तुझी आठवण येते...! (मुरलीधर म्हात्रे)

Murlidhar-Mhatre
Murlidhar-Mhatre

चालता चालता माझं मन विचारांशी चाळा करू लागलं. माझ्याविषयी खरंच तिच्या मनात थोडीफार तरी ओढ निर्माण झाली असेल का? की तिनं ‘जाते’ म्हणून सांगण्यासाठी हलवलेली मान ही केवळ मी तिच्या वर्गातला आहे म्हणून तिनं औपचारिकता म्हणून हलवली असेल?

दिवस कॉलेजचे. मोरपंखी स्वप्नांचे. तरुण मनाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारे. त्या काळातल्या आठवणी तर किती! असंख्य, अगणित...कितीही वर्षं सरली तरी त्यांची उत्कटता तीच...अगदी कालच घडल्यासारखी.

काही आठवणी तर अशा, की त्यांची हुरहूर कधी संपतच नाही. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या हुरहूर लावतात...अशीच एक अविस्मरणीय घटना माझ्या कॉलेजजीवनात घडलेली...!

मी ठाणे कॉलेजात एसवायबीएला प्रवेश घेतला. माझा विषय मराठी; त्यामुळं वर्गात विद्यार्थीही मर्यादितच. वर्गात मुलांपेक्षा मुलींचीच संख्या जास्त. परिणामी, अधिराज्य त्यांचंच. विद्यार्थी मर्यादित असल्यामुळं प्रत्येक जण एकमेकाला चांगलाच परिचित होता. मुला-मुलींना एकमेकांशी बोलायला संकोच वाटत नसे. एक प्रकारचा बिनधास्तपणा होता. मात्र, तरीही काही मुलं-मुली यापासून तशी दूरच असत. अलिप्त. ऑफ पीरिअड असला की मुला-मुलींचा गप्पांचा फड रंगायचा. जणू ते ऑफ पीरिअडची वाटच पाहत असावेत असं वाटायचं. मग उगाच थट्टामस्करी चाले. हसणंही जोरजोरात. आम्ही काही मुलं मात्र शेवटच्या बाकावर गुपचूप बसून हे फक्त पाहत असायचो.

त्यात माझा स्वभाव मुळातच बुजरा. मी मोजकंच बोलणारा. उगाच फालतू बडबड मला अजिबात नाही आवडायची. कॉलेजमध्ये जे दोन-चार मित्र होते ते सगळे खेळाडू. कुणी कॅरम, कुणी टेबल-टेनिस तर कुणी कबड्डीमध्ये रमून जायचं. त्यामुळं माझ्यासोबत कुणीच नसे. म्हणून स्टडीरूममध्येच जास्त वेळ घालवायचा, असं मी ठरवलं. असाच एकदा मी स्टडीरूममध्ये गेलो.

स्टडीरूम ऐसपैस होती. दुपारची वेळ असल्यामुळं मुला-मुलींची संख्या तिथं तशी तुरळकच होती. मी एका खिडकीजवळच्या खुर्चीत बसलो. पुस्तक काढलं. बाहेरून हवेचा झोत अंगाला स्पर्शून गेला. उकाड्यानं हैराण झालेल्या शरीराला गारवा मिळाला. प्रसन्न वाटलं. 

स्टडीरूममध्ये येण्याचा माझा आजचा पहिलाच दिवस असल्यामुळं मी थोडा उगीचच इकडं-तिकडं न्याहाळत होतो. पुस्तकाचं एकेक पान उलटत होतो. माझं लक्ष पुस्तकात कमी आणि इतरत्रच जास्त होतं. माझ्याच वर्गातली एक मुलगी समोरच बसली असल्याचं मला दिसलं. तिचं सगळं लक्ष पुस्तकात होतं. अतिशय मन लावून ती अभ्यास करत होती. त्या मुलीकडं पाहून मी स्वतःवर खूप वैतागलो. 

म्हणालो - ‘बघ, बघ...ही तुझ्याच वर्गातली मुलगी किती मन लावून अभ्यास करतेय...आणि तू? तू फक्त इकडं-तिकडं बघण्यातच वेळ घालवत आहेस. काहीतरी शिक त्या मुलीकडून.’ तिची अभ्यासातली एकाग्रता पाहून मला त्या मुलीचं कौतुक वाटलं. माझी नजर मात्र तिच्याच हालचाली टिपत होती. एवढ्यात खिडकीतून वाऱ्याचा जोरदार झोत खिडक्‍यांच्या झडपा आपटत आला आणि क्षणार्धात तिच्या पुस्तकातल्या सगळ्या पानांची फडफड होऊन पुस्तक बंद झालं. जणू वाऱ्यानं सगळं पुस्तक वाचूनच काढलं! पुस्तक बंद झाल्यामुळं त्या मुलीनं पहिल्यांदाच वर पाहिलं. वाऱ्याच्या या खोडकरपणामुळं तिला हसू आलं. मी समोर बसलेला होतो. तिनं मला कदाचित प्रथमच पाहिलं असावं. ती पुन्हा हसली. गालातच. तिला खळी होती, हे माझ्या लक्षात आलं. तिनं समोर आलेली केसांची बट हळुवारपणे मागं सारली. घारे डोळे, सरळ नाक, दाट केस, लांब केसांच्या वेणीवर फुलांचा गजरा आणि कपाळावर नक्षीदार छोटीशी बिंदी...तिच्याकडं पाहिलं आणि मन, डोळे तिथंच स्थिरावले. पहिल्या भेटीतच नव्हे तर पहिल्याच पाहण्यात तिनं माझं हृदय जिंकलं.

वेळ केव्हा संपली ते मला कळलंच नाही. तिनं पुस्तकांची आवराआवर केली नि ती जायला निघाली. मी तसाच उभा. तिनं माझ्याकडं पाहिलं. जाण्यासाठी मान हलवली. ‘मी निघते हं’ अशा अर्थाची! मी धन्य झालो! मला एकदम तरतरी आली; पण ‘मी चालले’ हे ती मला खरोखरच सांगत असावी का, असंही वाटून गेलं. मी तसाच अर्थ लावला...आणि मला खूप आनंद झाला...उगाचच! रूमवर गेल्यावर माझ्या डोळ्यांपुढं सारखी तीच येत राहिली. तिनं हलवलेली मान सारखी आठवायची. सकाळी कॉलेजला कधी जातोय आणि तिला कधी एकदा पाहतोय असं मला होऊन गेलं.  चालता चालता माझं मन विचारांशी चाळा करू लागलं. माझ्याविषयी खरंच तिच्या मनात थोडीफार तरी ओढ निर्माण झाली असेल का? की तिनं ‘जाते’ म्हणून सांगण्यासाठी हलवलेली मान ही केवळ मी तिच्या वर्गातला आहे म्हणून तिनं औपचारिकता म्हणून हलवली असेल? की तिनं मान हलवलीच नव्हती आणि मला तसं वाटून गेलं? नक्की काय?

मी कॉलेजमध्ये पोचलो. मनात तिचेच विचार. मान डोलावणारा तोच सुंदर चेहरा. पहिलं लेक्‍चर सुरू झालं. संपलं. दुसरं सुरू झालं. वर्गात हजर असलेल्या सगळ्या मुलींवरून माझी नजर फिरत होती. प्रत्येकीला पुनःपुन्हा पाहत होती; पण ती मात्र आज आलीच नव्हती. मनात पुन्हा अनेक प्रश्‍न उद्भवले; पण उत्तरं मात्र सापडत नव्हती. एकच ओरडा झाला तेव्हा भानावर आलो. लेक्‍चर संपलं होतं. पटकन उठून बाहेर पडलो. गेटजवळ उभा राहिलो. नजर तिलाच शोधत होती. दुरून तिच्यासारखीच दिसणारी मुलगी रमतगमत येताना दिसली; पण तिनं साडी नेसली होती. एखादा समारंभ, एखादा विशिष्ट ‘डे’ असला तरच मुली साडी नेसत. आज कॉलेजमध्ये असं कोणतंच फंक्‍शन नव्हतं. म्हणजे साडी नेसून येत असलेली मुलगी ती नसेल...माझ्या मनानं अंदाज केला. मी खूपच खट्टू झालो. विचार करत, मान खाली घालून पायऱ्यांवर उगाचच रेघोट्या ओढू लागलो. तेवढ्यात ‘आता लेक्‍चर नाही का?’ असं गोड आवाजात मला कुणीतरी विचारलं. हा आवाज मी प्रथमच ऐकत होतो. वर पाहिलं तर साक्षात तीच उभी होती. गडद निळ्या रंगाची नक्षीदार साडी आणि तीवर मॅचिंग ब्लाऊज. लांब वेणीवर मोगऱ्याचा भरगच्च गजरा, हलकसं लिपस्टिक...मी तिच्याकडं पाहिलं आणि पाहतच राहिलो.
मी म्हटलं - ‘‘नाही.’’ 
तिनं पुन्हा विचारलं - ‘‘लेक्‍चर नाही?’’ 
मी म्हटलं - ‘‘आहे.’’
‘‘मग?’’ तिचा प्रश्‍न.
‘‘वाट पाहत होतो...’’ माझ्या तोंडून सत्य बाहेर पडलं. 
‘‘कुणाची?’’ तिनं विचारलं.
‘‘नाही...मी...अं...मित्राची’’ मी गडबडलो. तेवढ्यात लेक्‍चर संपल्याची बेल झाल्यानं माझी सुटका झाली. जाता जाता तिचं नाव विचारून घ्यावं असं मनात आलं; पण तेवढंही धाडसच झालं नाही.
समोर मुलींचा घोळका उभा होता. ‘‘काय नीलिमा, आज काय विशेष? आम्हाला पार्टी हवी हं आज...’’ तिची एक मैत्रीण म्हणाली.
‘‘किती गं सुंदर दिसतेस, नीलिमा! आज काय विशेष?’’ दुसरी मैत्रीण.
नीलिमा...! तिचं नाव नीलिमा होतं हे मी तिला न विचारताच मला कळलं!निळ्या डोळ्यांची नीलिमा. तिच्या डोळ्यांवरूनच कदाचित तिच्या घरच्यांनी तिचं हे नाव ठेवलं असावं. एवढ्या मुलींच्या घोळक्‍यातून मधूनच ती एखादा कटाक्ष मी बसलो होतो तिकडं टाकत असावी असं मला वाटून गेलं. -मैत्रिणींनी एकच गलका केला तेव्हा त्यांना थांबवत नीलिमा म्हणाली ः ‘‘अगं, कॉलेज संपलं की मला कल्याणला लग्नाला जायचं आहे.’’ 
मध्येच एक आवाज आला ः ‘‘पण आम्हाला पार्टी हवी हं नक्की.’’

नीलिमा या नावाचा ध्यासच लागला आता माझ्या मनाला. जळी-स्थळी तीच दिसत होती मला; पण तिचं काय? माझ्याबद्दल तीही हाच आणि असाच विचार करत असेल का? आम्ही अलीकडं रोजच स्टडीरूममध्ये जाऊ लागलो. स्टडीरूममध्ये आमची नजरभेट व्हायची; पण बोलणं होत नव्हतं. तिला भेटण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी माझी सारखी धडपड-तडफड चाललेली असायची; पण भेट होत नव्हती. स्टडीरूममध्ये माझ्याकडं पाहून ती स्मितहास्य करायची, तेवढंच. माझं स्टडीरूममध्ये अभ्यासाला जाणं हे माझ्या मित्रांना थोडं अचंबित करणारं होतं. 
‘‘काय रे, स्टडीरूममध्ये खरंच अभ्यासाला जातोस की कुठं लाईन वगैरे सुरू आहे?’’ 

एका मित्रानं विचारलेल्या या प्रश्‍नाचं उत्तर माझ्याआधी दुसऱ्याच मित्रानं चेष्टेच्या सुरात देऊनही टाकलं ः ‘‘अरे, तो किती भित्रा आहे माहीत आहे ना तुला? तो कसला असल्या फंदात पडतोय!’’ पण तरीही पहिल्या मित्राच्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच. 

आता मला या मित्रांचीच जास्त भीती वाटू लागली! कारण, ते कधी काय करतील याचा नेम नव्हता. 

पुढं मी आणि नीलिमा - तिचं आडनाव प्रधान होतं- या ना त्या कारणानं भेटू लागलो...म्हणजे आडवाट करून एकमेकांच्या समोर येऊ लागलो. ‘गुड मॉर्निंग’ सुरू झालं. आता तिचीही मला भेटण्याविषयीची धडपड मला जाणवू लागली होती. सगळ्यांचा गट जरी जमला तरी ती माझ्यासमोर असायची. दृष्टादृष्ट व्हायची. नजरेची देवाण-घेवाण व्हायची. तिच्या नजरेतून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न असायचा; पण तिला एकटीला भेटून तसं काही विचारण्याचं धाडस मात्र मला होत नव्हतं. मित्रांना सांगून पाहिलं असतं...मात्र, तिचा नकार असला असता तर उगीच फजिती नको, म्हणून तोही मार्ग नको, असं मी ठरवून टाकलं.

आम्ही भेटत होतो. रोज एकमेकांसाठी उगाचच ताटकळत राहायचो. वाटायचं, तिलाही खूप बोलायचं असावं. काहीतरी मनातलं गोड गुपित तिला उघड करायचं असावं...पण सुरवात कुणी करायची? आधी कुणी विचारायचं? नीलिमानं की मी? मला मनोमन वाटायचं, की नीलिमानं एकदा तरी प्रेम असल्याचं सूचित करावं...शब्दांतून वा कृतीतून.

मात्र, नीलिमा तशी खूपच बुजरी होती आणि ‘नकार मिळाला तर...’ या भीतीमुळं मलाही तिला काही आधी विचारण्याचं धाडस झालं नाही; परंतु दोघांमध्ये मुग्ध प्रेमासारखं काहीतरी आहे खास, हे जाणवत मात्र राहायचं... 
दोन वर्षं आम्ही एकत्र होतो. एसवाय आणि टीवाय. 

ते कॉलेजचं शेवटचं वर्षं असल्यानं आमच्या वर्गानं गॅदरिंगसाठी एकांकिका बसवली होती. 

आम्ही सगळी मुलं-मुली त्यामुळं वर्गाबाहेरच जास्त वेळ असू. एकांकिकेची रंगीत तालीम सुरू होती. आम्ही दोघं एकांकिकेत नसल्यामुळं कॉलेजच्या पायरीवर गप्पा मारत बसलो होतो. वेळ संध्याकाळची होती. सूर्य मावळतीकडं झुकलेला. नीलिमा अगदी माझ्या शेजारीच बसली होती. एवढ्यात तिच्या हातावर माझा हात पडला...चुकून. मात्र, माझ्याकडून काही विपरीत घडतंय असंही तिनं दर्शवलं नाही आणि तिनं तिचाही हात बाजूला घेतला नाही. 

माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी तिच्याकडं पाहिलं. तिनं लाजून मान खाली घातली. - मी विचार केला ः ‘आज वेळ चांगली आहे. नीलिमाला आज नक्कीच विचारायचं. कदाचित तीही काहीतरी ठरवून आली असावी. काहीही झालं तरी हा प्रेमाचा गुंता आज सोडवायचाच.’ आम्ही एकमेकांना काही विचारणार तोच तालीम संपवून विद्यार्थ्यांचा लोंढा आमच्याजवळ येऊन थांबला. बाहेर पडू घातलेले माझे शब्द मनाच्या फ्रिजमध्ये तसेच गोठून-गारठून गेले! 

मी ही जी माझी ‘अधुरी प्रेमकहाणी’ सांगत आहे, ज्या काळाबद्दल मी हे सगळं काही सांगत आहे तो काळ जवळपास पन्नास वर्षांपूर्वीचा!  आम्ही १९७० मध्ये कॉलेजात होतो. साहजिकच त्या काळी मुलींशी बोलणं फारच कमी व्हायचं; पण मुला-मुलींची प्रेमप्रकरणं फुलत नव्हती असं मुळीच नाही. प्रेमप्रकरणं होतीच; पण हाताच्या बोटावर मोजण्याइतकी.

आमची बीएची परीक्षा संपली. मी नीलिमाची वाट पाहत बाहेर थांबलो. नीलिमा मलाच शोधत होती. मी दिसताच ती लगबगीनं, अधीरेपणानं माझ्याजवळ आली. आज तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. मोगऱ्याची कळी उमलू पाहत असतानाच कोमेजल्यासारखी दिसावी, तसा तिचा चेहरा दिसत होता. तिचा निरोप घेताना मला तरी कुठं आनंद होत होता? मीही दुःखी होतो...फार दुःखी.

नीलिमा समोर आली. भेटीच्या अंतिम क्षणी तिच्या डोळ्यांत पाणी होतं. माझेही डोळे भरून आले होते. वाटत होतं, तिला खूप काही बोलायचंय...मनात दडवून ठेवलेलं काहीतरी सांगायचंय; पण ती काहीच सांगू शकली नाही. त्या दिवशी संध्याकाळी कॉलेजच्या पायरीवर आम्ही गप्पा मारत असताना मी एकवटू पाहत असलेलं धाडस आज कुठं गेलं होतं कुणास ठाऊक!
‘‘आता आपली भेट?’’ एवढं मी म्हणताच नीलिमाच्या अश्रूंचा बांध फुटला. डोळे झरू लागले...
थरथरत्या हातांनी तिनं एक कागद माझ्या हाती दिला. त्यावर तिचा पत्ता होता ः नीलिमा प्रधान, ठाणे.
मीही तिला माझा पत्ता दिला ः रविकांत पाटील, पेण.
पत्ते तरी एकमेकांना परिपूर्ण द्यावेत, हेही आम्हाला त्या ताटातुटीच्या प्रसंगी सुचलं नाही. अगदी अपुरेच असलेले हे दोन पत्ते एकमेकांना पुन्हा कधीही भेटले नाहीत...!
अबोल प्रेमकहाणीची परिणती दुसरी कोणती होणार?
आमची मुग्ध प्रीतिकथाही अधुरी नि एकमेकांना दिलेले पत्तेही अपुरेच...
आता या घटनेला पन्नास वर्षं होत आली आहेत...
माझं मन अनेकदा मूकपणे आक्रंदून उठतं आणि म्हणतं ः ‘नीलिमा, तुझी आठवण येते...खूप खूप आठवण येते...आजही!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com