मोमोजची मज्जा!

नेहा मुळे
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

विकेंडसाठी हॉटेल शोधताय? मग ही हॉटेल्स नक्की ट्राय करा! 

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

वीकएंड हॉटेल

उकडीचा मोदक थोड्या वेगळ्या रूपात आता मिळतो. त्यातलं सारण वेगळं असतं आणि वरचं आवरणही. समान असते ती करायची पद्धत आणि वरवरचं दिसणं. तुम्ही ओळखलंच असेल, आपण मोमोजबद्दल बोलत आहोत. मोदकातला "मो' आणि मोमोजमधला "मो' हे एक अक्षर आणि प्रत्यक्षातही तितकंच (कमी) साम्य दोन्हींमध्ये आहे. दोन्हींची जातकुळी फक्त मिळतीजुळती आहे, असं आपण म्हणू शकतो.

मोमो अगदी हातगाडीपासून पंचतांराकित हॉटेलमध्येही मिळतात. अल्पावधीत प्रसिद्ध झालेला हा पदार्थ मूळचा तिबेटी आहे. तिबेटी सीमेलगत नेपाळ, भूतान आणि भारतातही दार्जिलिंग, लडाख आणि इतर ईशान्येकडील राज्यांत मोमो हा पूर्वीपासून प्रसिद्धी मिळालेला पदार्थ. मोमो हा पदार्थ आहे डंपलिंग प्रकारातील. डंपलिंग परिवारातील म्हणता येतील असे पदार्थ चीन, जपान, दक्षिण अमेरिका अशा काही प्रादेशिक देशांत वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहेत.

momos

वाफवलेले मोमोज ही मोमो तयार करण्याची अधिकृत पद्धत म्हणता येईल. या पद्धतीचं सुधारीकरण होत आता मोमोज तळले जाऊ लागले. अशा मोमोजची चव स्प्रिंग रोलसारखी लागते. मोमोज तयार करताना सतत नवीन प्रयोग होत असतात. यातूनच त्याचे तंदुरी, विविध फ्लेवरचे मोमोज, शेझवान, मंच्युरियन मोमोज असे नवनवे प्रकार तयार होत आहेत. यातील तंदुरी मोमोजची चव लोकांच्या अधिक पसंतीला आल्याचं त्याच्या मागणीवरून जाणवतं. नव्या रूपात चॉकलेट मोमोज मिळतात आणि विशिष्ट प्रकारच्या सुप्समध्येही मोमो घालून नवी डिश तयार होते.

मोमो मिळण्याची ठिकाणं अनेक आहेत, तसे त्याचे प्रकारही खूप आहेत. मोमजचं कव्हर मुख्यतः मैद्याचं बनवलं जातं. त्याच्या आतलं सारण म्हणजे पारंपरिक पद्धतीचा विचार करता, चुरा केलेलं वेगवेगळ्या प्रकारचं चिकन आणि मटण. अलीकडच्या काळात या सारणात अधिक वैविध्य आलं आहे. चिकन, मटण याबरोबरच भाज्या, टोफू, पनीर, चीज अशा अनेक गोष्टींचं मिश्रण या सारणात आता केलं जातं.

दिमसम : बावझी आणि ज्याऊझी हे चायनीज प्रकारही मोमोजशी मिळतेजुळते आहेत. हे प्रकार आहेत दिमसम परिवारातील आणि दिमसम हा डंपलिंगचाच प्रकार म्हणून ओळखला जातो. दिमसमचं आवरण फक्त मैद्याचं तयार केलं जात नाही, हे त्याचं वेगळेपण. या आवरणात तांदळाचं पीठ आणि बटाटा स्टार्च अशा गोष्टीही समाविष्ट केल्या जातात. त्याच्या आतलं सारणं म्हणजे पाककलेचं कसबच म्हणावं लागेल. सुमारे दोन हजार प्रकारची सारणं यामध्ये असू शकतात! थोडक्‍यात, सारणाबाबत ज्याला जसा प्रयोग करता येईल तसा तो करतो. यामुळेच दिमसमचे हजारो प्रकार तयार होतात. त्यांचे
आकारही निरनिराळे. काही आपल्या मराठमोळ्या करंजी- कानावल्यांसारखे, काही मोदकासारखे, तर काही त्यापेक्षाही वेगळेच. मोमोजप्रमाणे दिमसम रस्त्यावर सहज उपलब्ध होत नाहीत, ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने त्याची मर्यादा म्हणावी लागेल. दिमसम कदाचित त्यातील नावीन्यपूर्ण प्रयोगांमुळे केवळ मोठमोठ्या रेस्टॉरन्टमध्येच मिळतं.

पुण्यात हॉटेलमध्ये किंवा अगदी रस्त्यालगतच्या गाड्यांवरही मोमोज खाता येतील. व्हेज व नॉन-व्हेज मोमोजसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांपैकी निवडक ठिकाणे -  
स्टीम मोमोज - पिटर मोमोज, बावधन
तंदुरी मोमोज - मोमो पांडा (करिष्मा, कोथरूड)
क्रिस्पी किंवा हॉंगकॉंग मोमोज - कॅफे मोमोज (करिष्मा, कोथरूड)
चीज मोमोज - हिमालय मोमोज, विमाननगर

वेगवेगळ्या फ्लेवरचे दिमसम मिळणारी निवडक रेस्टॉरन्ट -
गॉंग - बालेवाडी हायस्ट्रीट
मामागोटो - सेनापती बापट रस्ता
मेनलॅन्ड चायना - अनेक शाखा

Web Title: Article by Neha Mulay in Maitrin supplement of Sakal Pune Today