नेताजी, जनगणमन आणि 11 सप्टेंबर

Article on Netaji Subhash Chandra Bose and 11 September
Article on Netaji Subhash Chandra Bose and 11 September

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त 'सकाळ'मध्ये यापूर्वी प्रसिद्ध झालेला लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.

'अकरा सप्टेंबर' या दिवसाला अमेरिकेने अवास्तव महत्त्व दिले आहे. जगात अनेक ठिकाणी अतिरेकी हल्ले होत असतात; पण न्यूयॉर्कवर हल्ला होताच तो एक हुतात्मादिन ठरला. आपण रोज जाणता अजाणता अमेरिकाधार्जीणे होत चाललो आहोत, तेव्हा आपणही 'नाइन-इलेव्हन'चा घोष चालू ठेवतो.

त्यामुळे आपण अकरा सप्टेंबरला झालेल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी जोहान्सबर्गला हिंदी समाजाने चार ठराव संमत केले. ते बॅ. गांधी यांनी तयार केले होते. अकरा सप्टेंबर हाच सत्याग्रह संकल्पनेचा जन्मदिन.

त्यापूर्वी अकरा वर्षे अकरा सप्टेंबरलाच विनोबा भावे यांचा जन्म झाला होता. त्यांचे महत्त्व प्रस्थापित व्हायला काही काळ गेला. स्वतः गांधींना आपल्या या अनुयायींचे महत्त्व चांगलेच कळले होते- त्यांचे श्रेष्ठत्वही. गांधींच्या मृत्यूनंतर त्यांच्या इतर अनुयायांनी आणि कॉंग्रेसजनांनी त्यांचे नैतिक नेतृत्व मानले. जवाहरलाल नेहरू आणि जयप्रकाश नारायण हे तरुणांचे स्फूर्तिस्थान. त्या दोघांनाही स्वतःच्या मानसिक उभारीसाठी विनोबांची आवश्‍यकता भासली.

परंतु करंटेपणाने आपण काही प्रमाद करतो, त्यात विनोबांचे महत्त्व विसरणे हाही एक आहे. मग अकरा सप्टेंबर या दिवसाचे महत्त्व कुठून लक्षात राहणार?

अकरा सप्टेंबरला याशिवाय भारताच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. या दिवशी 1942 मध्ये 'हिंदुस्थानचे राष्ट्रगीत कोणते असावे' हे ठरले. ही कथा संगतवार वाय. जी. आनंद यांनी सांगून काही वर्षे झाली; तरीही ती अजूनही नीटशी रुजलेली नाही.

तोपर्यंत बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे 'वंदे मातरम्‌' आणि रवींद्रनाथ ठाकूर यांचे 'जनगणमन' ही दोन्ही राष्ट्रीय गीते म्हणून गायली जात असत. त्यापैकी 'वंदे मातरम्‌' हे 1882 मध्ये लिहिलेल्या 'आनंदमठ' कादंबरीत समाविष्ट होते. 1896 मध्ये इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या वार्षिक सभेत हे गीत गायले गेले. या गाण्याला चाल गुरुदेव टागोर यांनी दिली होती. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीविरुद्ध जी चळवळ झाली, त्यात त्या गीताला विशेष महत्त्व आले. एप्रिलमध्ये भरलेल्या बंगाल प्रांतिक सभेत हे गीत गायले गेले आणि त्याच डिसेंबरमध्ये कॉंग्रेसच्या अधिवेशनात ते टागोरांनी स्वतः गायले. या गीताला स्वातंत्र्यलढ्यात विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कॉंग्रेसच्या अधिवेशनात वंदे मातरम्‌ गायची जणू प्रथाच पडली. 1911 मध्ये कॉंग्रेस अधिवेशन कोलकत्यात भरले तेव्हाही पहिल्या दिवशी प्रथेनुसार 'वंदे मातरम्‌' हे राष्ट्रीय गीत म्हणून गायले गेले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 डिसेंबरला टागोरांनी स्वतः 'जनगणमन' हे स्वतःचे गीत गायले. त्यातील 'अधिनायक', 'भाग्यविधाता' अशा काही शब्दांचा चुकीचा अर्थ लावून हे गीत जॉर्ज बादशहाला उद्देशून आहे, असा अपप्रचार काही जण करत होते. टागोरांनी आपण युगयुगांच्या चिरसारथीबद्दल बोलत आहोत. तेव्हा गैरसमजाला जागाच नाही हे ठामपणे सांगितले. हे गीत जानेवारी 1912 मध्ये छापील स्वरूपात उपलब्ध झाले. त्यानंतर सात वर्षांनी टागोरांनी स्वतः या गीताचा 'दी मॉर्निंग सॉंग ऑफ इंडिया' म्हणून इंग्रजीत अनुवाद केला.

अनेक वर्षे ही दोन्ही गीते गायली जात होती. 

सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय नेतेही बंगालीच. कोलकत्याला स्वतःच्याच घरी स्थानबद्ध असताना 17 जानेवारी 1941 रोजी निसटून गेले. ते जर्मनीत पोचले. तिथे त्यांनी फ्री इंडिया सेंटर आणि नंतर दी इंडियन लिजियन या सशस्त्र गटाची स्थापना केली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी बाहेरून लढायचे हा त्यामागील हेतू होता.

फ्री इंडिया सेंटरची पहिली सभा दोन नोव्हेंबर 1941 रोजी जर्मनीत भरली. या सभेला नरहरी गोविंद गणपुले हे उपस्थित होते. गणपुले 1922 मध्ये जर्मनीला गेले ते गांधींच्या नवजीवन प्रेससाठी छपाई यंत्रे विकत घेण्यासाठी. पुढे हे काम तसेच राहिले आणि गणपुले जर्मनीतच राहिले. त्यांची सुभाषचंद्रांची बर्लिनमध्ये पहिली भेट 1925 मध्ये झाली. सप्टेंबर 1941 पासून बोस जर्मनीत असेपर्यंत ते त्यांच्या फ्री इंडिया सेंटरचे काम करत राहिले. त्यांनी आपल्या 'नेताजी इन जर्मनी- ए लिटल नोन चॅप्टर' पुस्तकात बरीचशी माहिती पुरवली आहे.

दोन नोव्हेंबर 1941 ला झालेल्या सभेत एकूण चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 'जय हिंद' या घोषणेचा जन्म तेव्हा झाला. सुभाष बोस यांचा 'नेताजी' म्हणून स्वीकार या सभेत झाला. इतर दोन महत्त्वाचे निर्णय या सभेत घेण्यात आले. त्यात 'जनगणमन'चा 'राष्ट्रगीत' म्हणून स्वीकार आणि हिंदुस्थानीचा 'राष्ट्रभाषा' म्हणून स्वीकार झाला. 

गणपुले यांनी सांगितलेला इतिहास असा, की बंगाल फाळणीनंतर जहाल पक्षाची राष्ट्रीय चळवळीवर पकड बसली. राजकीय सभांच्या वेळी 'वंदे मातरम्‌' गायले जायचे; परंतु त्यामागे राष्ट्रीय भावनेपेक्षा धार्मिक भावना अधिक महत्त्वाची होती. आणि भारतमाता या देवतेला उद्देशून ते गायले जायचे. बर्लिन येथे भरलेल्या सभेत असे स्पष्टपणे ठरले, की ज्या 'जनगणमन'मध्ये सर्व प्रांत आणि धर्म यांच्या एकतेचा उच्चार आहे, त्या गीताचाच राष्ट्रगीत म्हणून स्वीकार व्हावा.

त्यानंतर नऊ महिन्यांनी हॅम्बुर्ग येथे 11 सप्टेंबर 1942 रोजी इंडो-जर्मन कल्चरल सोसायटीची स्थापना झाली. त्या दिवशी संपूर्ण वाद्यवृंदासह आणि राष्ट्रध्वज फडकवून देशाबाहेर हे राष्ट्रगीत प्रथम गायले गेले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी अभिमान बाळगणाऱ्यांना दोन गोष्टींचा विसर पडतो. एक तर 'जनगणमन' या टागोरांच्या गीताचा राष्ट्रगीत म्हणून उच्चार 11 सप्टेंबर 1942 रोजी सुभाषबाबूंनी केला आणि दुसरे म्हणजे, 1944 मध्ये आझाद हिंद रेडिओवर बोलताना गांधींचा 'ओ फादर ऑफ दी नेशन' असा उल्लेख त्यांनी केला. गांधींचा 'बापू' म्हणून स्वीकार त्यापूर्वी झाला असला तरी 'राष्ट्रपिता' म्हणून त्यांचा उल्लेख प्रथम सुभाषबाबूंनीच केला.

स्वातंत्र्यानंतर सुरवातीचे काही दिवस राष्ट्रगीत कोणते, असा प्रश्‍न निर्माण होऊ शकला असता. परंतु 25 ऑगस्ट 1948 रोजी घटना परिषदेत सुभाषबाबूंची आझाद हिंद फौजेत 'जनगणमन' राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्याचा उल्लेख केला. 1947 मध्ये युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीच्या न्यूयॉर्क सभेच्या वेळी वाद्यवृंदासाठी राष्ट्रगीत कोणते, असा प्रश्‍न विचारण्यात आला. हिंदी प्रतिनिधींकडे 'जनगणमन'ची एक तबकडी होती. ती ऐकल्यावर इतर देशांतील प्रतिनिधींना आवडली. भारतीय सैन्यानेही या गीताचा बॅंडवर उपयोग करण्यास सुरवात केली. नेहरूंनी देशातील सर्व राज्यपालांकडे विचारणा केली. एका गव्हर्नरशिवाय इतर सर्वांनी आपली पसंती दाखवली.

'वंदे मातरम्‌' की 'जनगणमन', हा वाद काही दिवस तसाच राहिला. अखेरीस 24 जानेवारी 1950 ला घटना परिषदेचे सभापती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी या वादावर पडदा पाडत सांगितले, ''जनगणमन या गीताचे शब्द आणि त्याचे संगीत यांचा राष्ट्रगीत म्हणून अधिकृत उपयोग करावा. त्यातील शब्दांत शासन सांगेल त्यानुसार बदल करावेत. 'वंदे मातरम्‌' या गीताला हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या गीताला सारखाच दर्जा दिला जाईल.''

या दोन्ही गीतांची फक्त सुरवातीची काही कडवीच राष्ट्रगीत म्हणून वापरली जातात.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त 'सकाळ'मध्ये यापूर्वी प्रसिद्ध झालेला लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com