जपानमध्ये शिक्षण घेताना...

हेरंब कुलकर्णी
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

जावे त्यांच्या देशा 

फिनलॅंड या उत्तर युरोपातील देशाच्या शिक्षणपद्धतीचा विचार केल्यानंतर आता आपण पूर्व आशियामध्ये जपान या देशात शैक्षणिक सहलीसाठी निघत आहोत. 

जपान हा आशिया खंडामधील पूर्वेकडचा देश. देशाची लोकसंख्येची घनता आहे प्रति चौरस किलोमीटरला 334 माणसे. देशाची एकूण लोकसंख्या सुमारे 12 कोटी 64 लाख आहे. देशाचे क्षेत्रफळ 3 लाख 77 हजार चौरस किलोमीटर आहे. अशा या जपान देशाच्या शिक्षणपद्धतीचा आढावा या लेखमालेत आजपासून आपण घेणार आहोत. 

जपानची शिक्षणपद्धती अगदी फिनलॅंड या देशासारखी नसली, तरीही काही तत्त्वांच्या बाबतीत या दोन शिक्षणपद्धतींमध्ये साधर्म्य पाहायला मिळेल. जपानच्या शिक्षणपद्धतीकडेही जगातील अनेक राष्ट्रे एक आदर्श शिक्षणपद्धती म्हणून पाहतात. जपान या देशातील लोक हुशार, मेहनती, आरोग्यसंपन्न आणि कमालीचे नम्र असतात, हे अनेकांना माहीत आहे. त्यांची शिक्षणपद्धती या लोकांना अधिक वैशिष्ट्यपूर्ण बनवते, असे म्हणावे लागेल. या लेखमालेच्या पद्धतीप्रमाणे फिनलॅंड या देशाच्या शिक्षणपद्धतीत बलस्थानांचा आढावा घेतल्यावर आता आपण जपानच्या शिक्षणपद्धतीतील काही महत्त्वाच्या घटकांचा आढावा घेणार आहोत. 

जपानच्या शिक्षणपद्धतीत वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत मोठ्या परीक्षा घेतल्या जात नाहीत. या वयापर्यंत मुलांच्या नैतिक मूल्यविकसनाकडे, सुसंस्कार आणि जीवनपद्धतीकडे लक्ष देण्याकडे जपानी लोकांचा भर दिसतो. जपानी मुलांच्या आहाराकडे शाळांमधूनच विशेष प्रकारचे लक्ष पुरवले जाते. या देशातील मुले शाळेतील तास अजिबात चुकवत नाहीत. जपानच्या शाळांतील हजेरीचा दर तब्बल 99.99 टक्के इतका जास्त असतो. जपानच्या शिक्षणपद्धतीविषयी आणि त्यातील या आणि अशा वैशिष्ट्यांविषयी अधिक जाणून घेऊया पुढील लेखांमध्ये... 

Web Title: Article by Heramb Kulkarni in EDU of Sakal Pune Today about Japaneses Education