वीकएंड हॉटेल : लेबनीजची लज्जत! 

नेहा मुळे 
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

विकएंडसाठी हॉटेल शोधताय? मग हा लेख नक्की वाचा...

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

वीकएंड हॉटेल

लेबनीज हे फ्युजन क्‍युझीन आहे. टर्की, ग्रीस, सायप्रस, फ्रान्स आणि मध्य पूर्वेकडील व भूमध्य सागरालगतचे देश अशा सर्वांच्या खाद्यसंस्कृतीच्या एकत्रित प्रभावातून या क्‍युझीनची निर्मिती झाली आहे. बहुसांस्कृतिक अशी ओळख देणारे लेबनीज फूड प्रत्येक देशवासीयांनाच खाण्याची तृप्ती देते. 
मध्य पूर्वेकडील व भूमध्य सागरालगतच्या देशांच्या खाद्यसंस्कृतीचा विचार केल्यास या भागांमध्ये विविध चवीचे मसाले आणि अन्य ताज्या घटक पदार्थांचा वापर केला जातो. ज्यामध्ये वांगी, काकडी, पुदिना, डाळिंब याचा समावेश असतो. अर्थात, चिकन किंवा मटण यात असतेच. लेबनीज फूड अधिक पोषक असल्याचे सांगितले जाते, याचे कारण त्यातील ताज्या भाज्या, प्रोटिन आणि विविध धान्ये. 

मध्य पूर्वेकडील देशातील खाद्यपदार्थांशी साम्य सांगणारी आणखी एक गोष्ट लेबनीज फूडमध्ये असते, ती म्हणजे वापरले जाणारे ऑलिव्ह ऑइल. हे तेल प्राणिजन्य आणि खाद्यतेलापेक्षा सरस असते, कारण या तेलातून फॅट तयार होत नाहीत. हा आरोग्यदायी लाभामुळे लोक लेबनीज फूडला अलीकडे खूपच पसंती दिली जात आहे. 

Image result for lebanese food

लेबनीज फूडमधील काही परिचित डिशबद्दल सांगता येईल. 
बाबा गनौश : वांग्याच्या भरताप्रमाणे हा पदार्थ असतो. वांगे भरताप्रमाणे भाजून ते कुस्करतात. त्यात तहिनी (तिळाची पेस्ट व लिंबू) घालतात. याची पेस्ट तयार होते. ही पेस्ट चटणीप्रमाणे पिटा ब्रेडला लावून किंवा रोलमध्ये घालून खाल्ली जाते. इतर डिशमध्येही बाबा गनौश वापरले जाते. 
फलाफल : छोले भिजवून ते वाटले जातात. या वाटणात काही मसाले घालतात आणि मिश्रण वड्याप्रमाणे तळले जाते. हा पदार्थ म्हणजेच फलाफल. कधी कधी छोल्याऐवजी फावा बिन्स वापरले जातात. 
श्‍वॉर्मा : या पदार्थात एकावर एक चिकनचे थर लावले जातात. त्याची मांडणी अशा पद्धतीने केलेली असते, की ते गोल गोल फिरत राहताना सर्व बाजूने भाजून निघेल. अशा भाजलेल्या चिकनचे उभे काप काढले जातात. रोलमध्ये मसाले, फ्रेंच फ्राइज, कांदा, टोमॅटो, तहिनी, पिकल्ड भाज्या अशा घटकांसह हे चिकनचे काप घालतात आणि तयार होतो श्‍वॉर्मा. श्‍वॉर्मा शाकाहारी लोकांनाही खाता येईल अशा व्यवस्था पुणेकरांसाठी आहे. शाकाहारी श्‍वार्मामध्ये चिकनऐवजी पनीर असते. 
हमस : हमस हा लेबनीज फूडमधला सर्वांत महत्त्वाचा पदार्थ असे आपण म्हणू शकतो. छोल्याची पेस्ट, तहिनी, लिंबाचा रस, लसणाची पेस्ट, ऑलिव्ह ऑइल, मीठ यापासून तयार झालेलं मिश्रण म्हणजे हमस. हमसचा वापर स्प्रेड म्हणून किंवा त्यात पिटा ब्रेड बुडवून खाण्यासाठी वापरतात. 
बकलावा : हे प्रसिद्ध डेझर्ट म्हणता येईल. हा एक लेअर्ड पेस्ट्रीचा प्रकार आहे. पफमध्ये सारण भरलेले असते, त्याप्रमाणेच बकलावा कव्हरमध्ये सारण असते. हे कव्हर अनेक पापुद्य्रांचे असते आणि प्रत्येक पापुद्य्रात सारण असते, हे याचे वैशिष्ट्य. या सारणात सुकामेवा, खजूर पेस्ट, मध असे घटक असतात. 

या लेबनीज फूडमधल्या खास डिश. या शिवाय किबे, तबुले सॅलड अशाही काही पदार्थांची चव घेऊन पाहा. 

लेबनीज फूड मिळेल अशी पुण्यात अनेक ठिकाणे आहेत. त्यातील काही निवडक ठिकाणांचा उल्लेख करायचा झाल्यास पुढील ठिकाणांची नावे सांगता येतील : 
सुक बाय कॅफे अरेबिया : साळुंखे विहार 
अरेबियन बाईट्‌स : कोंढवा 
किब्बे : औंध 

Web Title: article by Neha Mulay on Lebanese in Maitrin of Sakal Pune Today