पादत्राणे ‘डिझायनिंग’चा उद्योगाभिमुख अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
फुटवेअर डिझाईन अॅण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटची स्थापना वाणिज्य व उद्योग मंत्रालय भारत सरकारतर्फे १९८६ मध्ये झाली. एफडीडीआयचे मुख्यालय नोएडा या ठिकाणी असून ‘एफडीडीआय’कडे पॅन इंडिया असून देशभरात नोएडा, फुसरतगंज (उत्तर प्रदेश), अंकलेश्‍वर (गुजरात), गुना, छिंदवाडा (मध्य प्रदेश), रोहतक (हरियाना), जोधपूर, चेन्नई, पाटणा, हैद्राबाद, कोलकता व चंदीगड अशा बारा ठिकाणी अत्याधुनिक कॅम्पस आहेत. 

पादत्राणे व संबंधित उद्योगाच्या जलदवाढीस चालना देण्यासाठी योग्य ज्ञान आणि कौशल्य देऊन देशातील मानवसंसाधन विकसित करणे, या उद्योगास योग्य आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधा पुरवणे व त्या विकसित करणे, उत्पादनास आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देणे व निर्यातवाढीस प्रोत्साहन देणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत. या उद्योगातील प्रशिक्षित मनुष्यबळाची तीव्र कमतरता दूर करण्यासाठीच सदरच्या कॅम्पसची स्थापना केली.

अभ्यासक्रम - बॅचलर ऑफ डिझाईन - या चार वर्षे पदवी अभ्यासक्रमाच्या अंतर्गत फुटवेअर डिझाईन अॅण्ड प्रॉडक्शन, लेदर गुडस अॅण्ड अॅक्सेसरीज डिझाईन व फॅशन डिझाईन हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. 

    बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन या तीन वर्षे पदवी अभ्यासक्रमात रिटेल अॅण्ड फॅशन मर्चंटाईज यामधील बीबीए अभ्यासक्रम उपलब्ध आहे. 

    पदव्युत्तर पीजी- दोन वर्षे कालावधीचे मास्टर ऑफ डिझाईन अंतर्गत पादत्राणे, डिझाईन व उत्पादन, एमबीए अंतर्गत रिटेल व फॅशन माल, मास्टर ऑफ डिझाईन- कॅड, कॅम अभ्यासक्रम उपलब्ध आहे. 

    बॅचलर ऑफ डिझाईन- पादत्राणे डिझाईन व उत्पादनाच्या ८०० जागा, लेदर डिझाईनच्या ३५० जागा व फॅशन डिझाईनच्या ९०० जागा तसेच ‘बीबीए’च्या ५५० जागा सर्व कॅम्पसमधून उपलब्ध होतात.

    प्रवेशासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी अभ्यासक्रम कला, वाणिज्य, विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी एआयएसएटी- ऑल इंडिया सिलेक्शन टेस्ट देणे आवश्यक आहे. 

एआयएसटी- २०२० - अखिल भारतीय निवड चाचणी परीक्षा अडीच तास कालावधीमध्ये एमसीक्यू, चार पर्याय एक निवडा पद्धतीने देशपातळीवर एकाच वेळी सुमारे ३२ शहरांमध्ये (राज्यात पुणे, मुंबई) घेतली जाते. 

    प्रश्‍नपत्रिका चार भागात असते. विभाग अ - परिमाणयोग्यता ५० प्रश्‍न, विभाग ब - तोंडी क्षमता (व्हर्बल अॅबिलिटी) ५० प्रश्‍न, विभाग क - सामान्य ज्ञान ५० प्रश्‍न, विभाग ड - बिझनेस अॅप्टिट्यूड टेस्ट प्रश्‍न ५० असे एकूण २०० प्रश्‍न असतात. प्रत्येक योग्य उत्तरासाठी एक गुण असून चुकीच्या उत्तरास गुण वजा करण्याची पद्धत नाही. मागील प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

माहितीपत्रक व फॉर्मची उपलब्धता - एफडीडीआयच्या www.fddiindia.com संकेतस्थळावर माहिती पत्रक व ऑनलाइन फॉर्म दरवर्षी जानेवारी ते एप्रिलपर्यंत उपलब्ध होतो. परीक्षा मेमध्ये घेतली जाते व निकाल जूनमध्ये जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होते. अद्ययावत माहितीसाठी संकेतस्थळाच्या संपर्कात राहावे. 

    बॅचलर ऑफ डिझाईन म्हटले, की एनआयडी २०२०, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन तसेच आयआयटीमधील प्रवेशाची यूसीईडी २०२० परीक्षा समोर येते. परंतु त्यांची अर्ज भरणे व परीक्षा मुदत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच संपते. अशा विद्यार्थ्यांना एफडीडीआयमधून प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे. 

    एफडीडीआयमध्ये पादत्राणे डिझाईनबरोबरच फॅशन डिझाईन अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. फॅशन डिझाईन म्हटले की, एनआयएफटी- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी व त्यांचे देशभरातील सोळा कॅम्पसमधून उपलब्ध होणाऱ्या ४७५ जागा असे गणित असते. मात्र एफडीडीआय अंतर्गत फॅशन डिझाईनसाठी सुमारे ९०० जागा उपलब्ध होतात. परीक्षाही उशिरा मेमध्ये असते. एफडीडीआयच्या कौशल्य विकासाच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे तसेच समकालीन उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि कला, मशीन व कार्यशाळेच्या अनुभवावर आधारित असल्याने एफडीडीआयमधून उत्कृष्ट प्लेसमेंट होतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article hemchandra shinde edu supplement sakal pune today