जेईई मेनचा अर्ज भरताना घ्यावयाची दक्षता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
देशभरातील अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षा ‘एनटीए’तर्फे जानेवारी व एप्रिल-२०२० मध्ये घेतली जाणार आहे. पहिल्या जेईई मेन-२०२० चे ऑनलाइन अर्ज www.nta.ac.in या संकेतस्थळावर ३० सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहेत. दोन्हीही परीक्षा देणे बंधनकारक नसून, कोणतीही एक परीक्षाही विद्यार्थी निवडू शकतात. दोन्हीही परीक्षा दिल्यास त्यामध्ये सर्वोत्तम पर्सेंटाईल स्कोअर प्रवेशासाठी ग्राह्य धरला जातो.

अर्ज भरण्यापूर्वी
 संकेतस्थळावरून माहितीपत्रक डाउनलोड करून अभ्यास करावा. कमीत कमी उपलब्ध असलेला भरलेल्या फॉर्मचा नमुना मोबाईलवर का होईना, परंतु डाउनलोड करून त्याचा अभ्यास करावा. त्यानुसार लागणाऱ्या सर्व शैक्षणिक माहितीबरोबरच आई-वडिलांचे प्रत्येकाचे स्वतंत्रपणे शिक्षण, व्यवसाय व वार्षिक उत्पन्न याची माहिती, स्वतःचा ई-मेल व सप्टेंबर-२०२० पर्यंत न बदलणारा मोबाईल क्रमांक अशी माहिती तयार ठेवूनच फॉर्म भरण्यास सुरवात करावी.
 रजिस्ट्रेशनसाठी ऑनलाइन अर्ज करणे, ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म भरणे, फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे व परीक्षा शुल्क भरणे हे चार महत्त्वाचे टप्पे आहेत.

रजिस्ट्रेशन 
 संगणकाने जनरेट केलेला अॅप्लिकेशन क्रमांक लिहून ठेवावा. स्वतः तयार केलेला पासवर्ड वापरावा, सुरक्षा प्रश्‍न निवडावा व त्याचे उत्तरही लिहून ठेवावे. हा अॅप्लिकेशन क्रमांक व पासवर्डचा यापुढे लॉगइन करताना, तसेच जेईई एप्रिल-२०२०चा फॉर्म भरताना वापरावा लागणार आहे.
 रजिस्ट्रेशनमध्ये वैयक्तिक माहिती, संपर्कासाठीचा पत्ता, ई-मेल व त्यानंतर पासवर्ड करून सबमिट करावा. येणाऱ्या रिव्ह्यू पेजमध्ये एडिट किंवा फायनल सबमिट पर्याय उपलब्ध होतो. प्रत्येक फिल्ड चेक करण्यासाठी चेकलिस्ट येते व प्रत्येकावर ‘मी सहमत आहे’, निवडल्यानंतरच पुढील टप्पा ओपन होतो.

अॅप्लिकेशन फॉर्म
   या टप्प्यात कोणत्या कोर्ससाठी फॉर्म भरायचा आहे, याची निवड, चार परीक्षा केद्रांची निवड, शैक्षणिक माहितीमध्ये दहावी, बारावी संस्थांची माहिती व परीक्षेचे गुण भरल्यानंतर आई-वडील, पालक यांची शैक्षणिक, व्यवसाय व वार्षिक उत्पन्नाची नोंद केल्यानंतर तपासणीनंतर फायनल सबमिट पर्याय उपलब्ध होतो. 

इमेज अपलोड
   एका पेन ड्राइव्हमध्ये योग्य त्या केबी आकारात फोटो व स्वाक्षरी स्कॅन करून सेव्ह करून ठेवावी. फोटो, स्वाक्षरी अपलोड करावी. प्रिव्ह्यूमध्ये दोन्हीही स्पष्ट दिसत असल्याची खात्री केल्यानंतरच अंतिम सबमिशमन करावे. फोटोखाली नाव अथवा फोटो काढल्याच्या दिनांकाची आवश्यकता नाही. याच फोटोचा व स्वाक्षरीचा भविष्यात इतर फॉर्म व प्रवेश प्रक्रियेच्यावेळी वापर करता येतो. 

फी-पेमेंट
   आपण कोणत्या कोर्सची निवड करता तसेच कोणत्या प्रवर्गातून नोंदणी केलेली आहे, त्यानुसार सॉफ्टवेअरकडून परीक्षा शुल्क दर्शवले जाते. ते योग्य त्या ऑनलाइन पद्धतीने भरल्यानंतर फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होते. वरील चारही टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या कन्फर्मेशन पेजची प्रिंट घ्यावी. आपल्या हातात प्रिंट आली, की याचाच अर्थ आपला अर्ज पूर्णपणे भरला व सबमिट झाला असे समजावे.

प्रत्यक्ष अर्ज भरताना
 अर्ज भरताना विद्यार्थ्याचे, आईवडिलांचे नाव नोंदवताना स्पेलिंग चेक करावे. प्रत्येक टप्प्यावर अर्ज भरल्यानंतर सबमिटनंतर रिव्ह्यू पेज येते. ते काळजीपूर्वक तपासावे व त्यानुसार एडिट अथवा फायनल सबमिट पर्याय प्रत्येक टप्प्यावर वापरावा. 
 अर्ज कन्फर्म केल्यावर त्यामध्ये बदल करता येत नाही. परंतु कन्फर्म करण्यापूर्वी एडिट पर्याय उपलब्ध होतो. ‘मी सहमत आहे, आय अॅग्री’ नंतरच फॉर्म पुढे जातो.
 आपला अर्ज संगणकाकडून स्वीकारला जात नाही, पुढे जात नसेल तर याचा अर्थ आपली काहीतरी माहिती भरायची राहिली आहे, असे समजून ती माहिती भरावी. सायबर कॅफेतील व्यक्ती नियम न वाचताच भरलेल्या फिल्डची तपासणी न करताच झटपट ‘आय अॅग्री’ करून अर्ज भरतात, अपुऱ्या जागेत विद्यार्थी शेजारी उभा राहतो, त्यामुळे त्याला व्यवस्थित तपासणी करता येत नाही. विद्यार्थ्याने किमान नावाचे स्पेलिंग, जन्मदिनांक व जात तपासावीच. यामध्येच दरवर्षी चुका होतात, तसेच फोटो व स्वाक्षरी आपलीच अपलोड झाली आहे का हेही पाहूनच अर्ज कन्फर्म करावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Hemchandra Shinde edu supplement sakal pune today