#MokaleVha : पौगंडावस्थेतील अस्वस्थता

Restlessness
Restlessness

दहावीचे प्रीलीमचे पेपर्स चांगले गेले होते. हसऱ्या चेहऱ्याने सुजय समोर उभा होता. मला बरोबर एक वर्षापूर्वीची आठवण आली. 

त्या दिवशी सुजय क्‍लिनिकच्या वेटिंग रूममध्ये हताश होऊन बाहेर बसला होता. मी, सुजयचे आई-वडील आणि सुजयच्या वर्गशिक्षिका हळबेबाई. वातावरण तसं तणावपूर्ण होतं.

गेल्या वर्षीपर्यंत पहिल्या पाचात येणारा सुजय सहामाही परीक्षेत चक्क दोन विषयांत नापास झाला. आता पुढचं वर्ष दहावीचं. आई खूप अस्वस्थ झालेली. ‘सर, काय कमी केलं आम्ही याच्यासाठी? तो म्हणेल तो क्‍लास, पुस्तकं, कॉम्प्युटर, मोबाईल... सगळं दिलं, पण गेले काही महिने अभ्यासाचं नाव नाही. जरा कुठे बसला की उठलाच दहा मिनिटात. लक्ष लागत नाही म्हणे. टी.व्ही. सारखा बघायचा, मोबाईलवर रात्री उशिरापर्यंत गेम खेळायचे. त्या वेळी नाही येत ते विचार? वेळेवर झोपणं नाही, उठणं नाही, सारखा निराश, सारखी चिडचिड करायची. नीट बोलायचं नाही कुणाशी.’ मी आईला बोलू दिलं, मोकळं होऊ दिलं. म्हटलं, 

‘तुम्ही आधी शांत व्हा. या गोष्टीचा धक्का बसणं अगदी स्वाभाविक आहे. आपण सर्व बाजूनं विचार करूया. नेमकं काय घडलंय हे समजावून घेऊन मार्ग काढूया. सुजय हुशार मुलगा आहे. मी त्याच्याशी बोललोय. काय घडलंय याचा अंदाज आलाय. मार्क्‍स कमी पडल्याचं त्यालाही खूप वाईट वाटतंय. हे का घडलं आणि त्याच्यावर उपाय काय, हे मी सांगणारच आहे. तो म्हणतोय ते खरं आहे, त्याचं खरोखरच अभ्यासात लक्ष नाही लागत. 

एकाग्रता नाही होत. तो हे मुद्दाम करत नाही. पौगंडावस्थेतील अस्वस्थतेच्या किंवा कदाचित नैराश्‍याच्या आजाराची ही सुरुवात असू शकते. काही चाचण्यांनंतर ते निश्‍चित होईल.’ हळबेबाई लक्षपूर्वक ऐकत होत्या. त्यांनी विचारलं, ‘सर, मोकळेपणाने विचारू? सुजयसारखा प्रॉब्लेम हल्ली खूप मुला-मुलींमध्ये दिसतो. आम्हालाही आश्‍चर्य वाटतं. मुलांच्या बाबतीत हे का घडतंय? या आजाराची लक्षणं काय आहेत आणि उपाय काय आहे?’ मी म्हटलं, ‘बाई प्रथम मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही शिक्षकांनी यात रुची दाखवणं आता खूप महत्त्वाचं आहे. शेवटी पालक, शिक्षक आणि तज्ज्ञ या सगळ्यांचं टीमवर्क असणं आवश्‍यक आहे. या आजारात साधारणपणे पुढील लक्षणं दिसतात ः अभ्यासातली एकाग्रता कमी होणे, एनर्जी लेव्हल कमी होणे, शाळेत अनुपस्थिती, मार्कांमध्ये घसरण, अस्वस्थपणा व चिडचिड करणे, अपराधीपणाची भावना, आपण निरुपयोगी असल्याची भावना, उत्साहाचा अभाव, आवड नसणे, एकाग्रतेचा अभाव, अतिहळवं होणे, विलक्षण कंटाळा, छोट्या छोट्या गोष्टींवरून आक्रमक होणे, जेवणाच्या व झोपण्याच्या सवयींमध्ये बदल, घरापासून लांब राहण्याची प्रवृत्ती, अति टीव्ही बघणे, गेम्स खेळणे, टीका अजिबात सहन न होणे व सतत दुखावले जाणे, एकटे एकटे राहणे, तसेच सार्वजनिक/ कौटुंबिक समारंभ टाळणे, शारीरिक तपासण्यांमध्ये काहीही दोष न आढळूनही डोकेदुखी, पोटदुखी इत्यादी व आत्महत्येचे विचार. 

मुलामुलींमध्ये ही लक्षणं किती काळ व किती तीव्रतेने जाणवत आहेत हे पालकांनी, शिक्षकांनी व मित्रांनी जाणीवपूर्वक पाहायला हवं. त्याचबरोबर पौगंडावस्था हा एक सर्वार्थाने स्थित्यंतराचा कालावधी असतो, त्यामुळे काहीवेळा ही लक्षणं नॉर्मल असू शकतात. ज्याला वाढत्या वेदना म्हणतात. बऱ्याचदा अतिउत्साही वागणं किंवा दुराग्रही बंडखोर वृत्ती, ही आजाराची लक्षणं असू शकतात. बरं, पौगंडावस्थेतील मुलं निराश किंवा दुःखी दिसतीलच असंही नसतं, त्यामुळे आजाराच्या अवस्थेकडं दुर्लक्ष होऊ शकतं.’ अस्वस्थता - नैराश्‍याच्या आजाराचं मुख्य कारण म्हणजे मेंदूतील रासायनिक बदल / असंतुलन होय. 

आजारास साहाय्यभूत ठरणारे महत्त्वाचे घटक कुठले? तर- आनुवंशिकता, हार्मोनल चेंजेस, परीक्षेतील अपयश, आई-वडिलांमधील सततच्या भांडणांमुळे येणारा ताण, घरातील तणावाचे वातावरण, जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचा धक्का या सर्वांतून निर्माण होणारा ताण; जरा मोठ्या मुलांच्या बाबतीत एकतर्फी प्रेमातील अपयश, आयुष्यातील यशाबद्दलच्या चुकीच्या कल्पना, तसेच झपाट्याने बदलणारी सामाजिक परिस्थिती, दहशतवाद इत्यादींची नीट न होणारी उकल, भोवतालचा चंगळवाद आणि चांगले गुण मिळूनही भ्रष्टाचारामुळे हव्या त्या अभ्यासक्रमाला नाकारला गेलेला प्रवेश, नकारात्मक व्यक्तिमत्त्व, स्व-प्रतिमा क्षीण असणे व आयुष्याविषयी नकारात्मक दृष्टिकोन, गंभीर स्वरूपाच्या आरोग्याच्या तक्रारी, लहानपणी ओढवलेला दुर्दैवी प्रसंग, इतर गंभीर मानसिक आजारांबरोबरसुद्धा नैराश्‍याचा आजार असू शकतो.

पौगंडावस्थेतील नैराश्‍य दुर्लक्ष करण्यासारखं नक्कीच नाही, त्यामुळे सगळं आपोआप ठीक होईल, वयाचा दोष असेल वगैरे गैरसमजुतीत न रहाणं चांगलं. ताबडतोब तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं चांगलं. 

सर्वप्रथम विश्वासात घेऊन आपल्या पाल्याशी बोला. तुम्हाला त्याच्याविषयी काळजी, प्रेम वाटतंय हे त्याला जाणवू द्या. आवश्‍यक वाटल्यास तत्काळ तज्ज्ञांची मदत घ्या. आवश्‍यक औषधोपचार, समुपदेशन, विशिष्ट मानसोपचार पद्धती आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मुलाला पालकांकडून व शिक्षकांकडून मिळणारा भावनिक आधार यांच्या आधारे यातून निश्‍चित बाहेर पडता येतं. वर्षापूर्वी अस्वस्थतेच्या गर्तेत सापडलेला सुजय, काही काळात त्यातून बाहेर आला. त्याचं अभ्यासात पूर्ववत लक्ष लागायला लागलं, इतकंच नव्हे, तर तो भावनांवर ताबा ठेवण्याच्या दृष्टीने उपयोगी इतर स्किल्स शिकला. 

आज दहावीचे प्रीलीमचे पेपर्स चांगले गेले होते. मी त्याचं अभिनंदन केलं. दहावी अंतिम परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानेही शिकलेली स्किल्स वापरत राहण्याचं प्रॉमिस दिलं. एक आयुष्य मार्गी लागलं. अस्वस्थतेच्या, नैराश्‍याच्या आजारामुळे, फुलणाऱ्या कळ्या कोमेजून जातात; परंतु जर वेळेवर काळजी घेतली तर त्यांना पुन्हा एकदा सुंदर आयुष्य जगण्यासाठी मदत होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com