अमेरिकेतील शिक्षणपद्धतीची वैशिष्ट्ये

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, परदेशी शिक्षणविषयक अभ्यासक
‘जावे त्यांच्या देशा’ या लेखमालेत आपण आत्तापर्यंत फिनलंड, जपान, सिंगापूर, एस्टोनिया, डेन्मार्क या देशांतील शिक्षणपद्धतीचा, शिक्षण व्यवस्थेचा विचार केला. गेल्या आठवड्यापासून आपण अमेरिकेतील शैक्षणिक प्रवासाला सुरवात केली आहे. अमेरिकेतील शिक्षणपद्धतीच्या काही वैशिष्ट्यांचा आणि गुणांचा प्रथम आढावा घेऊ. अमेरिकेतील शिक्षणपद्धतीचे महत्त्वाचे अंग म्हणजे येथील उच्चशिक्षण! 

अमेरिकेत उच्चशिक्षणाचा स्तर अत्यंत उत्तम आहे. कारण हे शिक्षण औद्योगिकतेच्या आणि आधुनिकतेच्या अत्यंत जवळ आहे. येथे प्रत्येक कष्टकऱ्याच्या बुद्धिमत्तेची कदर तर होते, त्याच्या हुशारीवर एखादा माणूस लहान किंवा मोठा हे ठरते, त्याचबरोबर त्याचा व्यावसायिक दृष्टिकोनही विचारात घेतला जातो. यामुळे मुळात बुद्धिमत्तेने युक्त मनुष्य या देशात अधिक उत्तम प्रकारे प्रयत्न करतो आणि व्यावसायिकतेची कासही सोडत नाही. याचा फायदा असा होतो, की एखाद्या उत्तम प्रतीचे संशोधन करणाऱ्या प्राध्यापकाच्या हाताखाली वावरणारी मुलेही त्याच तोडीचे कष्ट घेऊन प्रगती करतात. यामुळे उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या मुलांनाही अशा प्राध्यापकांकडून कामाची तळमळ आवड इत्यादी संपूर्ण तपासूनच प्रवेश मिळतो. एकप्रकारची प्रत राखली जाते. प्राध्यापक, त्याचा चांगला विषय, यांमुळे त्याचे चांगले विद्यार्थी आणि अंतिमतः या विद्यार्थ्यांचा विषयाचा उत्तम अभ्यास हे असे उत्तमतेचे चक्र विद्यापीठांमध्ये सतत सुरूच राहते. 

प्रत्येक उत्तमता असलेला मनुष्य यामुळेच आपल्या मताविषयी जगाच्या बाजारात ठाम राहण्याचे सामर्थ्य दाखवून उत्तम प्राध्यापकाबरोबर खेळीमेळीची स्पर्धा घडवून आणू शकतो. अशा प्रकारे उच्च शिक्षणातील गुणवत्ता टिकवून ठेवली जाते. यामुळे अंतिमतः या देशाला अशा अभ्यासू लोकांची साथ मिळत राहते. औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या लोकांकडून शिक्षण संस्थांना भेटी दिल्या जातात किंवा अशा भेटी जाणूनबुजून घडवून आणल्या जातात. यातून विद्यार्थ्यांना अधिक कार्यक्षमतेचा उपदेश नकळत केला जातो. हे अमेरिकेतील शिक्षण व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Heramb Kulkarni edu supplement sakal pune today