‘जेईई मेन’ बदललेल्या पॅटर्नकडे लक्ष द्या

Career
Career

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
देशभरातील अभियांत्रिकीसाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा यंदाच्या ‘जेईई मेन २०२०’ परीक्षेच्या पॅटर्नमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत परीक्षा नमुना आणि पेपरमध्ये मोठा बदल ३ सप्टेंबर रोजी एनटीएतर्फे जाहीर केला असून, बदललेल्या पॅटर्नची माहिती विद्यार्थ्यांना असणे महत्त्वाचे आहे. मुख्य बदलामध्ये ‘जेईई मेन २०२०’ पेपर पूर्वीप्रमाणे दोन पेपरऐवजी तीन पेपर- बीई- बीटेक, बीआर्च आणि बी प्लॅनिंगसाठी स्वतंत्र पेपर असतील. तसेच, पेपरचा कालावधी पूर्वीचाच असून प्रश्‍नांची 
संख्या मात्र कमी केलेली आहे.

पेपर - १ - बीई-बीटेक -
    जानेवारी सत्रासाठी ६ ते ११ जानेवारी २०२० दरम्यान होणारी पहिली परीक्षा भाग-१ - गणित, भाग-२ - भौतिकशास्त्र व भाग-३ - रसायनशास्त्र अशी विभागणी असून, संपूर्ण परीक्षा ऑनलाइन म्हणजेच संगणकीय पद्धतीने तीन तास कालावधीची आहे.

    प्रत्येक विभागात २० अधिक ५ अशा २५ प्रश्‍नांसह ७५ प्रश्‍न असतील. यामध्ये प्रत्येक विषयासाठी २० प्रश्‍न एमसीक्यू (चार पर्याय) पद्धतीचे असतील, त्याचबरोबर प्रत्येक विषयासाठी ५ प्रश्‍नांची उत्तरे संख्यात्मक मूल्य पद्धतीची असतील.

    फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्स या विभागांतील सर्व प्रश्‍नांचे गुणांकन समान असून, एमसीक्यू पद्धतीच्या २० प्रश्‍नांच्या प्रत्येक अचूक पर्यायासाठी ४ गुण असतील, मात्र चुकीचा पर्याय नोंदवल्यास एक गुण वजा केला जाईल. प्रत्येक विषयातील पाच प्रश्‍न संख्यात्मक मूल्य पद्धतीचे असून, अशा प्रश्‍नांत अचूक प्रतिसादासाठी चार गुण असतील. परंतु चुकीचा पर्याय नोंदवल्यास गुण वजा होणार नाहीत. 

    जेईई मेन २०२० जानेवारीचा निकाल ३१ जानेवारी २०२०मध्ये जाहीर होईल. जानेवारी व एप्रिलमधील निकाल संकलित केला जाईल, दोन्ही परीक्षा देणे बंधनकारक नाही, मात्र दोन्ही दिल्यास दोन्ही पैकी चांगल्या गुणाचा विचार केला जाईल.

    पर्सेंटाईल पद्धतीत सात दशांशापर्यंत वापर केल्यानंतरही टाय झाल्यास टायब्रेकरसाठी गणितातील उच्च पर्सेंटाईल, त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्रीमधील पर्सेंटाईल, संपूर्ण पेपरमध्ये कमीत कमी नकारात्मक पर्याय व सर्वांत शेवटी वय, म्हणजे ज्याचे वय अधिक त्याला प्राधान्य असे असेल.

    थोडक्यात पूर्वी तीन तासाच्या कालावधीत प्रत्येकी ३० प्रश्‍न असे ९० प्रश्‍न सोडविण्याची कसरत करावी लागत होती. आता प्रत्येक विषयाचे २५ प्रश्‍न असे एकूण ७५ प्रश्‍न सोडवावे लागणार आहेत, त्यातही प्रत्येक विषयाचे पाच प्रश्‍न अशा एकूण १५  प्रश्‍नांना नकारात्मक गुणदान नाही. त्यामुळे विद्यार्थांवरील वेळेचे नियोजन करताना येणारा प्रचंड ताण कमी होणार आहे.  प्रश्‍नांची संख्या कमी झाल्यामुळे ३६० गुणांवरून ही परीक्षा ३०० गुणांची झालेली आहे. 

पेपर-२ बीआर्च
    भाग १- गणित- वीस प्रश्‍न एमसीक्यू पद्धतीचे, नकारात्मक गुणदान पद्धत यासाठी असून, पाच प्रश्‍न संख्यात्मक मूल्याधारित असून त्यांना नकारात्मक गुणदान नाही.

    भाग-२ अॅप्टिट्यूड चाचणी - ५० प्रश्‍न असून २०० गुण आहेत. हे दोन्हीही भाग ऑनलाइन सीबीटी पद्धतीने होणार आहेत. 

    भाग-३- ड्राइंग- रेखांकन चाचणी- यामध्ये दोन प्रश्‍न हे ऑफलाइन पद्धतीने असून १०० गुणांची परीक्षा असेल, थोडक्यात एकूण ७७  प्रश्‍न व ४०० गुणांची परीक्षा आहे. 

टायब्रेकरसाठी गणित, योग्यता चाचणी, ड्राइंग, कमीत कमी नकारात्मक गुण व वय असा प्राधान्य क्रम असेल. पेपर-३- बी पलॅनिंग- भाग १ गणित- २० एमसीक्यू अधिक ५ संख्यात्मक, एकूण २५ प्रश्‍न प्रत्येकी ४ गुण अशी १०० गुण व २० एमसीक्यूसाठी नकारात्मक गुणदान पद्धत लागू आहे. 
भाग-२ योग्यता चाचणी, ५० एमसीक्यू, प्रत्येकी ४ गुण असे २०० गुण तसेच भाग-३- नियोजनाधारित ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रत्येकी चार गुणांचे २५ प्रश्‍न असतील. तीन तास कालावधीची १०० प्रश्‍नांची व ४०० गुणांची असून संपूर्ण परीक्षा ऑनलाइन सीबीटी पद्धतीने होणार आहे. टायब्रेकरसाठी गणित, योग्यता चाचणी, बी प्लॅनिंग- नियोजन व वय असा प्राधान्यक्रम असेल. वरील सर्व बदललेल्या पॅटर्ननुसार परीक्षा असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याने एनटीएकडून मोफत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मॉक टेस्टचा उपयोग मुख्य परीक्षेपूर्वी सरावासाठी केलाच पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com