प्रवाह..पाण्याचा अन् सामाजिक ऐक्याचाही (पोपटराव पवार)

पोपटराव पवार
रविवार, 8 जुलै 2018

कठीण पाषाणामुळं अडलेल्या पाण्याचं भूगर्भात पुनर्भरण करण्याचा एक आगळावेगळा प्रयोग हिवरेबाजारमध्ये काही वर्षांपूर्वी राबवण्यात आला. तो प्रयोग राज्यात नव्हे, तर देशातही आदर्श ठरला. मात्र, हा प्रयोग सहजासहजी शक्‍य झाला नाही. गावाची साथ, प्रशासकीय पाठबळ आणि भरपूर पाठपुरावा यांमुळं हा प्रयोग तडीस गेला. या प्रयोगादरम्यान जातीव्यवस्थेच्या पलीकडं जाणारं सामाजिक ऐक्‍याचंही दर्शन घडलं आणि त्यामुळं प्रयोगालाही बळ मिळालं.

एखाद्या प्रयोगात आपण यशस्वी झालो, तर त्या कामाचं सर्व स्तरांवरून कौतुक होतं. त्याला मानसन्मानही मिळतात, परंतु तो प्रयोग यशस्वी होण्यामागं अनेक लोकांचं सकारात्मक योगदान असतं. त्यानंतरच नावीन्यपूर्ण प्रयोग पूर्णत्वास जातात. असाच एक प्रयोग हिवरेबाजारमध्ये २० जुलै २००७ रोजी झाला. या प्रयोगाच्या अंती कठीण पाषाणामुळं (लॅट्राईट) अडलेल्या पाण्याचं भूगर्भात कृत्रिमरित्या पुनर्भरण करण्यात आम्हाला यश मिळालं. यासाठी भूगर्भात साडेचारशे किलो अमोनिया नायट्रेट वापरून ४८ बोअरवेअल खोदले आणि त्यामध्ये तीन टप्प्यांत स्फोट घडवून आणले. पाणलोट क्रमांक एकमध्ये या प्रयोगामुळं दोन किलोमीटरपर्यंत पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. पुढच्या चाळीस दिवसांमध्ये निरीक्षण केलं असता बारा मीटरपर्यंत पाणीपातळी वाढली.

एका वस्तीजवळचा पिण्याच्या पाण्याचा हातपंप पूर्वी फेब्रुवारीमध्येच कोरडा पडायचा. तो आता ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये हापसताना प्रवाहित होतो, तर ३१ मेलासुद्धा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित होतो. या प्रयोगापूर्वी ३१५ मिलिमीटर पाऊस पडला, तरी पिण्याच्या पाण्याची समस्या होती. मात्र, प्रयोगानंतर २७७ मिलिमीटर पाऊस पडूनही मे महिन्यातदेखील पिण्याच्या पाण्याची कसलीही समस्या उद्‌भवली नाही. प्रयोग केलेल्या ठिकाणच्या आसपास दोन किलोमीटर परिसरात सत्तर विहिरी आणि चार हातपंपांची पाणीपातळी आश्‍चर्यकारिकरित्या वाढली. याच प्रयोगाच्या यशामुळं पाणी आणि पीकव्यवस्थापनातून हिवरेबाजारला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पहिला राष्ट्रीय जलपुरस्कार मिळाला. निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सुनीता नारायणन आणि नियोजन आयोगाचे डॉ. युगंधर यांनी मिळून निवड केली. पुरस्कारवितरण कार्यक्रमानंतर झालेल्या चर्चेत डॉ. स्वामीनाथन यांना, हिवरेबाजारला प्रथम क्रमांक देण्यामागचं कारण मी विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं ः ‘भविष्यात देशासमोर शेती आणि पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही कृतीतून दिलं आहे. यामध्ये जास्त पाण्याच्या पिकांचं बंधन (ऊस, केळी), खोलवरच्या विंधनविहिरींचं बंधन, पाण्याचा ताळेबंद आणि त्या आधारे पीकनियोजन केलं- ज्यात भविष्यातल्या सर्व प्रश्नांवर उत्तर आहे. म्हणून हा पुरस्कार हिवरेबाजारला देण्याचा निर्णय आम्ही एकमतानं घेतला.’ दहा वर्षांपूर्वींचं त्यांचं हे वक्तव्य आज राज्य आणि  जिल्ह्यांमध्ये झालेल्या पाणीटंचाईच्या दृष्टीनं किती सूचक आहे, हे आपल्या लक्षात येतं.

प्रथम राष्ट्रीय जलपुरस्काराचा सन्मान हिवरेबाजारला मिळाला; परंतु त्याची सुरवात २००४ पासून झाली. त्यासाठी तीन वर्षं चिकाटीनं पाठपुरावा करावा लागला आणि त्यासाठी अनेकांचं योगदान लाभलं. त्याची चर्चा मात्र पुढं झाली नाही. कुठल्याही प्रयोगाचं यश हे सामुदायिक असतं आणि त्याचं श्रेयसुद्धा त्या - त्या घटकांना देणं महत्त्वाचं असतं.

हा प्रयोग जन्माला येण्यामागं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे अडवलेल्या पाण्याच्या तुलनेत कमी उपलब्ध होणारं पाणी. १९९२ ते १९९५ या तीन वर्षांमध्ये नऊ साखळी माती नाला बांध करूनही खाली पाणी कमी मिळत होतं. मग मात्र हे लक्षात आलं, की या पाण्याचे जमिनीत पुनर्भरण कमी होऊन बाष्पीभवन जास्त होत होतं. यासाठी राणोजी पवार, बबन येवले यांच्या ऐंशी फूट खोल विहिरीचा अभ्यास केला. तिचा बदललेला खडक एकसंध होता. झरुना वस्तीचा हातपंप दोनशे फूट घेऊनही वर साठलेलं पाणी तिथपर्यंत येत नव्हतं. याच स्थानिक अभ्यासातून खडक-दुभंजनाची संकल्पना पुढं आली आणि २००४ मध्ये भूजल यंत्रणेशी पहिली चर्चा झाली. मात्र, त्या वेळी असा प्रयोग कुठं झाला नसल्यानं याला तांत्रिक मंजुरी आणि निधी उपलब्ध होणं शक्‍य नव्हतं. याच्या मंजुरीसाठी एक वर्ष गेलं. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन कार्यकारी अधिकाऱ्यां चर्चा केली; परंतु शासकीय मान्यता नसल्यानं या प्रयोगाला मान्यता मिळाली नाही. त्याच वेळी नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्राजक्ता लवंगारे नियुक्त झाल्या. राधेश्‍याम मोपलवार आणि राज्याच्या भूजलविकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची हिवरेबाजार इथं चर्चा घडवून आणली. प्रत्यक्ष पाहिल्यानंतर या प्रयोगाची गरज त्यांच्या लक्षात आली आणि मग त्यासाठी भूजलविकास यंत्रणेच्या कनिष्ठ भूवैज्ञानिकांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मोपलवार यांनी दिल्या. लवंगरे यांनी शिवकालीन पाणीपुरवठा योजनेतून नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत निधी उपलब्ध करून दिला आणि पाणीपुरवठा विभागानं त्याला प्रशासकीय मान्यता दिली. भूजलविकास यंत्रणेनं त्यावर तांत्रिक मान्यता दिली. २००६ मध्ये याला अंतिम मान्यता मिळाली. आता प्रत्यक्ष काम कुणी करावं, यासाठी निर्णयात एक वर्ष गेलं. मग मात्र २००७ मध्ये वरिष्ठ भूवैज्ञानिक दिलीप सातभाई यांच्यानंतर अजय कर्वे हे वरिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून रुजू झाले. पुन्हा त्यांची भेट घेऊन लवंगरे यांच्यासोबत चर्चा करून ग्रामपंचायतीनं हे काम करावं, असं ठरलं. त्यासाठी अंमलबवाजणी करण्यासाठी यंत्रणा म्हणून ग्रामपंचायतीला मान्यता मिळाली. कारण पहिल्यांदाच साडेचारशे किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेटचा स्फोट करणं ही एक मोठी जबाबदारी होती; परंतु अजय कर्वे यांनी यामध्ये सर्व दारूगोळा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली. त्याच्या निविदा काढल्या. त्यासाठी धुळे, नाशिक, औरंगाबाद, बीड इथल्या निविदा आल्या. मात्र, प्रत्यक्ष कामाचं स्वरूप पाहिलं आणि भूपृष्ठावरच खडक असल्यानं एवढ्या पैशात काम परवडत नसल्यानं चार लोकांनी काम नाकारलं. बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्‍यातले जमीर शेख यांनी या जागेची पाहणी केली आणि नकार दिला. मात्र, त्यांच्याबरोबर माहिती देण्यासाठी हबीब सय्यद हा आमचा कार्यकर्ता होता. त्यानं नंतर त्यांना चहासाठी घरी नेलं. त्यावेळी चर्चेदरम्यान त्यांना समजलं, की एका मुस्लिम कुटुंबासाठी या गावानं मशीद बांधली. त्यानंतर त्यांनी मला भेटून ‘‘तोटा झाला, तरी मी हे काम करणार. सर्व समाजाला बरोबर घेऊन तुम्ही हे जे काम केलं आहे. त्यामुळं मीही यात माझं योगदान देणार,’’ असं सांगितलं. 

त्यानंतर १४ जुलै २००७ मध्ये बोअर ब्लास्टचा तीन टप्प्यांतला पहिला टप्पा पार पडला. १५ जुलैला आईचं निधन झालं. एकीकडं दुःख आणि दुसऱ्या बाजूला कामाचं यश होतं. २० जुलैला दुसरा टप्पा पार पडला आणि नंतर तिसरा टप्पा संचालक विकास खार्गे, प्राजक्त लवंगारे, जिल्हाधिकारी उमाकांत दांगट यांच्या उपस्थितीत पार पडला आणि ८२.८० टक्के महाराष्ट्रात आढळणाऱ्या डेक्कन लॅट्रॉईटमध्ये (काळा पाषाण) पाणीपुनर्भरणाचा प्रयोग यशस्वी झाला. स्थानिक अनुभव, प्रशासनाकडून सकारात्मक पाठबळ आणि जातीव्यवस्थेच्या पलीकडचं सामाजिक पाठबळ यांमुळंच हा प्रयोग पूर्णत्वास गेला आणि दुष्काळी गावाचं नंदनवन झालं. ते संपूर्ण भारतातल्या पाणीव्यवस्थापनाचं दीपस्तंभ बनलं. कनिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज बोसके यांनी याला तांत्रिक स्वरूप देण्याचं खूप मोठं योगदान दिलं. लवंगारे यांनी नावीन्यपूर्ण उपक्रमातून निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळं हे काम मार्गी लागू शकलं. जमीर शेख यांना काम करताना साठ हजार रुपयांचा तोटा झाला. तसंच त्यांचे तीन रॉड तुटले, तरीही त्यांनी खुशीनं हे काम करून दिलं. केवळ एका मुस्लिम कुटुंबातला आनंद, गावाची साथ पाहून शेख यांनी हे काम केलं. त्यामुळं गावचं काम करताना, नावीन्यपूर्ण प्रयोग करताना सामाजिक सलोखा, सर्वांना बरोबर घेऊन केलेलं काम, पारदर्शकपणा आणि कामाची सर्वांची चिकाटी अत्यंत महत्त्वाची ठरली.

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Article by Popatrao Pawar on hivrebajar success story