रंगसंवाद : ‘डर’ जरुरी है

रंगसंवाद : ‘डर’ जरुरी है

कलावंत जे अनुभवत असतात, ते त्यांच्या कलाकृतीतही मांडत असतात. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी झालेल्या लॉकडाउनच्या काळात प्रसिद्ध चित्रकार डॉ. गणेश तरतरे यांना वेगवेगळे अनुभव आले. घरात राहण्याच्या सक्तीमुळे त्यांनी रामायण-महाभारत या कलाकृती पुन्हा पाहिल्या. आधुनिक आणि तत्कालीन तंत्राची तुलना केली. सोबतच सद्‌गुरू ईश्‍वर शिवाचार्य महाराज यांच्या चरित्रलिखाणाचे कामही केले. याच काळात आवश्‍यक ती काळजी घेऊनही परिवारातील सर्व सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते अस्वस्थही झाले. ते त्यांच्या ड्रॉइंगमध्ये उमटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

क्वारंटाइन काळात जीवनाचे मूल्य त्यांना अधिक तीव्रतेने समजत होते. भूतकाळात ज्यांचे उपकार होते, त्यांची आठवण झाली. चुकीचे वागलेल्यांनाही क्षमा करावी आणि त्यांना एकदा भेटावे, असे वाटत होते. मृत्यूच्या भीतीने त्यांना बदलून टाकले. या सगळ्या अनुभवावर ते म्हणतात, ‘‘चांगलं होण्यासाठी ‘डर’ जरुरी है.’’

वेगवेगळ्या विद्यापीठांतून कला शिक्षण घेऊन डॉ. गणेश तरतरे यांनी पेंटिंग ॲण्ड ड्रॉइंगमध्ये पीएचडी केली आहे. आता ते सर जे. जे. स्कूलमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील यावलचा. कल्याणमध्ये वास्तव्याला असणारे डॉ. तरतरे अध्यापनकार्यात व्यग्र असतानाही ते स्वत:च्या निर्मितीप्रक्रियेपासून दूर गेले नाहीत. लॉकडाउनच्या काळात त्यांनी चारकोल, पेन्सिलच्या माध्यमातून ड्रॉइंग केली. या चित्रांचा आकार लहान आहे, लघुचित्रांसारखा. या कलाकृतीत अर्थातच पांढऱ्या आणि काळ्या रंगांचा प्रभाव आहे. परंतु, या प्रक्रियेमध्ये त्यांना रंगांची उणीव जाणवली नाही. पांढरा म्हणजे तेज, काळा म्हणजे निरव शांतता आणि अनंत अवकाशाची जाणीव. ते एकमेकांना पूरक आहेत. पांढरा व काळा या रंगांची ही श्रीमंती असते. पण, कोरोनाकाळात ब्लॅक आणि व्हाइट रंग त्यांना निस्तेज झाल्याचे जाणवत होते. एखाद्या उदास सायंकाळसारखा हा लॉकडाउनचा काळ त्यांना वाटला. हा अनुभव यापूर्वी कधी आला नव्हता. तो त्यांनी त्यांच्या कलाकृतीत मांडला आहे.

डॉ. तरतरे पहिल्यापासूनच अमूर्त चित्रात अडकले आहेत. याविषयी ते सांगतात, ‘‘अविषयामुळे कलेच्या मूलभूत अंगाला लवकर स्पर्श करता येतो. भौतिक व सामाजिक व्यवस्थेपासून लवकर अलिप्त होता येते व त्यातून आविष्काराचे मार्ग प्रशस्त होतात व मुक्ती समीप येते. अर्थात, ‘अभिव्यक्ती मुक्तीसाठी’. मुक्ती म्हणजे दीर्घ उसंत, शांती, आनंदासमान अवस्था.’’ 

डॉ. तरतरे यांनी आजवर असंख्य कलाकृतींची निर्मिती केली आहे. त्या कलाकृती देशभरातील महत्त्वाच्या कलादालनांत प्रदर्शित झाल्या आहेत. त्यांच्या कलाकृतींना कला क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. लॉकडाउन काळातील या कलाकृती त्यांच्या चित्रसंग्रहाची श्रीमंती वाढविणाऱ्या ठरणार आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com