फोटोजेनिक फ्रिकशेक (नेहा मुळे)

फोटोजेनिक फ्रिकशेक (नेहा मुळे)

वीकएंड हॉटेल
माध्यमांचा प्रभाव अधिक परिणामकारक असतो, अगदी खाद्यपदार्थांच्या बाबतीतही. फ्रिकशेक याचं एक उदाहरण. इन्स्टाग्रामच्या प्रभावामुळं अधिक प्रसिद्धीला आलेलं हे डेझर्ट. इन्स्टाग्रामवरून प्रसिद्धीला येण्यामुळं सतत त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये कसे बदल करता येतील, याचाही विचार होत राहिला. यातूनच त्याची नवनवी देखणी रूपं समोर आली. 

फ्रिकशेक म्हणजे केवळ मिल्कशेक नव्हे. अर्थात, त्याचा बेस मिल्कशेकचा असतो. या शेकवर वेगवेगळे टॉपिंग घातले जातात. या टॉपिंगची कल्पकता प्रत्येकाची स्वतंत्र असू शकते. उदाहरण द्यायचं झालं तर मिल्कशेकवर केक, कॅंडी, डोनट, वॉफल्स, क्रीम, चॉकलेटचे प्रकार असे कोणतेही घटक वापरले जाऊ शकतात. फ्रिकशेक फ्रूट आणि चॉकलेट किंवा कॉफी फ्लेवर्समध्ये मिळतात. याचे असे वेगवेगळे फ्लेवर्स असले, तरी पसंती असते चॉकलेट बेस फ्रिकशेकना. 

फ्रिकशेकमधील वेगवेगळ्या आणि गोडीकडं वळणाऱ्या वेगवेगळ्या घटकांमुळं हे डेझर्ट असूनही पूर्ण जेवण घेतल्याइतकं ‘हेवी’ असतं. फ्रिकशेक प्रेझेंट करण्याची पद्धत सगळीकडं बऱ्यापैकी एकसारखी असली, तरी त्याची सजावट नावीन्यपूर्ण केली जाते. सुरवातीला मेसन जारमध्ये मिल्कशेक घातले जाते. त्यावर सजावटीचा विचार करून विविध गोष्टींचा अक्षरश- डोंगर रचला जातो. मात्र या डोंगरातही देखणेपणा असतो, केवळ हे घटक रचले जात नाहीत. यामुळं फ्रिकशेक खाण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीला आधी त्याचा फोटो काढल्याशिवाय राहवत नाही! हा फोटो सोशल मीडियावर नक्की अपलोड होतो. दुसऱ्याला फ्रिकशेक खाण्यासाठी आणि फोटो अपलोड करण्यासाठी प्रेरित करतो. 

‘पातीसेज’ या ऑस्ट्रेलियन कॅफेमध्ये चार वर्षांपूर्वी फ्रिकेशेक तयार केला गेला. तिथून त्याची प्रसिद्धी जगभर झाली. पुण्यातही तरुणाईचं ते आवडतं डेझर्ट बनलं. पुण्यात फ्रिकशेक कुठं मिळंल, याची चौकशी केल्यास ते अनेक कॅफेमध्ये मिळत असल्याचं लक्षात येईल. यातली निवडक ठिकाण अशी

ओ फ्रिक (एफसी रोड) - वेगवेगळ्या चवींचे मिल्कशेक आणि फ्रिकशेक मिळणारं हे ठिकाण. कुकीज आणि क्रीम फ्रिकशेक ही इथली खासियत.

वर्ल्ड ऑफ डेझर्ट (बाणेर) - वेगवेगळ्या पद्धतीचे डेझर्ट मिळणारं हे खास पार्लर. स्नॅपचॅट दॅट फ्रिकशेक व ओएमजी फ्रिकशेक खाण्यासाठी या कॅफेमध्ये जावं. इतर कॅफेच्या तुलनेत थोड्या मुबलक प्रमाणात फ्रिकशेक इथं मिळेल. 

ग्रिडी मॅन पिझ्झेरिया (कल्याणीनगर, बाणेर) - फ्रिकशेकची ओळख पुणेकरांना ग्रिडी मॅन पिझ्झेरियाने करून दिली असं म्हणायला हरकत नाही. त्यांचा नटेला फ्रिकशेक हा नटेला, ब्राऊनी, आइस्क्रीम, चॉकलेट सिगार रोल यांनी भरभरून गेलेला असतो. या भरभरून जाण्याची वेगळी चव आवर्जून घ्यायलाच हवी अशी. 

आइसक्राफ्ट (विविध शाखा) - मुंबईतला हा प्रसिद्ध ब्रॅंड जो पुणेकरांनाही आता सवयीचा झाला आहे. आइसक्राफ्टचं चारकोला आइस्क्रीम अधिक प्रसिद्ध असलं, तरी विविध प्रकारचे फ्रिकशेकही तेवढेच चांगले मिळतात. 

आइस्क्रीम फॅक्‍टरी (विविध शाखा) - डेझर्ट मिळणाऱ्या पुण्यातल्या विशेष ठिकाणांपैकी हेही एक आहे. इथले चॉकलेट पिनट बटरी आणि फेरेरो किंग नटेला हे फ्रिकशेक आवर्जून खाण्यासारखे आहेत.

रास्ता कॅफे (विविध शाखा) - ओरिओ कुकी फ्रिकशेक खायचं तर रास्ता कॅफेमध्ये जाता येईल. यामध्ये चॉकलेट, ओरिओ, ब्राऊनी, आइस्क्रीम असे सर्वांना आवडणारे घटक असतात. म्हणूनच हे फ्रिकशेक बहुतेकांना आवडणारं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com