केव्हीपीवाय - किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
आतापर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेतील माहिती ही शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून होती. सध्या २०१९-२० शैक्षणिक वर्षाची वैद्यकीय अभियांत्रिकीसह सर्व शाखांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कट ऑफ डेटपर्यंत प्रवेशाची योग्य ती माहिती यापुढेही दिली जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या बारावीमध्ये जे विद्यार्थी पीसीएमबी या विषयासह शिक्षण घेत आहेत व मार्च-एप्रिल २०२० मध्ये बारावीच्या परीक्षेसह अनेक सीईटी परीक्षांना सामोरे जाणार आहेत, त्या सर्व सीईटी परीक्षांचे फॉर्म सप्टेंबर २०१९ पासूनच उपलब्ध होणार आहेत. तोपर्यंत इतर परीक्षांची माहिती घेऊयात.

कोणत्याही शैक्षणिक वर्षात सर्वांत प्रथम अर्ज हा किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना परीक्षेचा उपलब्ध होतो. उच्च गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा व त्यांच्या अंगी असणाऱ्या शास्त्रीय दृष्टिकोनाचा तसेच शास्त्रीय संशोधनात अभिरुची असलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या संशोधन व विकासासाठी करणे, कमी वयातच त्यांना संशोधनाची संधी देऊन त्यांच्यामधील जिज्ञासानिर्मिती, क्षमता वाढविणे व त्याद्वारे तरुण शास्त्रज्ञ निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेवून मूलभूत विज्ञानात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना राबविली जाते. 

डीएसटी - डिपार्टमेंट ऑफ स्पेस सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे १९९९ पासून ही योजना सुरू करण्यात आली असून संशोधन व कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना ओळखणे, प्रतिभावान आणि प्रेरणादायी विद्यार्थ्यांना संशोधनात करिअरचा पाठपुरावा करण्यासाठी ओळख व उत्तेजन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

फेलोशीप पात्रता (विद्यावेतन)
बेसिक सायन्सेसमध्ये अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमातील विद्यार्थी म्हणजेच बीएस्सी, बीएस, बीस्टॅट, बीमॅथ, इंटर एमएस्सी, इंटर रसायनशास्त्र, भौतिकी, गणित, सांख्यिकी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, सेल बायोलॉजी, इकोलॉजी, आण्विक जीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, फिजीऑलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, न्युरोसायन्सेस, बायोइन्फोर्मोटेकिस्, मरीन बायोलॉजी, जिओलॉजी, जेनिटिक्स, बायोमेडीकल सायन्स, अप्लाईड फिजिक्स, जिओफिजीक्स, मटेरीयल सायन्स, एन्व्हार्यमेंटल सायन्स आदी केव्हीपीवायसाठी पात्र आहेत. यासाठी पाच ते सात हजार रुपये प्रतिमहिना विद्यावेतन तसेच वार्षिक आकस्मिक खर्चासाठी २० ते २८ हजार रुपये प्रतिवर्षी दिले जातात. याच केव्हीपीवाय परीक्षेतून आयसर (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च) या सात नामांकित संस्थांमधील २५ टक्के जागांवरील प्रवेशाची संधी प्राप्त होते.

केव्हीपीवाय फेलोशीपची जाहिरात सर्वसाधारणपणे तांत्रिक दिवस ११ मे आणि प्रत्येक वर्षीच्या जुलैच्या दुसऱ्या रविवारी राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहीर होते. केव्हीपीवाय अॅप्टीट्यूड टेस्ट-२०१९ देशभरातील १११ शहरांमध्ये एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने ३ नोव्हेंबर २०१९ रोजी होणार आहे. या परीक्षेनंतर परीक्षेतील गुण व मुलाखत यानुसार अंतिम निवड केली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Hemchandra Shinde edu supplement sakal pune today