माणुसकीचा ठसा उमटविणारे जगन्नाथ वाणी!

संदीप पुणेकर
शनिवार, 6 मे 2017

कॅनडा इंटरनॅशनल डेव्हलमेंट एजन्सीच्या मदतीने देशाच्या दुर्गम भागातील ४० हजार विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी आणि उपचाराचे एक उद्दिष्ट संस्थेच्या अजेंड्यावर आहे. सोबतच अपंगांसाठी काम करणारा कोल्हापुरातील हेल्पर्स ऑफ हँडीकॅप, निराधार-बाल मजुरांसाठीचा अवनी प्रकल्प, नीलिमा मिश्रांचे बहादरपुरातील काम यासारख्या अनेक संस्थांना, सामाजिक कार्यांना या संस्थेमार्फत मदत केली जाते. सध्या या संस्थेचे ते मानद अध्यक्ष आहेत

(संदीप पुणेकर यांच्या 'फेसबूक' पोस्टवरून साभार) 

कॅनडातील मॅकगील विद्यापीठातून गणितात पीएचडी आणि त्यानंतर कॅनडातल्याच कॅलगरी विद्यापीठात गणिताचे अध्यापन करताना प्रा. जगन्नाथ वाणी यांनी आपला समाजसेवेचे सूत्र कधी सोडले नाही. कॅनडातून भारतातील उपक्रमांना भरघोस अर्थसाह्य मिळवून दिले व स्वतःही संगीत , चित्रपटनिर्मिती अशा अनेक प्रांतात वेगळा ठसाही उमटविला. विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्याचा गौरव कॅनडा सरकारने सर्वोच्च सन्मान देऊन केला.

स्वातंत्र्योत्तर काळात भाषिक राज्यांचे पूर्ण विभाजन व्हायचे होते तो काळ... 
सन १९५४ मध्ये मुंबई बोर्डातून परीक्षा दिलेल्या १ लाख विद्यार्थ्यांमधून मेरिटमध्ये आलेल्या पहिल्या १५ जणांमध्ये फक्त एक मराठी विद्यार्थी होता, त्याचे नाव जगन्नाथ वाणी. पुढे गणितामध्ये फर्ग्युसनमधून बीएस्सी, पुणे विद्यापीठातून एमएस्सी पूर्ण करत त्यांनी धुळ्याच्या कृषी महाविद्यालयात अर्धवेळ नोकरी आणि शिकवण्या सुरू केल्या. स्वातंत्र्याला दहा वर्षेही पूर्ण झालेली नव्हती तेव्हाही त्यांना वशिलेबाजी, अंतर्गत राजकारण यामुळे मनासारखी नोकरी मिळाली नाही.

अखेर कॅनडात गेलेल्या जी. पी. पाटील या मित्राच्या मदतीने कॅनडातील मॅकगील विद्यापीठात गणितात पीएचडीची संधी असल्याचे त्यांना कळले आणि १९६२ मध्ये त्यांनी बोटीने कॅनडाकडे कूच केले. पण कॅनडात उत्कर्ष होत असतानाही त्यांनी भारतातील समाजकार्याशी नाळ तोडली नाही.

पुढे १९६७ मध्ये पीएचडी पूर्ण केल्यावर १९६९ मध्ये कॅनडातील कॅलगरी विद्यापीठात त्यांनी प्राध्यापकी सुरू केली. ती सुरू असताना त्यांनी १९७३ मध्ये पौर्वात्य, तर १९७५ मध्ये भारतीय संगीत व नृत्याचा तेथील रसिकांना लाभ व्हावा म्हणून संस्था सुरू केली. याच विषयावर पुढे १९८४ मध्ये त्यांनी बांसुरी हे इंग्लिश नियतकालिक सुरू केले आणि १९९४ पर्यंत त्याचे संपादकपद भूषविले.

कॅनडातील भारतीयांचा महाराष्ट्राला काहीतरी उपयोग व्हावा या उद्देशाने १९८४ मध्ये महाराष्ट्र सेवा समितीची कॅनडात स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या समाजकार्याला सुरुवात झाली. या संस्थेच्या माध्यमातून देशातील आदिवासी, कुष्ठरोगी, शेतकरी, भूकंपग्रस्त आणि इतर अनेक गरजूंना ७० लाख डॉलरहून अधिक मदत झाली आहे.

कॅनडा इंटरनॅशनल डेव्हलमेंट एजन्सीच्या मदतीने देशाच्या दुर्गम भागातील ४० हजार विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी आणि उपचाराचे एक उद्दिष्ट संस्थेच्या अजेंड्यावर आहे. सोबतच अपंगांसाठी काम करणारा कोल्हापुरातील हेल्पर्स ऑफ हँडीकॅप, निराधार-बाल मजुरांसाठीचा अवनी प्रकल्प, नीलिमा मिश्रांचे बहादरपुरातील काम यासारख्या अनेक संस्थांना, सामाजिक कार्यांना या संस्थेमार्फत मदत केली जाते. सध्या या संस्थेचे ते मानद अध्यक्ष आहेत.

प्राध्यापकी करत असताना त्यांनी कॅलगरी विद्यापीठात विमाशास्त्र अभ्यासक्रम, कमवा आणि शिका, पुणे विद्यापीठाच्या संयोगातून परदेश सत्र अभ्यासक्रम, तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात देशातील पहिला विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रोत्साहन यासारखी कामे केली. आता निवृत्तीनंतरही विद्यापीठात प्रोफेसर एमिरेट्स या पदावर ते कार्यरत आहेत.

पत्नीच्या आजारपणातून धडा घेत त्यांनी १९८० मध्ये स्किझोफ्रेनिया सोसायटी ऑफ अल्बर्टा तसेच कॅलगरी विद्यापीठात स्किझोफ्रेनियावर संशोधन व अध्यासनाची निर्मिती व शिष्यवृत्ती सुरू केली. भारतातही १९९७ मध्ये या विषयावर स्किझोफ्रेनिया अवेअरनेस सोसायटीची त्यांनी स्थापना केली. तसेच 'देवराई' या रजत पदक प्राप्त चित्रपटाची निर्मितीही केली. या व्यतिरिक्त माहिती अधिकार, मूक-बधीर मुलांविषयी जनजागृती करणारे माहितीपटही संस्थेने तयार केले. त्यांच्या याच जीवनकार्यावर कॉन्टिनेंटल प्रकाशनाने अंधारातील प्रकाशवाटा आणि धुळ्यातील का. स. वाणी मेमोरियल ट्रस्टने Triumphs and Tragedies' ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. उत्तुंग कार्याबद्दल गेल्यावर्षी त्यांना कॅनडा सरकारने सर्वोच्च अशा 'ऑर्डर ऑफ कॅनडा' या पुरस्काराने गौरविले आहे.

Web Title: Article on Jagannath Wani by Sandip Punekar