स्पर्धेचे स्वरूप लक्षात घ्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
स्पर्धेचे स्वरूप लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्यासाठी सर्वांत उत्तम 
उदाहरण देता येते ते डिफेन्स सर्व्हिसेसचे. याउलट स्पर्धा काय, कशी आणि कोणाशी आहे, हेच न कळालेले डिफेन्समध्ये जाण्यासाठी योग्य असूनही त्या रस्त्यापासून दुरावतात. कसे ते आपण क्रमवारीने पाहूयात. पहिला टप्पा म्हणजे ‘एनडीए’चा. इथे खरेतर कोणतीही बारावी चालते. फक्त टेक्‍निकल शाखांसाठी बारावी शास्त्रची गरज लागते, मात्र गणिताचा अभ्यास सर्वांत निर्णायक असतो हे माहिती असणारा शोधावा लागतो. आता सायन्सचा अभ्यास व त्यातील मिळणारे गुण याच्या जोडीला हा अभ्यास फार मोजक्‍यांनाच झेपतो. तसेच ‘एनडीए’त जायचे म्हणून सायन्स घेणाऱ्यांची अक्षरशः फरफट होते. मुलींसाठी हा रस्ता उपलब्ध नसतो. मात्र, सर्वत्र मुलामुलींसाठी ‘एएफएमस्सी’मध्ये मेडिकल व नर्सिंगसाठीचा रस्ता बारावी सायन्सनंतर उपलब्ध असतो. इथेही ‘नीट’मधील उत्कृष्ट गुण तीव्र स्पर्धा निर्माण करतात. म्हणूनच इयत्ता बारावीनंतरचे डिफेन्समध्ये जाण्याचे हे दोन रस्ते अत्यंत तीव्र स्पर्धेचे आहेत. 

याउलट बारावी सायन्समध्ये ‘पीसीएम’ घेऊन उत्तम गुण मिळविले असतील तर नेव्हीमध्ये व आर्मीमध्ये डायरेक्‍ट टेक्‍निकल एंट्रीचा रस्ता उघडू शकतो. एवढेच नव्हे, संपूर्णतः मोफत असे उत्कृष्ट इंजिनिअरिंगचे शिक्षणही मिळते, मात्र हा रस्ताच माहिती नसतो. खरेतर पदवीधर होऊन तेही कोणतीही शाखा निवडून कमिशन्ड अधिकारी बनणे हे खूप आश्‍वासक मध्यम स्पर्धेचा रस्ता असतो. वय, समज, फिटनेस, ध्येयनिश्‍चिती करणे हे सारेच वाढलेले असते. यासाठी सहसा ५ ते ६ वेळा प्रयत्न करता येतात. डेहराडून येथून कायमचे तर ‘ओटीए’ चेन्नई येथून शॉर्टसर्व्हिस कमिशन मिळविण्यासाठी हे प्रयत्न करता येतात. 

आता एक गंमत पाहा, ‘ओटीए’ची परीक्षा खूप सोपी असते, कारण गणिताची भीती वाटणाऱ्यांना त्यात गणित नसते. मात्र, डेहराडून ‘आयएमए’साठी गणिताची दहावीची पातळी घेऊन त्यात गुण मिळवावेच लागतात. पदवी घेताना कॉलेज दरम्यान जी मुले वा मुली एनसीसीच्या तीनही परीक्षा देऊन ‘सी’ सर्टिफिकेट मिळवितात, त्यांना ‘आयएमए’ किंवा ‘ओटीए’ची लेखी परीक्षा न देता थेट ‘एसएसबी’च्या खडतर मुलाखतीला फक्त सामोरे जावे लागते. दरवर्षी अशा स्पेशल कोट्यातून दोनदा प्रवेशाची शक्‍यता एनसीसीमुळे शक्‍य होते.

प्रथम इंजिनिअर होऊन मग तांत्रिकी प्रवेशासाठी तीनही दलात प्रवेश करणे अधिकच सुकर व कमी स्पर्धेचे होते. मात्र, तो रस्ता घेणारे फारच थोडे मराठी तरुण-तरुणी आढळतात. वकील, डेंटिस्ट, पदव्युत्तर डॉक्‍टर यांच्यासाठी तर वाढत्या वयानुसार संधी असतात. गरज असते ती ही सारी माहिती योग्य वेळी समजून घेण्याची.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr shriram git edu supplement sakal pune today