#MokaleVha तुम्ही तुमचे निर्णय घेता?

Decission
Decission

ती माझ्याकडे समुपदेशनासाठी आली. तिचे सगळे म्हणणे ऐकून घेतल्यावर मी तिला विचारले, ‘तुम्हाला काय हवे आहे? निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे.’ यावर ती म्हणाली ‘मला नाही माहीत. माझ्यासाठी योग्य काय आहे ते आधी आई-वडील ठरवायचे आणि आता सासरची मंडळी ठरवतात. मला काय हवे आहे याचा मी कधी विचारच नाही केला.’

मी म्हटले, ‘खरेतर, तुमचा निर्णय तुम्हीच घेत होतात. कारण आपण दुसऱ्याच ऐकायचे असे ठरवतो तोही निर्णय आपलाच असतो. फक्त तो घेताना स्वतःला काय योग्य आहे याचा विचार न करता दुसरे आपल्यासाठी जे ठरवतात ते आपल्या हिताचे आहे असे आपल्याला वाटते, म्हणून आपण त्याचे ऐकतो. आता दुसऱ्यांनी आपल्याला विहिरीत उडी मार असे सांगितले, तर आपण त्याचे ऐकतो का?’
ती विचारात पडली.
‘बरोबर आहे आणि पण याचा मला त्रास होतोय. सतत मी का म्हणून दुसऱ्याचे ऐकायचे?’

‘खरे आहे. आपले आयुष्य हे आपल्या हातात हवे आणि म्हणून निर्णय हापण स्वतःहून, राजीखुशीने, स्वतःच्या इच्छेने घेतलेला असावा...’
‘पण आपल्या निर्णयाने दुसरी व्यक्ती किंवा आपले सगेसोयरे दुखावले जातील किंवा त्यांना आपले निर्णय पटणार नाहीत, ही भीती वाटते.’ 

‘असे वाटणे स्वाभाविक आहे. म्हणूनच कित्येक वेळा आपण दुसरे दुखावले जाणार नाहीत असाच निर्णय घेतो किंवा आपल्याला याच समाजात राहायचे आहे, या विचाराने समाजाला मान्य असलेला पर्यायही काही वेळा निवडतो आणि म्हणून काही वेळा आपण मनाविरुद्धही निर्णय घेतो. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, दुसरी व्यक्ती दुखावली जाईल या विचाराने किंवा टीकेला घाबरून आपण असे वागतो.’
‘हो ना. म्हणूनच मी स्वतःहून आत्तापर्यंत कधीही निर्णय घेतला नाही.’ मला तिची व्यथा कळली होती.

‘म्हणूनच आज जे तुम्ही आयुष्य जगत आहात त्यात तुम्ही सुखी नाही.’
‘खरे आहे. एक-दोन वेळा मी निर्णय घेतला होता; पण नंतर मला त्याचा पश्चात्ताप झाला.’
समुपदेशनासाठी येणाऱ्या बऱ्याच जणांची ही व्यथा असते. 
आपण निर्णय घेताना कधी योग्य कारणमीमांसेला केंद्रस्थानी ठेवून (Rational) कधी तार्किक विचार करून (Logical) तर काही वेळा व्यावहारिक (Practical) किंवा कधी भावनिक (Emotional) आणि काही वेळा सैद्धांतिक (Theoretical) विचार करून निर्णय घेतो. 

काही वेळा आपल्याला निर्णय घेताना कठीण जाते. कारण आपल्याला माहीत असते, एकदा निर्णय घेतला की तो परत मागे फिरवता येत नाही. मग आपला निर्णय चुकला तर? अशी भीती वाटते. 

ज्या वेळी आपण निर्णय घेतो, त्या वेळेची आपली परिस्थिती, मनःस्थिती आणि भावनिक स्थितीनुसार आपण वागतो असतो. आपण प्रत्येक वेळी तर्कबुद्धी किंवा वास्तव किंवा योग्य-अयोग्य यांचा विचार न करताही निर्णय घेतो आणि मग बऱ्याचदा घेतलेला निर्णय काही काळानंतर चुकीचा वाटू शकतो. कारण, ज्या परिस्थितीत निर्णय घेतला ती परिस्थिती निवळली की आपण भावनिक, मानसिक स्थितीपेक्षा तर्कशुद्ध अंगाने विचार करतो. म्हणून एकदा घेतलेल्या निर्णयाचा ऊहापोह किंवा काथ्याकूट-चर्वितचर्वण करत बसायचे नसते. त्या वेळच्या परिस्थितीनुसार आपण घेतलेला निर्णय योग्य होता एवढेच लक्षात ठेवायचे. 

शिवाय आपल्याबाबत काय योग्य, याचा विचार आपण करतो तेव्हा चूक झाली आहे असे वाटत असले, तरी ती चूक आपण केलेली असते. त्याचे जे काही परिणाम होणार असतील त्यालाही जबाबदार आपणच असतो. आपण दुसऱ्याचे ऐकतो तेव्हा स्वतःचा विचार थांबवतो. एक गंमत म्हणजे एखादी कृती आपण ती दुसऱ्यासाठी करत आहोत असे आपल्याला वाटत असले, तरी त्यातही आपण आधी आपलाच विचार करतो. कोणालाही मदत करताना आपल्याला यातून काय मिळेल? याचाच विचार आपण आधी करतो. मग ते मिळणे हे सुख, आनंद, आत्मिक समाधान या स्वरूपातही असू शकते. 

आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी काहीतरी करतो तेव्हाही आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी करायची इच्छा असते म्हणून करतो. मात्र, निर्णय घेताना एक खूप महत्त्वाचे सूत्र लक्षात ठेवायचे. योग्य निर्णय घेणे आणि भावना यांचा खूप जवळचा संबंध आहे, म्हणून निर्णय घेण्याच्या वेळी आपण भावनिक पातळीवर समतोल नसलो किंवा झालेल्या घटनेचा आपल्यावर आघात झालेला असेल आणि त्यातून आपण पूर्णपणे सावरलो नसल्यास निर्णय घेण्याची घाई नको. घाईघाईने घेतलेले निर्णय चुकू शकतात. आपल्याला असे वाटेल की आपण आता सगळ्या परिस्थितीचे भान ठेवून मी विचार करू शकतो तेव्हाच निर्णय घेतलेला चांगला. 

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मूल्ये (values) आणि श्रद्धा (beliefs) आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, त्यांना अनुसरून किंवा त्यांच्याशी सुसंगत असा निर्णय शक्यतो घ्यायला हवा. त्यांना धक्का न लावता निर्णय घेतलात, तर आपल्याला भविष्यात खेद वाटण्याची शक्यता कमी असेल.
मित्रहो, चला तर मग आपण आपले निर्णय घेऊया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com