स्पेनमधली अनोखी 'गुहाघरं'! (प्रमोद शृंगारपुरे)

Pramod-Shrungarpure
Pramod-Shrungarpure

स्पेनमधल्या ग्रॅनडा शहरापासून जवळच असलेल्या ग्वाडिक्‍स या लहानशा गावी डोंगरात, छोट्या टेकड्यांत गुहांमध्ये खोदलेली घरं आहेत. या घरांना बाहेरून चुन्याचा रंग लावण्यात आलेला आहे. या अनोख्या ‘गुहाघरां’विषयी... 

हिमालयात गुहांमध्ये काही साधू अजूनही राहतात, असं आपल्या वाचनात आलेलं असतं; परंतु शहरानजीकच्या लहान डोंगरांत गुहा खोदून त्यात संसारी माणसं आजच्या काळातही सहकुटुंब राहतात आणि नित्याचे व्यवहार करतात यावर विश्वास बसेल? मात्र, अशाच एका गुहेला भेट देऊन तिथल्या व्यक्तींशी गप्पा मारण्याचा योग मला काही काळापूर्वी आला. स्पेनमधल्या ग्रॅनडा शहरापासून सुमारे 54 किलोमीटरवर असलेल्या ग्वाडिक्‍स नावाच्या लहानशा गावात या अशा अनोख्या गुहा आहेत. 

या गावातल्या डोंगरात, छोट्या टेकड्यांत खोदलेल्या गुहांची घरं आहेत. या घरांना बाहेरून चुन्याचा रंग लावण्यात आलेला आहे. गुहेचा वरचा भाग सपाट करून तिथं गच्ची करण्यात आलेली आहे. इथले डोंगर मुरमासारख्या रंगाचे असून ते मऊ दगडाचे बनलेले आहेत; त्यामुळंच अशा गुहा खोदणं व त्यांच्यावर गच्चीसाठी पठार करणं, सपाटीकरण करणं शक्‍य झालेलं आहे. आम्ही पाहिलेली गुहा छिन्नी-हातोडा वापरून दोन-तीन पिढ्यांपूर्वी खोदण्यात आलेली आहे, अशी माहिती तिथल्या यजमानांनी आम्हाला दिली.

अशा गुहेतल्या भिंती सच्छिद्र असतात व या सच्छिद्रतेमुळं आतलं वातावरण बारा महिने समशीतोष्ण राहतं. पाऊस आला तरी डोंगरावरून वाहून जाणारं पाणी गुहेत पडत नाही. याउलट अलीकडच्या काळातल्या काही गुहा खोदाईयंत्रानं खोदल्या गेल्या असल्यानं या प्रक्रियेत भिंतींची छिद्रं बुजतात व आतलं वातावरण समशीतोष्ण राहत नाही. 

आम्ही या गुहांना भेट दिली तेव्हा बाहेरचं तापमान 36 अंश सेल्सिअस होतं आणि आतलं 20 अंश सेल्सिअस. थंडीतलं तापमान बाहेर एक-दोन डिग्री असलं तरी आत 15-20 असतं, अशी माहिती यजमानांनी दिली. आम्ही भेट दिलेल्या घरात रस्त्यापासून थोड्याशाच उंचीवर दोन गुहा एकमेकींना जोडलेल्या आहेत. एका बाजूला तीन मीटर रुंद व दहा मीटर खोल असा दिवाणखाना आहे. गुहेचा दरवाजा लाकडाचा असून, गुहेला खिडकी मात्र एकही नाही. खोलीत अनेक खुर्च्या, टीपॉय, टीव्ही आदी वस्तू मांडण्यात आलेल्या आढळल्या. भिंतींना साधा चुन्याचा पांढरा रंग दिलेला होता. 
इथल्या भिंतींना प्लास्टिक-कलर किंवा ऑईल पेंट देऊन चालत नाही.

कारण, त्यामुळं भिंतीतली छिद्रं बुजतात व आतलं वातावरण तितकंसं सुखद राहत नाही. भिंतीवर आणि छताखाली सजावट म्हणून रंगीत चित्रं असलेल्या डिनर प्लेट्‌स लावलेल्या आहेत. खोलीत एक उभा पाईप आढळला. त्याचा वरचा भाग छतातून बाहेर काढलेला आणि खालचं टोक अधांतरी. त्याखाली लहानसा खड्डा व खड्ड्यात पेटता निखारा होता. त्यामुळं गरम हवा पाईपमधून वर जाते व दरवाजातून बाहेरची हवा आत येते. 

शेजारच्या गुहेत शयनगृहं होतं. त्यातलं एक लहान मुलांसाठी होतं. त्यापुढं जिना खोदलेला असून, त्याच्या पायऱ्यांवर लाकडी पट्ट्या बसवलेल्या आहेत. 
हा जिना खोदलेला आहे, यावर तो प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास बसणं कठीण, इतका तो व्यवस्थित घडवलेला आहे. जिन्यातून वर गेल्यावर आणखी दोन खोल्या असलेली गुहा आहे. या खोल्यासुद्धा रंगीत प्लेट्‌स आणि वाया गेलेल्या जुन्या-पुराण्या वस्तू लावून सुंदर सजवल्या आहेत. या गुहेतून आम्ही बाहेर आलो, तिथं टेकडी थोडी सपाट करून आणि लोखंडी कठडा लावून गच्ची केलेली असून, ती फुलझाडांनी सजवलेली आहे. खालच्या मजल्यावर गुहेत प्रवेश करण्यापूर्वीच्या खुल्या जागेत एक लहानशी विहीर, कोंबड्या-बदकांचं खुराडं, ससे असलेला पिंजरा, बांधलेला एक कुत्रा आणि एक मांजर होतं. खुराड्याच्या वरती थोड्या उंचीवर लहानसं छप्पर आणि त्याखाली पाणी भरलेल्या प्लास्टिकच्या पारदर्शक पिशव्या लटकत होत्या. 
त्या पिशव्यांविषयी कुतूहल आणि उत्सुकता वाटली. माहिती जाणून घेण्यासाठी यजमानांशी झालेला संवाद असा -
‘‘हे कशासाठी?’’ 
‘‘माश्‍या हाकलण्यासाठी.’’
‘‘पिशव्यांमधल्या पाण्यात काही औषध घातलंय का?'' 
‘‘नाही'' 
‘‘पिशवीच्या या बाजूच्या माश्‍यांना दुसऱ्या बाजूच्या माश्‍या पिशवीतून दिसतात तेव्हा त्या आकारानं खूप मोठ्या दिसतात. त्या बाजूच्या माश्‍यांनाही या बाजूच्या माश्‍या खूप मोठ्या दिसतात. त्यामुळं ‘मोठ्ठ्या’ माश्‍यांना घाबरून सगळ्या माश्‍या (या बाजूच्या आणि त्या बाजूच्या) पसार होतात!’’ 

यजमानांनी दिलेलं हे उत्तर ऐकल्यावर आम्ही खूप हसलो;पणया साध्याशाच पण डोकेबाज खुबीचं, क्‍लृप्तीचं खूपच कौतुक वाटलं. माश्‍यांना हाकलण्याचा असा मार्ग सुचला कसा याचं नवल वाटत राहिलं. 

गावात अनेक लहान लहान डोंगर आहेत, त्यात कमी आणि जास्त उंचीवर अनेक घरं अशाच प्रकारच्या गुहांमध्ये आहेत. आम्ही उंचावरच्या गुहा पाहायला गेलो नाही. कारण, ऊन्ह प्रखर होतं आणि आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना ती चढण सोपी नव्हती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, तिथल्या गुहांमध्येही कुटुंबं राहतात. काही गुहा एक दिवसाच्या किंवा आठवड्याच्या मुदतीसाठी पर्यटकांना भाड्यानं दिल्या जातात. ग्वाडिक्‍सची लोकसंख्या सुमारे दोन हजार आहे. गुहेतली घरं आणि जमिनीवर बांधलेली घरं यांची नेमकी संख्या समजू शकली नाही; परंतु गुहेतल्या घरांची संख्या जास्त असावी हा अंदाज! गावातल्या सत्तर टक्के घरांतली पुरुषमंडळी प्रामुख्यानं कोंबड्यांसंदर्भातल्या प्रक्रियाउद्योगात-व्यवसायात आहेत असं समजलं. आम्ही पर्यटक या परिसरात ‘टूरिस्ट बस'नं फिरलो; परंतु स्थानिक बससेवा आणि रेल्वेसेवाही तिथं असल्याचं कळलं. 

ग्रॅनडा प्रांताला मोठा इतिहास आहे. सातव्या शतकापर्यंत तिथं ज्यू व ख्रिश्‍चन लोकांची वस्ती होती. सन 711 मध्ये तिथं व्यापाराच्या निमित्तानं प्रथमच अरब आले. कालांतरानं त्यांची संख्या खूपच वाढली आणि त्यांचंच वर्चस्व तिथं प्रस्थापित झालं. असं असलं तरी अनेक शतकं अरब, ज्यू व ख्रिश्‍चन मंडळी एकत्र नांदत होती. इथल्या अनेक इमारतींवर अरब शैलीचा प्रभाव जाणवतो; इतका की, काही चर्चसुद्धा अरब शैलीच्या धर्तीवर बांधलेले आढळले. कालांतरानं अरब लोकांचं वर्चस्व जास्त जास्त वाढत चाललं तसातसा त्यांना विरोधही वाढू लागला. या कमालीच्या विरोधामुळं अरब मंडळी स्पेन सोडून जाऊ लागली. सन 1492 पर्यंत स्पेनमधली जवळपास सगळी अरब मंडळी देश सोडून निघून गेली होती, अशी माहिती आम्हाला देण्यात आली. सन 1492 या वर्षाला स्पेनच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, त्याच वर्षी कोलंबस अमेरिकेत पोचला आणि युरोपला अमेरिकेचा शोध लागला. आता जागतिकीकरणानंतर स्पेनमध्ये सर्वधर्मीयांची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे. ज्या पर्यटकांना शक्‍य आहे, त्यांनी स्पेन या देशाला एकदा तरी अवश्‍य भेट द्यावी. ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणी तर तिथं आहेतच; शिवाय तिथली वास्तुकलाही अतिशय सुंदर आहे. ती अवश्‍य पाहण्याजोगी आहे. स्पेनमधल्या लहान लहान गावांमध्येसुद्धा पाहण्यासारखं खूप काही आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com