रंगसंवाद : अमूर्त अक्षरखेळ

Ojas-Parkhi
Ojas-Parkhi

फाइन आर्ट, इलस्ट्रेशन, संगीत, स्कल्पचर आणि चित्रपट अशा कलामाध्यमांत मुशाफिरी करणारे पुण्याचे प्रसिद्ध चित्रकार ओजस पारखी. लॉकडाउन काळात त्यांनी ‘टायपोस्केप्स’ ही चित्रमालिका साकारली. लहानपणी त्यांना चित्रांबरोबरच अक्षरेही काढायला आवडायची. एखादा शब्द किंवा नाव घेऊन त्यापासून लोगो तयार करण्याचा सराव ते तासन्‌तास करत असत. पुढे कला महाविद्यालयात गेल्यावर ‘टायपोग्राफी’ या विषयाबद्दल गोडी निर्माण झाली. टायपोग्राफी म्हणजे अक्षरांना सुवाच्य, वाचनीय आणि आकर्षक बनविण्याची कला. लॉकडाऊनमध्ये केलेल्या ‘टायपोस्केप्स’ या चित्रमालिकेचे मूळही त्यांच्या या कलाप्रवासातील संस्कारात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपण विचार करतो, लिहितो, बोलतो तेव्हा मनात अक्षरांच्या किंवा शब्दांच्या सुसंगत रचना तयार करतो. या रचना भाषेला मूर्त स्वरूप देतात. ‘टायपोस्केप्स’ या चित्रमालिकेत मनातल्या याच अक्षरांच्या रचना ओजस यांनी अमूर्त स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इथे अक्षर हे फॉर्म म्हणून त्यांनी वापरलेय. कॅलिग्राफीप्रमाणे मनमुराद भटकण्याचे स्वातंत्र्य छापील अक्षरांना नसल्यामुळे, त्यांच्या मूळ स्वभावाला आणि सौंदर्यस्थळांना धक्का न लावता ओजसच्या रचना कॅनव्हासवर आकार घेतात. या कलाकृतींचा दृश्य परिणाम, केवळ अक्षरातून होणाऱ्या अर्थबोधापुरता मर्यादित न राहता, अंतररंगातील भावनांशी संवाद साधणारा असावा, असा ओजस यांचा या कलाकृतींमागील चित्रविचार आहे.

या चित्रमालिकेत लॉकडाऊनपूर्वी मनात साठलेला अवतीभवतीचा गजबजाट, कोलाहल आणि लॉकडाऊननंतर अचानक वाढत गेलेली अंतर्मुखता, संवादांचे बदललेले स्वरूप आणि त्यामुळे निर्माण झालेला अवकाश ओजस यांनी प्रतिबिंबित केला आहे. टायपोग्राफीला शुद्ध स्वरूपात पेंटिंगप्रमाणे कॅनव्हासवर साकारण्याचे फार कमी प्रयोग भारतात झाले आहेत. लॉकडाऊन काळात या माध्यमात ओजस यांनी अनेक प्रयोग करून त्याची मालिका साकारली आहे. 

ओजस पारखी यांनी २००० मध्ये पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयांतून कमर्शिअल आर्टची पदवी घेतली. विविध जाहिरात संस्थांमधून ग्राफिक डिझायनर ते कलादिग्दर्शक असा प्रवास करत सध्या एका जाहिरात संस्थेत ‘क्रिएटिव्ह डिरेक्‍टर'' म्हणून ते कार्यरत आहेत. २०१० पासून सलग तीन वर्ष ‘आर्ट डिरेक्‍टर ऑफ द इयर’चे राज्यस्तरीय पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या डिझाईन स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे त्यांनी कमावली आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड्‌ससाठी काही गाजलेल्या जाहिरातींची निर्मिती आणि अनेक चित्रपटांची पब्लिसिटी डिझाइन्स केली आहेत. पाठ्यपुस्तकांसाठी चित्रे आणि अनेक पुस्तकांची मुखपृष्ठेही केली आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com