पावभाजी म्हणजे मोस्ट फेव्हरेट; जाणून घ्या तिची मूळ कथा!

नेहा मुळे 
शुक्रवार, 15 मार्च 2019

पुण्यातल्या खवय्यांसाठी सकाळचे खास सदर... 'विकएंड हॉटेल'... वाचत रहा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' पुरवणीतील हे खास सदर!

वीकएंड हॉटेल 

भाज्यांचं प्रमाण थोडं कमी-जास्त झालं तरी फारसं बिघडत नाही. कारण ठराविक पद्धतीच्या मसाल्यात त्या एकजीव होतात. त्यावर बटर विरघळवलं जातं. पोटॅटो मॅशर तव्यावर आपटत टण्‌-टण्‌ अशा आवाजाच्या एका लयीत हे सगळं एकमेकांत छान मिसळतं आणि त्यातून तयार होणाऱ्या पावभाजीनं तोंडाला पाणी सुटतं! हातगाडीपासून पंचतारांकित हॉटेलपर्यंत सर्वत्र मिळणारी ही डिश. त्याची चव थोडीफार वेगळी जाणवली, तरी बिघडलेली पावभाजी असा प्रकार शक्‍यतो नसतो. 

पावभाजीचा रंजक इतिहास आवर्जून जाणून घ्यायला हवा. 1860च्या दरम्यानच्या अमेरिकन सिव्हिल वॉरचा पावभाजीच्या उगमाशी संबंध असल्याचं सांगितलं जातं. हे युद्ध सुरू असताना अमेरिकेत कापडाची कमतरता जाणवत होती. त्यांच्याकडून मुंबईकडे मोठ्या प्रमाणावर कापडाची मागणी यायची. ती मागणी पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक वेळ कामगारांना काम करावं लागायचं. घरी परतायची वेळ निश्‍चित नसायची. अशावेळी त्या कामगारांना जेवणाची व्यवस्था करणं अपरिहार्य असायचं. त्यांच्यासाठी रात्रीचं जेवण बनवताना दिवसभराच्या उरलेल्या भाज्या एकत्र केल्या जायच्या. त्यात काही मसाले मिसळून भाजीवजा पदार्थ तयार व्हायचा. त्या काळी पोर्तुगिजांचा काहीसा अंमल होता. त्यांच्याकडचा उरलेला पाव या कामगारांना मिळायचा. तो त्या भाजीबरोबर खाऊन कामगार पुढच्या कामासाठी जायचे. अशी पावभाजीची मूळ कथा. 

pavbhaji

मुंबईत शिजलेल्या या भाजीला जगभरात आता आवडीचं खाद्य अशी पसंती मिळाली आहे, असं म्हणावं लागेल. या जगात पुण्याचा उल्लेख आवर्जून करावा लागेल, इतकी ही पावभाजी आता पुणेरी झाली आहे. पुण्यात पावभाजीची चव घेण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. अगदी प्रत्येक भागात, प्रत्येक रस्त्याला असंही आपण म्हणू शकू. यातल्या काही निवडक ठिकाणांची प्रातिनिधिक उदाहरणं देता येतील - 

सुप्रिम कॉर्नर (जंगली महाराज रोड) : छोट्या जागेत थाटलेलं हे हॉटेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतं ते तिथल्या बटरी पावभाजीसाठी. फक्त संध्याकाळी इथं पावभाजी मिळते, त्यामुळं जाताना थोडा वेळ थांबायची तयारी ठेवूनच जा. 

शिवसागर (जंगली महाराज रोड) : वर्षानुवर्षं चव आणि दर्जा सांभाळलेलं रेस्टॉरन्ट अशी याची ओळख. इतर पदार्थांप्रमाणं इथल्या पावभाजीची चव घ्यायलाच हवी. पनीर पावभाजी हे इथलं एक आकर्षण आहे. 

आ जु बा (कर्वे रोड) : पूर्वीच्या आनंद ज्यूस बारचं हे नवं रूप. नाव बदललं तरी पावभाजीची चव पूर्वीप्रमाणे टिकून आहे. पावभाजी खाऊन गुडनाइट मिल्कशेक प्यायचा, असं इथं येणाऱ्यांचा मेन्यू पक्का असतो. 

रिलॅक्‍स (सहकारनगर व भारती विद्यापीठ, कात्रज) : हातगाडीपासून सुरवात होऊन प्रसिद्ध रेस्टॉरन्ट म्हणून आता नावाजलं जाणं असा याचा इतिहास. पावभाजीतले अनेक प्रकार आणि सोबत बटरी किंवा कडक पाव ही इथली वैशिष्ट्यं. 

कीर्ती ज्यूस बार (फर्ग्युसन कॉलेज रोड) : अगदी छोट्या जागेतलं हे पावभाजी मिळण्याचं ठिकाण. बटर, मसाला यांचं प्रमाण वाढवत पावभाजीला अधिक चव इथं आणली जाते आणि मिळतेही मुबलक प्रमाणात. त्यावर ताजा ज्यूस म्हणजे खाण्याचा खराखुरा आस्वाद! 

मयूर पावभाजी (कर्वेनगर) : कोथरूडकरांचं पावभाजीचं हे आवडतं ठिकाण. रंग न वापरता केलेली दाट पावभाजी हे याचं वेगळेपण. 

समर्थ पावभाजी (कर्वेनगर) : जलद सेवा आणि जिभेवर रुळणारी चव ही याची खास ओळख. पावभाजीबरोबर मिळणारी लसूण चटणी आणि कांदा फ्राय हे इथलं वेगळेपण. 

मसालाबार (बालेवाडी) : इथं पाव आणि भाजी दोन्ही काळीकुट्ट मिळते. बघताना नकोशी वाटणारी ही कार्बन पावभाजी खायला मात्र उत्कृष्ट चवीची. 

गिरिजा (टिळक रोड आणि अन्य शाखा) : अनेक वर्षांपासून पुणेकरांचं पावभाजीसाठी पसंतीचं ठिकाण. 

पावभाजीबरोबर आता त्याची काही रूपंही नवीन पदार्थ म्हणून मिळत आहेत. उदाहरण द्यायचं, तर बालगंधर्व जवळील "द लिफ' येथील पावभाजी सूप किंवा अनेक ठिकाणी मिळणारं पावभाजी फॉण्ड्यू सांगता येतील. 
 

Web Title: article by Neha Mulay on Pavbhaji in Maitrin of Sakal Pune Today