सीईटी सेलतर्फे प्रवेश प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 August 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष-सीईटी सेल महाराष्ट्र राज्यातर्फे राज्यातील अनेक अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर शाखेतील प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर जाताच जे मुख्य पेज उपलब्ध होते, त्यावरती घेण्यात येणाऱ्या सर्व शाखांच्या प्रवेश प्रक्रियेची लिंक उपलब्ध होते.

याच पेजमधून सीईटी सेल ‘होम पेज’ तसेच सीईटी एक्झाम पोर्टल या लिंकसुध्दा उपलब्ध होतात. सध्या बारावीमध्ये किंवा पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी, पालकांनी सर्व सीईटी परीक्षा व प्रवेश प्रक्रिया याबाबत संकेतस्थळावरून मागील वर्षीची म्हणजेच २०१९मधील उपलब्ध माहिती वेळीच घेऊन त्याआधारे आपल्या पुढील वर्षाचे नियोजन करावे.

पदवी अभ्यासक्रम 
      आरोग्य विज्ञान शाखा - देशभरातील शासकीय, खासगी, अभिमत संस्थांमधील एमबीबीएस बीडीएस प्रवेशासाठी देशपातळीवर ‘नीट’ परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेतली जाते. फक्त ‘नीट’ परीक्षा घेण्याची व ऑल इंडिया रॅंक देण्याची जबाबदारी ‘एनटीए’कडे असून त्यानंतर राज्यातील ‘एमबीबीएस’सह सर्व उर्वरित शाखांची प्रवेश प्रक्रिया मात्र सीईटी सेल मुंबईतर्फे स्वतंत्र राबविली जाते.

      राज्यातील शासकीय, शासन अनुदानित, स्वायत्त तसेच खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकी शाखा (बीई, बीटेक), फार्मसी (बी. फार्मा व फार्मा डी), शाखेतील संपूर्ण प्रवेश प्रक्रिया.- बी. आर्च. प्रवेशासाठी नाटा - नॅशनल अॅप्टीट्युड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षा कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरतर्फे घेतली जात असली, तरीही राज्यातील संपूर्ण प्रवेश प्रक्रिया मात्र सीईटी सेलकडून पार पाडली जाते.

      बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजीमधील संपूर्ण प्रवेश प्रक्रिया. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश (डीएसई), थेट द्वितीय वर्ष फार्मसी प्रवेश (डीएसपी) यांची प्रवेश प्रक्रिया. कृषी शाखेतील सर्व शाखांची राज्यातील प्रवेश प्रक्रिया. बॅचलर ऑफ फाईन आर्टस प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया.

      उच्च शिक्षण विभागातील विधी अभ्यास (एलएलबी - पाच वर्षे इंटिग्रेटेड), एललबी तीन वर्षे, बीएड, बीपीएड तसेच बीएबीएड, बीएस्सीबीएड, इंटिग्रेटेड म्हणजेच एकात्मिक अभ्यासक्रम या सर्वांची प्रवेश प्रक्रिया.

पदव्युत्तर अभ्यासक्रम
      वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी नीट ‘पीजीएम’ - पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस मेडीकल व  ‘पीजीडी’ - पोस्ट ग्रॅज्युएट इन डेन्टल तसेच ‘एमपीटीएच’ - फिजीओथेरपी, ‘एमओटीएच’ - अॅक्युपेशनल थेरपी, ‘एमएएसएलपी’ अशा अनेक शाखांची प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे राबवली जाते.

      तांत्रिक शिक्षणांतर्गत मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, फार्मसी, मॅनेजमेंट स्टडीज, हॉटेल मॅनेजमेंट तसेच एमई, एमटेक, एम प्लॅनिंग या शाखांची प्रवेश प्रक्रिया. 

      उच्च शिक्षणांतर्गत मास्टर इन फिजीकल एज्युकेशन - बीएड, एमएड इंटिग्रेटेड प्रवेश प्रक्रिया.

थोडक्यात विद्यार्थी, पालकांनी देशपातळीवरील प्रमुख परीक्षांसाठी एनटीए- नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या www.nta.ac.in आणि राज्यातील सर्व शाखांच्या प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षा आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी सेल मुंबईच्या www.mahacet.org या संकेतस्थळाच्या संपर्कात राहावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Hemchandra Shinde edu supplement sakal pune today