कितवे तरी स्वातंत्र्ययुद्ध!

प्रकाश अकोलकर
शुक्रवार, 15 मार्च 2019

स्वातंत्र्यलढा मग तो कितवाही असो, त्याचा अर्थ कोणत्याही राजसत्तेने वा सामाजिक रूढी-परंपरांनी घातलेल्या निर्बंधांविरोधात दिलेला लढा, हे खरेच! 

इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये आणीबाणी लागू केली तेव्हा प्रियांका तीन वर्षांची होती!

स्वातंत्र्यलढा मग तो कितवाही असो, त्याचा अर्थ कोणत्याही राजसत्तेने वा सामाजिक रूढी-परंपरांनी घातलेल्या निर्बंधांविरोधात दिलेला लढा, हे खरेच! 

इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये आणीबाणी लागू केली तेव्हा प्रियांका तीन वर्षांची होती!

प्रियांका म्हणजे प्रियांका गांधी. काँग्रेसच्या ‘स्टार’ प्रचारक. काँग्रेस महासमितीच्या सरचिटणीस म्हणून नियुक्‍ती झाल्यानंतर चारच दिवसांपूर्वी अहमदाबाद या पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या गडात झालेल्या महासमितीच्या बैठकीत त्यांचा पहिला-वहिला अधिकृत ‘पब्लिक ॲपियरन्स’ झाला आणि थेट इंदिरा गांधी यांच्या आठवणी जागवणाऱ्या प्रियांका यांनी यंदाची निवडणूक हे ‘दुसरे स्वातंत्र्ययुद्ध’ असल्याचा नारा दिला. हे खरेच आहे, की विद्यमान मोदी सरकार तुम्ही-आम्ही काय खावे इथपासून काय वाचावे, काय बघावे, याचे सल्ले आपल्याला देत आहे! आणि हे केवळ सल्ल्यापुरते मर्यादित राहिलेले नाही.

प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या दबावही आणला जात आहे. प्रियांका यांच्या विधानाला तो संदर्भ आहे. परंतु हे सारे किमान काही प्रमाणात तरी इंदिरा गांधी या प्रियांकाच्या आजींनी आणीबाणी जारी केल्यावर जे काही घडत होते, त्याची आठवण करून देणारेच आहे. प्रियांका तेव्हा तीन वर्षांच्या असल्यामुळे त्यांना ते सारे आठवणे कठीणच आहे.

आणीबाणीत प्रसारमाध्यमांवर म्हणजे तेव्हा असलेल्या केवळ छाप्यातील वर्तमानपत्रांवर बंधने आणून आपण काय वाचायचे ते सरकारने निश्‍चित करून टाकले होते. तेव्हा सरकारच्या हातात असलेली ‘आकाशवाणी’ आणि ‘दूरदर्शन’ यातून आज जसा मोदीनामाचा गजर चहूबाजूंनी होत आहे, तसाच इंदिरानामाचा होत होता. ‘ऑल इंडिया रेडिओ’ची संभावना तर तेव्हा ‘ऑल इंदिरा रेडिओ’ म्हणून केली जात होती. आजही दूरदर्शन वा आकाशवाणी यांच्या बातम्या बघितल्या तर तसाच गजर मोदी आणि शहा यांच्या नावाने केला जात असताना बघायला आणि ऐकायलाही मिळतो.

जनतेने तेव्हा लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली या निर्बंधांविरोधात प्रखर लढा दिला आणि आपले स्वातंत्र्य पुनश्‍च हासील केले. तेव्हा तो लढा ‘दुसरे स्वातंत्र्ययुद्ध’ म्हणून गौरवला गेला होता. या लढ्यात मोदी यांचे नेतृत्व ज्या मुशीतून तयार झाले आहे, तो अख्खाच्या अख्खा संघपरिवार सामील झालेला होता.

पहिला स्वातंत्र्यलढा हा अर्थातच ब्रिटिशांविरोधात महात्मा गांधी यांनी दिला होता. त्यानंतर एकविसाव्या शतकात लोकपाल नियुक्‍तीच्या मागणीवरून अण्णा हजारे यांनी मोठा लढा दिला आणि त्यात त्यांना अटकही झाली होती. तेव्हा दस्तुरखुद्द अण्णांनीच हा दुसरा स्वातंत्र्यलढा आहे आणि जनतेने त्यात मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन केले होते. याचा अर्थ स्पष्ट आहे. अण्णाही तेव्हा आणीबाणीविरोधात झालेल्या दुसरा स्वातंत्र्य लढा विसरून गेले होते. अण्णांचा हा लढा यशस्वी झाला आणि सरकारला त्यांना लोकपाल नियुक्‍तीचे आश्‍वासन देणे भाग पडले. संसदेने एकमताने ठरावही केला. याच लढ्याच्या लाटेवर स्वार होऊन मोदी यांनी २०१४ मध्ये मोठा विजय मिळवला आणि ते पंतप्रधान झाले. त्यास आता पाच वर्षे पूर्ण होत आहेत; पण तो ‘लोकपाल’ नावाचा देवदूत मात्र अद्याप आपल्याला बघायला मिळालेला नाही! याच २०१४ मधील निवडणूक प्रचारात मोदी यांनीही निवडणूक म्हणजे ‘काँग्रेसचे आपल्या मानेवरील ७० वर्षांचे जोखड झुगारून देण्यासाठी उभारलेला लढा’ असल्याचे सांगितले होते. तेव्हा अर्थातच त्यांच्या मनात आणखी कितव्या तरी स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणीच जागृत झालेल्या असणार, यात शंका नाही. 

अर्थात, स्वातंत्र्यलढा मग तो कितवाही असो, त्याचा अर्थ कोणत्याही राजसत्तेने वा सामाजिक रूढी परंपरांनी घातलेल्या निर्बंधांविरोधात दिलेला लढा, हे खरेच! आणीबाणीविरोधात संघपरिवारासह सर्वांनी लढा दिला होता आणि आता त्याच परिवाराच्या राजवटीविरोधात आणीबाणी जारी करून जनतेवर निर्बंध घालणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या नात म्हणजेच प्रियांका लढा देऊ इच्छित असतील, तर त्याचे स्वागतच करायला हवे. भले मग तो कितवा का स्वातंत्र्यलढा असेना!

Web Title: Article Prakash Akolkar