#MokaleVha : ती पुन्हा सावरली त्याची गोष्ट!

Women
Women

क्षमा माझ्याकडे आली, तेव्हा खूप विचित्र मनःस्थितीत होती. ती दु:खी तर होतीच, पण तिला विलक्षण अपराधी वाटत होते. तिच्यावर जणू आभाळच कोसळले होते. तिच्या पतीचा, आदित्यचा अपघाती मृत्यू झाला होता. या गोष्टीला आता दोन महिने होऊन गेले. पण ती तिळभरही सावरू शकली नव्हती. जोडीदार गेल्याचे दु:ख होतेच पण विलक्षण अपराधी भावना मनात होती.

ती पुण्यात राहत होती, आणि आदित्य कामातील बदलीमुळे मुंबईत राहत होता. साधारणपणे शनिवार-रविवारी तो पुण्याला येत असे. ज्या दिवशी तो भीषण अपघात झाला, त्यावेळी पहाटेची वेळ होती. त्याच दिवशी क्षमाचा वाढदिवसही होता. तो वर्किंग डे असल्याने, त्यादिवशी आदित्यला काही महत्त्वाची कामे होती. पण क्षमाचा आग्रहच होता की, तू काही तासांसाठी तरी ये. आपण सेलिब्रेशन करू आणि तू परत जा. तो म्हणत होता की, मी येत्या शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे येतोच आहे. तेव्हा निवांत सेलिब्रेट करू. पण क्षमाने हट्टच धरला. क्षमाचे मन त्याच्याने मोडवेना म्हणून तो मध्यरात्री निघाला, आणि हे अघटित घडले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या आग्रहामुळे तो रात्री निघाला. पर्यायाने आपणच त्या अपघाताला जबाबदार आहोत, हे क्षमाच्या मनाने पक्के केले होते. तिला विलक्षण अपराधी वाटत होते. आपल्याला शिक्षा व्हायलाच हवी असे तिला सारखे वाटत होते. आपण आत्महत्या करावी असेही तिला वाटे, पण छोट्या आर्याचे, त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीचे काय होईल या काळजीनेही ती हतबल झाली होती. विलक्षण एकटेपणा आला होता. क्षमाला तीव्र नैराश्याने गाठले होते. तिने नोकरीवर जाणे बंद केले. घरच्यांनी समजावून पाहिले. वेगवेगळे उपाय करून पाहिले. ती सैरभैर झाली होती, तिचा कुठलाही अपराध नसताना! तिला चांगल्या समुपदेशनाबरोबरच योग्य त्या थेरपीजची गरज होती. तिच्या व्यक्तिमत्त्वामध्ये obsessive ट्रेट्स होते. या विचित्र दुष्टचक्रातून तिची सुटका होणे गरजेचे होते. आदित्यच्या मृत्यूचे वास्तव स्वीकारणे, त्या मृत्यूला ती अजिबातच कारणीभूत नाही हे तिला पटणे आणि नव्या उभारीने आयुष्याला तोंड द्यायला तिला बळ देणे गरजेचे होते. 

अपराधीपणा ही एक मानसिक भावनिक प्रतिक्रिया आहे. आपण काहीतरी विलक्षण चुकीची गोष्ट केली आहे, ही भावना सारखी टोचत राहते. आपल्या वागणुकीची लाज वाटत राहते तेव्हा तो अपराधीपणा असतो. कधीकधी हा अपराधीपणा इतका खोलवर रुजलेला असतो की, तो आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागतो. 

साधारणपणे अपराधीपणा पुढील कारणांमुळे असू शकतो. 
1) तुमच्यामुळे कुणाला तरी शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक त्रास झालेला असू शकतो. 

2) तुम्ही प्रत्यक्षात काहीही चुकीचे केलेले नसते, पण चुकीची कृती करावी अशी तीव्र इच्छा झालेली असते. मग तुमची सद्सदविवेकबुद्धी तुम्हाला त्रास द्यायला लागते. असे चुकीचे विचार आपल्या मनात आल्याबद्दल अपराधी वाटते. 

3) अशा गोष्टीबद्दल अपराधी वाटते, जी गोष्ट तुम्ही न करून सुद्धा तुम्ही केली आहे, असे तुम्हाला वाटते. ‘कॉग्निटीव्ह थेरी ऑफ इमोशन्स’नुसार तुम्ही अतार्किक विचार केलात तर दु:खी होता. तुम्हाला जणू काही ती गोष्ट केलीच आहे, असे वाटू लागते. क्षमाच्या बाबतीत हाही भाग होता. 

4) कुणासाठी तरी तुम्ही आवश्यक असताना पुरेशी मदत केली नाही. क्षमाच्या बाबतीत हा ही अपराधीपणा होता, की अपघात झाल्यावर आदित्यला लहान स्थानिक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्याला पुण्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणले असते, तर तो वाचला असता. 

क्षमाला बऱ्याच गोष्टींचे भान येणे आवश्यक होते. उदा. जन्म आणि मृत्यू या दोन नैसर्गिक घटना प्रत्येकाच्या आयुष्यात अटळ आहेत. मृत्यू हा निसर्गचक्राचा भाग आहे. तसा तो स्वीकारायला हवा. कोणाचा मृत्यू कधी आणि कसा होईल याबद्दल माणसाला पूर्ण ज्ञान नाही. तो शांतपणे स्वीकारणे आवश्यक आहे. हेच निसर्गचक्राला अपेक्षित आहे. 

तिच्या वाढदिवसाला त्याने यावे असे तिला वाटणे हे दोघांमधील  प्रेमापोटीच होते. त्यात गैर काही नव्हते. तिला असे वाटणे, त्यासाठी तिने आग्रह धरणे, त्यानेही तिच्या इच्छेला मान देऊन पहाटे यायला निघणे या सगळ्याचा अर्थ, ती आदित्यच्या मृत्यूला कारणीभूत आहे असा होत नाही. यापूर्वीही आदित्य अनेकदा पहाटे निघून आला होता. तो चांगला ड्रायव्हर होता. अपघात घडण्याला रस्त्याची स्थिती, समोरच्याची चूक अशा अनेक घटना कारणीभूत असू शकतात. 

स्वत:च्या आयुष्यासाठी तिने या स्थितीतून लवकर बाहेर पडायला हवे आणि मुलीसमोर एका धीरोदात्त आईचे उदाहरण उभे करायला हवे. सावरण्यासाठी तिने तत्त्वज्ञानाचा किंवा श्रद्धेचा आधार जरूर घ्यावा. परंतु कुठल्याही अंध:श्रद्धेच्या आहारी जाऊ नये. या सगळ्या सर्वसामान्य मुद्द्यांबरोबरच क्षमाच्या व्यक्तिमत्त्वातील दोष, मेंटल मेकअप, अशक्तपणा, obsessive विचारसरणी, आनुवांशिकता आणि मेंदूतील रासायनिक असंतुलन आदी मुद्देही कारणीभूत होते. त्यामुळेच तिचा अपराधीपणा जाणे, नैराश्यातून सावरणे यासाठी तज्ज्ञांची मदत आवश्यक ठरली. क्षमा आता छान आहे. पुन्हा कामावर जायला लागली आहे. योग्य औषधोपचार, माइंडफुलनेस, स्वस्थतेची तंत्रे, थेरपीज, समुपदेशन इत्यादींच्या मदतीने ती सावरली आहे. तिने वास्तव स्वीकारले आहे. निसर्गचक्र आणि जीवनचक्र याचे भान तिला आले आहे. आदित्यच्या आठवणी येतातच पण ते स्वाभाविकच आहे. तोही निसर्गचक्राचा, जीवनचक्राचाच एक भाग नाही का?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com