आयआयएससी - बीएस्सी रिसर्च

Career
Career

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, बारामती, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
संशोधनाची प्रबळ परंपरा असलेली देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून आयआयएससी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर या संस्थेकडे पाहिले जाते. येथे २०११पासून चार वर्षांचा बीएस्सी रिसर्च विज्ञान पदवी (संशोधन) अभ्यासक्रम उपलब्ध आहे. 

अभ्यासक्रमाचे महत्त्व
संस्था स्थापनेपासून संस्थेत फक्त संशोधन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध होती. उच्च बुद्धिवंत विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा व त्यांच्या अंगी असणाऱ्या शास्त्रीय दृष्टिकोनाचा व संशोधन क्षेत्रात अभिरुची असलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या संशोधन व विकासाच्या कार्यासाठी करणे, बारावीनंतरच कमी वयातच मूलभूत विज्ञानात आवड असणाऱ्यांना संशोधनाची संधी देऊन त्यांच्यातील जिज्ञासा व निर्मिती क्षमता वाढविणे व त्याद्वारे तरुण शास्त्रज्ञ निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेवून बीएस्सी (रिसर्च) अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली. 

हा चार वर्षे कालावधीचा व आठ सेमिस्टरचा अभ्यासक्रम असून, पहिल्या तीन सत्रांत विज्ञान, गणित व अभियांत्रिकीच्या मूलभूत तत्त्वांचा अभ्यास असतो. चौथ्या सेमिस्टरच्या सुरवातीला प्रत्येकाला त्याच्या शैक्षणिक आवडीनुसार जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पृथ्वी व पर्यावरण विज्ञान, मटेरियल, गणित व भौतिकशास्त्र या सहापैकी एक विभाग स्पेशलायझेशनसाठी निवडता येतो. सातव्या सत्रात संशोधन प्रकल्प सुरू करणे व आठवे सत्र हे पूर्णपणे संशोधन प्रकल्पासाठी आहे. 

शैक्षणिक पात्रता
बारावी २०१ मध्ये पूर्ण केलेले, तसेच २०२०मध्ये बारावीची परीक्षा देणार आहेत, तसेच ज्यांनी बारावीदरम्यान मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र, रसायन आणि गणित हे तीनही विषय घेतले आहेत, त्याचप्रमाणे पीसीएमसह जीवशास्त्र, स्टॅटिटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स हे अतिरिक्त विषय असणारेदेखील विद्यार्थी या प्रवेशासाठी पात्र आहेत. खुला गट प्रथम श्रेणीसाठी ६० टक्के गुणांची तर राखीव गटासाठी सवलत आहे. 

प्रवेश परीक्षा
प्रवेशासाठी कोणतीही स्वतंत्र सीईटी परीक्षा घेतली जात नाही. 

    केव्हीपीवाय (एसए)-२०१८मध्ये परीक्षेला बसलेला व फेलोशिपसाठी निवडलेला विद्यार्थी, केव्हीपीवाय (एसबी)-२०१९ मध्ये बसलेला व फेलोशीपसाठी निवडलेला, केव्हीपीवाय (एसएक्स)-२०१९ मध्ये बसलेला व फेलोशीपसाठी निवडलेला विद्यार्थी यासाठी पात्र आहे. 
    आयआयटी, जेईई मेन-२०२० मध्ये परीक्षेला बसणारे विद्यार्थी. यामध्ये खुल्या गटासाठी ६० टक्के गुण, ओबीसी, एनसीएल, ईडब्ल्यूएससाठी ५४ टक्के, ३० टक्के एससी, एसटी व अपंग अशी किमान गुणांची अट आहे. 
    आयआयटी, जेईई अॅडव्हान्स्ड-२०२०मध्ये बसलेला व जेईई मेन प्रमाणेच किमान गुणांची पात्रता मिळविण्याची अट आहे. 
    नीट, युजी-२०२० मध्ये परीक्षेस बसलेला व जेईई प्रमाणेच किमान गुण मिळविणारा यासाठी पात्र आहे. 

प्रवेश प्रक्रिया
संस्थेच्या www.iisc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारीमध्ये उपलब्ध होतात. एप्रिल अखेरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असते. वरील पैकी कोणत्याही परीक्षेतून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची प्रत्येक परीक्षेसाठीची स्वतंत्रपणे गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. सुमारे १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. केव्हीपीवाय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची पहिली यादी मे महिन्यात जाहीर होते. उर्वरित प्रवेश प्रक्रिया जून-जुलैमध्ये राबविली जाते. देशपातळीवरील नियमानुसार एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांसाठी आरक्षण व शुल्क सवलती उपलब्ध आहेत. फक्त या पदवीनंतरच परदेशी विद्यापीठामध्ये पदव्युत्तर प्रोग्रामसाठी अर्ज करण्यास विद्यार्थी पात्र असतो. पदवीच्या चौथ्या वर्षानंतरच पाचव्या वर्षी त्याच संस्थेत मास्टर ऑफ सायन्सला प्रवेश घेण्याचा पर्याय निवडून दोन्हीही पदव्या एकाच वेळी घेता येतात. फक्त बॅचलर पदवीनंतरच भारतात पीएचडीसाठीची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा देता येते. आर्थिक क्षमतेचा प्रश्‍नच येत नाही. शैक्षणिक शुल्क फक्त १० हजार रुपये प्रतिवर्षी आहे. त्यामुळे प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा असते. या संस्थेत प्रवेशासाठी बौद्धिक क्षमता महत्त्वाची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com