केव्हीपीवायचा ऑनलाइन अर्ज भरताना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये सध्या विज्ञान शाखेत अकरावी, बारावीत पीसीएमबी अथवा पीसीबी विषय असणारा विद्यार्थी, तसेच प्रथम वर्ष पदवीपूर्व बेसिक सायन्सेसमधील अभ्यासक्रमात शिकत असलेला कोणताही विद्यार्थी किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना केव्हीपीवाय २०१९ परीक्षेसाठी पात्र आहे. 

परीक्षेचे वेळापत्रक 
www.kvpy.iisc.ernet.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज ८ जुलै ते २० ऑगस्ट या कालावधीत उपलब्ध आहेत. अॅडमिट कार्ड ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून संकेतस्थळावर डाउनलोडसाठी उपलब्ध होतील. परीक्षा देशभरातील १११ मुख्य शहरांमध्ये ३ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार असून राज्यातील अमरावती, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांचा परीक्षा केंद्रात समावेश आहे.

अर्ज भरण्याचे महत्त्वाचे टप्पे -
१.     ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे 
२.     स्वतःची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरणे. परीक्षा केंद्र निवडणे.
    फोटो, स्वाक्षरी व इतर कागदपत्रे अपलोड करणे.
३.     ऑनलाइन पद्धतीने डेबिट, क्रेडिट कार्ड अथवा नेटबॅंकिंगद्वारे अर्जाचे शुल्क भरणे, त्यानंतर अर्जाची प्रिंट घेणे, परीक्षा शुल्क खुला व ओबीसीसाठी १ हजार रुपये व एससी, एसटीसाठी ५०० रुपये आहे. 

अर्ज भरण्यापूर्वी
    आपला कायमस्वरूपी अथवा पुढील वर्षभर न बदलणारा मोबाईल क्रमांक, चालू स्थितीतील ई-मेल आयडी व शैक्षणिक माहिती तयार ठेवावी. १५० केबीपेक्षा कमी आकाराचा पासपोर्ट फोटो, ६० केबी पेक्षा कमी आकाराची स्वाक्षरी, जेपीईजी फॉर्मेटमध्ये पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवावी. गरजेनुसार इतर कागदपत्रे ३०० केबीपेक्षा कमी आकारात स्कॅन करून ठेवावीत.
    आपण कोणत्या स्ट्रीममधून म्हणजेच एसए (अकरावीमध्ये), एसएक्स (बारावीमध्ये) आणि एसबी (प्रथम वर्ष पदवीपूर्व) फॉर्म भरणार आहात, त्याची पात्रता प्रथम तपासावी. संकेतस्थळावरील सर्व माहितीचा अभ्यास करावा. अर्ज भरण्यासाठी भरपूर कालावधी उपलब्ध आहे. 

परीक्षा कोणी द्यावी -
    ज्यांना मूलभूत विज्ञानात आवड आहे, शास्त्रीय संशोधनात रुची आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यावी.

    अत्यंत नामांकित अशा आयसर (भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था) बेहरामपूर, भोपाळ, कोलकाता, मोहाली, पुणे, तिरुवअनंतपुरम व तिरुपती या सात संस्थांमधील बीएस-एमएस (ड्युएल डिग्री) अंतर्गत एकूण सुमारे १५०० उपलब्ध होणाऱ्या जागांपैकी २५ टक्के जागा किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनामधील मेरीटनुसार भरल्या जातात. 

    भारतीय विज्ञान संस्थान बंगळूर (आयआयएससी) या अग्रगण्य संस्थेतील चार वर्षाच्या बॅचलर ऑफ सायन्स (संशोधन) मधील प्रवेश केव्हीपीवाय मेरीटनुसार होऊ शकतात.

थोडक्यात प्रत्येक शैक्षणिक वर्षात सर्वांत प्रथम अर्ज उपलब्ध होतो तो केव्हीपीवाय परीक्षेचा! राज्यात दहावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखांत असते. दहावी आणि अकरावी, बारावी अभ्यासक्रमात फार मोठा बदल असतो. या विद्यार्थ्यांना आपण देशपातळीवर नेमके कोठे आहोत, हे शोधण्यासाठी सध्याच्या विज्ञान शाखेत अकरावीमधील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलीच पाहिजे. यश मिळो अथवा न मिळो, परंतु या परीक्षेनंतर भविष्यातील शिक्षणाची दिशा ठरविण्यासाठी उपयोग होऊ शकतो. सध्या अकरावीतील विद्यार्थ्यांनी कोणताही अतिरिक्त अभ्यास न करता फक्त २००९ पासून उपलब्ध असणाऱ्या एसए स्ट्रीमच्या प्रश्‍नपत्रिका सोडवून परीक्षा देऊन स्वतःला सिद्ध करण्याची संधी सोडू नये. यश न आल्यास याच अकरावीमध्ये दिलेल्या परीक्षेच्या अनुभवाच्या जोरावर पुढील वर्षी बारावीमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा केव्हीपीवाय देऊन यश मिळवता येते याची नोंद घ्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Hemchandra Shirke edu supplement sakal pune today