कसोटी पालकत्वाची

atrocity
atrocity

निर्भयाकांडाची पुनरावृत्ती हैदराबादमध्ये घडली आणि देशभर संतापजनक लाट उसळली. इतकी जर स्त्री असुरक्षित असेल, तर मुलींचे पालकत्व स्वीकारणे पालकांना अवघड जात असावे व त्यातूनच स्त्री भ्रूणहत्येचे प्रकार वाढत असावेत, असा विचार मनाला शिवून गेला. पण, दुसऱ्याच क्षणी जाणवले स्त्री भ्रूणहत्या असो वा लैंगिक अत्याचाराच्या घटना, गुन्हा हा गुन्हाच.

मला वाटते, मुलीची किशोरवयीन मानसिकता जपण्याचा प्रयत्न प्रत्येक माता-पालक करताना आढळतात. विशेष करून तिला मासिक पाळीस सुरवात होण्याच्या वेळेस तिच्यातील शारीरिक बदलांची शाळेतून, घरातील आई, आजीकडून माहिती थोड्या प्रमाणात का होईना दिली जाते. माता जर सुशिक्षित असेल तर स्वतःची काळजी कशी घ्यावी? याचेही ज्ञान बऱ्यापैकी दिले जाते; परंतु मुलांच्या किशोरवयीन मानसिकतेचा विचार किती कुटुंबांत होत असावा? मुलांमधील होणाऱ्या आंतरिक बद्दलांबद्दल किती दक्षता घेतली जात असावी?

‘मानवी कामजीवन’ या संवेदनशील व गुंतागुंतीच्या विषयावर स्पष्टपणे व मोकळेपणाने बोलणे आजही गैर मानले जाते. त्यासाठी अर्थात प्रथम पालकांनी लक्षात घ्यायला हवे लैंगिक भावना सृष्टीतील चराचराचा अविभाज्य भाग आहे. त्यामध्ये कोणतीही विकृती नाही. तेव्हा या गोष्टीकडे शास्त्रीय व वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. मला वाटते मुलांमधील होणाऱ्या आंतरिक बदलांना जर वेळीच योग्यरीतीने विशेष करून पिता-पालकांनी हाताळल्यास कदाचित लैंगिकतेतून होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण थोडेफार घटण्यास मदत होईल; परंतु आजकाल मुलांच्या या उमलण्याच्या काळातच पालक आपल्या व्यवसायात स्थिरस्थावरता शोधण्यात मग्न असतात. परिणामी मुलांमधील छोट्या छोट्या बदलांकडे दुर्लक्षित केले जाते. याचवेळी नेमके सोशल मीडियातून मिळणाऱ्या चुकीच्या ज्ञानामुळे कदाचित काहींचे रूपांतर विकृतीत होत असावे.

सध्याच्या सैराट जीवनपद्धतीत जगताना पाल्याला पडलेल्या प्रश्नांना, त्याच्या विचारांना योग्य वळण देणे, काही नाजूक प्रश्न योग्यरितीने हाताळणे हे पालकांसाठी मोठे आव्हानात्मक आहे. आपल्या पाल्यास उत्तम नागरिक घडवण्यासाठी मायेचे, आत्मविश्रवासाचे, व्यावहारिक व स्वावलंबनाचे धडे देताना लैंगिक शिक्षणाची व संयमाची शिकवण देण्याची आवश्‍यकताच नाही, तर आज याची नितांत गरज आहे. त्यामुळे चित्रपटातून अथवा इतर माध्यमांतून मिळणाऱ्या काल्पनिक जीवनाला आपले पाल्य बळी पडणार नाही व परिणामी सामाजिक अस्थिरताही कमी होण्यास मदत होईल, असे मला वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com