#MokaleVha : प्रेमाची भाषा

love
love

एक खूप गोड जोडपं समुपदेशनासाठी आलं. लग्नाला सहा महिने झालेले. वरवर पाहता रूढ अर्थाने दोघही एकमेकांना अनुरूप. पण सारखी भांडण आणि एकमेकांवर आरोप व्हायचे.

नवऱ्याच म्हणणं, ‘‘बायको माझ्याशी प्रेमाने वागत नाही. तिचं माझ्यावर प्रेम नाही, मला तिने नवरा म्हणून स्वीकारलेलं नाही. लग्न झाल्यापासून एकदाही मला तिने आपणहून ‘I love you’ किंवा मला तू खूप आवडतोस अस म्हटलेलं नाही. हे तर सोडाच तिने मला आपणहून कधी मिठीही मारली नाही.’’

बायकोला तिचं काय चुकतंय हे कळतच नव्हतं. ‘‘मी जर प्रेमाने त्याची सर्व काळजी घेते, त्याला हवं नको पाहते. मला स्वयंपाक करायला येत नाही आणि आवडतही नाही, तरीपण मी त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ करते. तरी तो असं का म्हणतो? माझ्या वागण्यातून त्याला माझं प्रेम जाणवत नाही का? मला त्याच्या सहवासात वेळ घालवणं आवडतं हे त्याला कळत नाही का?’’

त्यांच्याशी बोलल्यावर त्यांचे एकमेकांबद्दल गैरसमज का झाले? हे लक्षात आलं. त्याची आणि तिची प्रेम व्यक्त करायची भाषा खूपच वेगळी होती.  

आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला आपलं त्याच्यावर खूप प्रेम आहे हे त्याला सांगायचं असतं, आपल्याला त्याच्याबद्दल कित्ती-कित्ती वाटतं हे त्याला जाणवू द्यायचं असतं. त्याच्या यशामध्ये आपण सहभागी आहोत हे त्याला कळू द्यायचं असतं. त्याच्या दुःखात आपल्याला त्याला दिलासा द्यायचा असतो आणि हे सगळं आपण करत असतोच आणि तेही एक भावनिक विशिष्ट भाषा वापरून. या व्यक्त होणाऱ्या कृतीला किंवा भाषेला ‘प्रेमाची भाषा’ (Love Language) असं म्हणतात.

प्रेमाच्या भाषेचे पाच प्रकार आहेत
1) शब्द

प्रोत्साहनात्मक शब्द- काहीजणांसाठी शब्द हे ‘जादुई’ असतात आणि म्हणून ते मनावर, हृदयावर कोरले जातात, जतन केले जातात. ते शब्द आपल्या प्रेमाच्या माणसाने म्हटले तर त्याचा अर्थ जास्त गहिरा होतो आणि त्यांना तो भावतो. ‘‘आज तू फारच टॉप दिसतेस’’, असं जेव्हा ‘तो’ म्हणतो तेव्हा ‘ती’च्या गालावर निश्चितपणे गुलाब फुलतात आणि ‘I love you’ असं तिने त्याला दिवसातून एकदा म्हटलं की, त्याला तिच्या प्रेमाची ग्वाही मिळते. मग इथे वयाचा प्रश्न नसतो. अगदी हे वयाच्या नव्वदाव्या वर्षीसुद्धा घडू शकतं.

2) वर्तन
कृतीतून प्रेम- काहींना शब्दापेक्षा वर्तनातून, कृतीतून, वागणुकीतून प्रेम दाखवायला आवडतं. त्यांच्यासाठी शब्द फोल असतात. ‘ती’ घरकामात असताना तिला एक ग्लास पाणी देऊन, तिला डोळ्याने तो ‘‘मला तुझ्या कष्टाची जाणीव आहे’’, हे सांगतो किंवा त्याच्यासाठी त्याच्या आवडत्या डिशची रेसिपी त्याच्या आईला विचारून ती करते.

3) भेटवस्तू
काहींना भेट वस्तूंची देवाणघेवाण, भेटवस्तूंच्या आधाराने भावना व्यक्त करणं जास्त भावतं आणि मग भेटवस्तू नाही मिळाली की, आपल्यावर कुणाचंच प्रेम नाही असं त्यांना वाटतं. वाढदिवसाच्या दिवशी गुलाबाचे फुल, शुभेच्छा कार्ड, आनंद झाला की भेटवस्तू आणि रुसवा काढायलाही भेटवस्तू.

4) सहवासात वेळ घालवणे
(Quality Time) : Just Being Together. काहींना वाटतं, ‘‘बोलण्याच्या नादात कधी अर्थ हरवतो. पण निःशब्द सहवास मात्र, कधी सारं काही बोलून जातो.’’ उदा. मला नं माझ्या आवडत्या व्यक्तीबरोबर नुसत्या गप्पा मारायला आवडतं. विषय कुठलाही चालतो. एकमेकांच्या सहवासात बसायचं, बोलायचं, एकमेकांचं ऐकायचं किंवा नुसतंच एकमेकांकडे बघत बसायचं.

5) स्पर्श
शारीरिक स्पर्श-स्पर्शातून भावना समजतात. तसंच काही लोकांची प्रेमाची भाषा स्पर्श असू शकते. पाठीवरून हात फिरवणं, जवळ घेणं, हातात हात घेणं, आलिंगन देणं, कवेत घेणं अशी मूक पण बरंच काही बोलून जाणारी स्पर्शाची भाषा दोन व्यक्तींमध्ये भावनिक नातं निर्माण करतात.

आता प्रश्न असा आहे की प्रेमाची भाषा ओळखायची कशी?
एकमेकांना विचारायचं, हे झालं सोपं सरळ. पण मुळात नातेसंबंधात अपेक्षा असते एकमेकांना समजून घ्यायची. ‘आपल्या मनातलं’ आपल्या प्रिय व्यक्तीने ओळखावं असं दोघांनाही वाटत असतं. आता आपला माणूस मनकवडा कसा असू शकेल? हा प्रश्न इथे तद्दन गैरलागू असतो. कारण भाषा असते प्रेमाची, ग्वाही असते समजून घेण्याची. त्यासाठी पहिली पायरी म्हणजे जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक आपली प्रेमाची भाषा शोधून काढायची. आपली भावना, वर्तणूक लक्षपूर्वक न्याहाळायची. सुखात, दुःखात, रागात, प्रेम व्यक्त करताना आपण कसे वागतो किंवा आपल्याला आपल्याशी दुसऱ्यांनी कसं वागलेलं आवडतं. आता प्रश्न उरतो तो दुसऱ्या व्यक्तीची प्रेमाची भाषा कशी ओळखायची? तर त्यासाठी आपण आधी म्हटल्याप्रमाणे तिला विचारायचं किंवा शोधून काढायचं; वरच्या जोडप्याच्या बाबतीत बोलायचं तर, त्याची भाषा होती स्पर्शाची (primary) आणि शब्दांची (secondary) आणि तिची भाषा होती 

वर्तन : कृतीतून प्रेम आणि एकमेकांच्या सहवासात वेळ घालवणं. दोघंही आपल्या प्रिय व्यक्तीच्या भाषेत एकमेकांशी संवाद साधायचा प्रयत्न करतील तेव्हा ते दोघं एका भावनिक पातळीवर जोडले जातील आणि त्यांच्या जीवनात बहार येईल हे नक्की. मित्र-मैत्रिणींनो, याबद्दल आणखीन जाणून घेण्यासाठी क्यूआरकोड स्कॅन करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com