सगळ्या भाषांत काम करायचंय... (हेमल इंगळे)

सगळ्या भाषांत काम करायचंय... (हेमल इंगळे)

सेलिब्रेटी टॉक 
मराठमोळ्या हेमलने तेलुगू चित्रपटांत आणि नंतर मराठी चित्रपटांत काम केलं आहे. तिचा मराठी चित्रपट ‘अशी ही आशिकी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यातून पहिल्यांदाच ती मराठी चित्रपटात झळकणार आहे. त्यानिमित्ताने तिच्याशी केलेली बातचीत. 

या क्षेत्रात येण्याचे तू कसे ठरवलेस? 
- माझी सुरवात ब्यूटी कॉन्टेस्टपासून झाली. मी कॉलेजमध्ये असल्यापासून स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरवात केली. ते मी छंद म्हणून करत होते. त्या वेळी या क्षेत्रात येण्याचा गांभीर्याने विचार केला नव्हता. मात्र, तिथे मला यश मिळत गेल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीजमधून अनेकदा अभिनयासंदर्भात विचारणा झाली. त्यानंतरच मी या क्षेत्राचा करिअर म्हणून गंभीरपणे विचार करू शकते. तोपर्यंत मला असं वाटलं नव्हतं, की मी हे करू शकेन. मी कोल्हापूरची आहे. तिथे या करिअरसाठी पूरक वातावरण नव्हतं आणि अभ्यासाकडं अधिक गांभीर्यानं पाहत असल्यामुळे आपल्याला कोण घेणार चित्रपटात, असं वाटायचं. चित्रपटासाठी ऑफर आल्यावर आई-वडिलांशी चर्चा करून या क्षेत्रात येण्याचं ठरवलं. पहिल्यांदा मी एका तेलगू चित्रपटात काम केलं आणि त्यानंतर दोन मराठी चित्रपटांत काम केलं आहे. माझा पहिला मराठी चित्रपट ‘अशी ही आशिकी’ आणि दुसरा चित्रपट अजून प्रदर्शित झाला नाही. त्या चित्रपटाचं नाव ‘आस’ आहे. 

‘अशी ही आशिकी’मधील भूमिकेबद्दल काय सांगशील? 
- माझ्या पात्राचं नाव अमरजा आहे. हे खूप स्ट्राँग पात्र आहे. संपूर्ण चित्रपट त्या पात्राभोवती फिरतो, असं म्हणायला हरकत नाही. हे पात्र सचिन सरांनी खूप छान प्रकारे लिहिलं आहे. म्हणजे मुलगी, मैत्रीण, गर्लफ्रेंड केवळ अमराजासारखीच असावी! ती प्रत्येक काम जीव ओतून करते. तिची पर्सनॅलिटी खूपच हवीहवीशी वाटणारी आहे. आपल्याला काही लोकांना भेटल्यावर वेगळीच एनर्जी मिळते, अमरजा तशीच आहे...

मराठी असूनही तेलुगू चित्रपट पहिल्यांदा का केला? 
- असं काही नव्हतं. पहिल्यांदा मी मराठी चित्रपटच साईन केला होता, पण त्याचं काम लांबलं. त्यामुळं माझा तेलुगू चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला. मुख्यतः मराठी चित्रपटच करायचा, हे माझं नक्की ठरलं आहे. पण मी स्वतःला मर्यादित ठेवणार नाही. तुम्ही जितक्‍या जास्त भाषांमध्ये काम कराल, तितकं तुम्हाला जास्त शिकायला मिळतं. प्रत्येक भाषेत काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि ते मला शिकायचंय. मला शिकण्यात रस आहे, कारण मी अजून खूप लहान आहे. मला वेगवेगळ्या लोकांकडून शिकता येईल तितकं शिकायचं आहे, हेच माझं ध्येय आहे. आता मी कन्नड चित्रपटातही काम करणार आहे. यातून तुम्हाला वेगवेगळ्या भाषा शिकता येतात आणि त्यांतील सर्वोत्कृष्ट तुम्ही आत्मसात करू शकता. 

अभिनयबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? 
- अभिनय हा माणूस म्हणून खूप छान आहे. तो त्याच्या वडिलांना (लक्ष्मीकांत बर्डे) कॉपी न करता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतोय करतोय. त्याने ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट केला असला, तरी त्यात अंकुशदादा मुख्य नायक होता. त्यामुळं त्याचाही मुख्य अभिनेता म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. आम्ही दोघंही या चित्रपटामध्ये विद्यार्थीच होतो. एकमेकांना सांभाळून घेत होतो आणि सचिन सर आमचे गुरू होते. 

(शब्दांकन : चिन्मयी खरे)

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com