान ९८.५ ते १०० परसेंटाइल मिळवणारे फारतर दहा हजार विद्यार्थी ‘जीडीपीआय’ म्हणजेच ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्ह्यूजसाठी बोलावले जातात. मग इथे स्पर्धा कशी व कोणाबरोबर असते? 

भारतातील एक सर्वांत कठीण अशी ही परीक्षा आहे असे प्रथम लक्षात घ्यायला हवे. उत्कृष्ट संस्थांतून पास झालेले विविध शाखांतील पदवीधर तर या परीक्षेसाठी प्रयत्न करतातच पण एक महत्त्वाची गमतीची गोष्ट म्हणजे सर्वच ‘आयआयटी’मधून पास झालेले अत्यंत तल्लख इंजिनिअर्स याच परीक्षेचा ध्यास घेऊन बसतात. ‘आयआयटी’ पूर्ण करून ‘आयआयएम’ला थेट प्रवेश मिळवणारे फारतर पंचवीसएक टक्के असू शकतात. यामध्ये गेल्या वीसएक वर्षांत काहीही बदल झालेला नाही हेही मुद्दाम नमूद करत आहे. ‘आयआयटी’तून थेट ‘आयआयएम’मधून ‘एमबीए’ झालेल्या इंडस्ट्रीजमध्ये एक वेगळेच नाव वापरले जाते. डबल बॅरल डिग्री होल्डर या नावाने ते ओळखले जाते. वाघाच्या शिकारीला फक्त वापरली जाणारी डबल बॅरल बंदूक असते ना? 

मग या साऱ्यातून फायदा कोणाचा होतो तर अर्थातच कॅटच्या क्‍लासवाल्यांचा. स्पर्धा किती व कोणाशी हे नीट समजावून घेतले तर सुरुवात करायची असते ती राज्याच्या सीईटीपासून.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr shriram git edu supplement sakal pune today