जपानमध्ये सांस्कृतिक वारसा जपण्याचे शिक्षण

हेरंब कुलकर्णी
गुरुवार, 14 मार्च 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

जावे त्यांच्या देशा 

जपानमधील शाळांमध्ये असलेल्या स्वच्छतेची व्यवस्था पाहिल्यानंतर आता येथे शाळांमध्ये घडणाऱ्या आणखी दोन रंजक गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत. 

पोषण आहार : जपानच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या वयाला अनुकूल असा शरीर आणि मनाच्या विकासालाही पोषक असा सात्त्विक आहार शाळेतच दिला जातो. आरोग्यदायी आणि संतुलित आहार विद्यार्थ्यांना मिळाल्यास त्यांची कार्यक्षमता वाढते, असा या शिक्षणपद्धतीचा विश्‍वास आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी लागणार स्वयंपाक शाळेतच अनुभवी आचाऱ्यांकडून करवून घेतला जातो आणि खाद्यपदार्थ विज्ञान विषयात पारंगत अशा कर्मचाऱ्यांकडून तपासून घेऊन ठरलेल्या प्रमाणेच पदार्थ बनवले जातात.

जपानमधील शाळांतील भोजनाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थी आपले सहाध्यायी आणि शिक्षक यांच्यासमवेत बसून भोजन करतात. एकत्र भोजनादी क्रियांमधून शिक्षण आणि विद्यार्थी यांच्यातील अवघडलेपणा कमी होऊन शिक्षणपद्धतीत अडथळे कमी होतात, असा येथील शिक्षकांचा अनुभव सांगतो. "सह नौ भुनक्‍तू' या ऋग्वेदातील परंपरेचाच आदर्श येथे घेतला आहे की काय, असे क्षणभर वाटते. 

सांस्कृतिक वारशाचे जतन : जपानच्या शिक्षणव्यवस्थेत अजून एक महत्त्वपूर्ण असा हा मुद्दा. जपानच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना जॅपनीज कॅलिग्राफी, म्हणजे "शोडो' ही कलासुद्धा शिकवली जाते. बांबूपासून बनवलेल्या ब्रशने भातापासून बनवलेल्या कागदावर शाईने अक्षरे सुंदर रेखाटण्याची ही कला म्हणजे जपानची एक वेगळीच ओळख आहे. अशा प्रकारच्या अनेक कला जपानच्या शाळांमध्ये शिकवल्या जातात.

त्याचबरोबर हायकू ही काव्य गायनाची आणि निर्माणाची पद्धतही शिकवली जाते. अशा प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक गोष्टींविषयी प्रेम निर्माण व्हावे, त्यांना जपानच्या संस्कृतीविषयी अधिकाधिक माहिती मिळावी यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरते. अशा प्रकारे उत्तम आहार, उत्तम सांस्कृतिक वारशाची जपणूक आणि अत्यंत स्वच्छता ही जणू या देशाची ओळखच बनली आहे. 

Web Title: Article by Heramb Kulkarni on Japaneses nutritional food in edu supplement of Sakal Pune Today