तिमिरातूनी तेजाकडे...

children
children

जावे त्यांच्या देशा

आपण गेले काही आठवडे विविध देशांतील शिक्षणपद्धती आणि शिक्षणव्यवस्थांविषयी माहिती घेत आहोत. फिनलॅंड या देशातील शिक्षणपद्धतीविषयी काही बलस्थानांचा आपण विचार केला, त्याचा थोडक्‍यात आढावा घेऊ. फिनलॅंडमधील शिक्षणपद्धतीत महत्त्वाची भूमिका असते ती शिक्षकाच्या शिक्षणाची.

फिनलॅंडमधील प्रत्येक शिक्षक पाच वर्षांचा उच्चशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेला असतो. यामुळे त्यांच्यात आपसूकच विषयाचे संपूर्ण ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रगल्भता दिसून येते. शिक्षक होण्याच्या पात्रता परीक्षेचा निकाल केवळ 10 टक्के लावला जात असल्याने उत्तमातले उत्तम शिक्षकच निवडले जातात. त्यामुळे अशा सर्व पातळ्यांवर कसोट्यांना सामोरे गेलेला एक उत्तम शिक्षक विद्यार्थिविकासासाठी कठिणात कठीण निर्णयही सहज घेऊ शकतो.

फिनलॅंडमध्ये शिक्षकाप्रमाणेच विद्यार्थी या घटकाकडे विशेष लक्ष पुरवले जाते. विद्यार्थ्याला काही परिस्थिती निर्माण करून त्यातून मार्ग काढायला शिकवत सामान्य विषयांचे शिक्षण दिले जाते. स्वयंप्रेरणेतून शिक्षणाची पद्धत दिसते. शिक्षकच धडा वाचून शिकवत आहे, असे चित्र दुर्मीळ. त्याऐवजी अनुभवातून विद्यार्थ्यांना शिकायला लावले जाते.

शाळांचे वैशिष्ट्य म्हणजे दर 45 मिनिटांच्या अभ्यासाच्या तासानंतर मुलांना दिली जाणारी 15 मिनिटांची मोकळीक. ही मोकळीक मेंदूसाठी अत्यंत आवश्‍यक असते, त्या छोट्या काळानंतर पुढची 45 मिनिटे मेंदू ताजातवाना राहून शिकण्याचे कार्य सुरू ठेवू शकतो, असा तेथील शास्त्रज्ञांचा अभ्यास सांगतो. अशा प्रकारच्या शिक्षणाला "स्पेस लर्निंग' असे नाव देण्यात आले आहे.

फिनलॅंडच्या शिक्षणपद्धतीचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येते, की देशात लहान मुलांच्या शिक्षणावर जास्त प्रमाणात लक्ष पुरवले जाते. प्री स्कूलमधील मुलाच्या शिक्षणासाठी दरवर्षी प्रति विद्यार्थी 12 हजार युरो खर्च केला जातो. या वयात मुलांना योग्य ज्ञान दिल्यानंतर नंतरच्या काळात उच्च शिक्षणासाठी केला जाणारा खर्च कमी, म्हणजे 8 हजार युरो प्रति विद्यार्थी केला जातो.

लहान वयात मुलांच्या शिक्षणाकडे दिलेले लक्ष एक चांगला समाज बनवते, हा फिनलॅंड या देशाचा मूलमंत्र आहे, असे म्हणता येईल.
देशाची शिक्षणपद्धती प्रत्येक गोष्टीचा विचार मुळापासून करते. "सूक्ष्माकडून स्थूलाकडे, तिमिरातूनी तेजाकडे' असा प्रवास ही पद्धती साधते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

या लेखमालेतील सर्व देशांच्या शिक्षणपद्धतीचा विचार करून नंतर त्यांची भारतीय शिक्षणपद्धतींबरोबर तुलना करण्याचा आणि त्यातून शिकण्याचा मानस असल्याने येथे त्याबाबत लिखाण होणार नाही. फिनलॅंडच्या शिक्षणपद्धतीचा आढावा घेतल्यानंतर पुढील भागात आपण जपानच्या शिक्षणपद्धतीविषयी जाणून घेऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com