pu-la-deshpande
pu-la-deshpande

आमचे भाई आजोबा!

भाई आजोबांनी विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल, असे काम करतानाच समाजाची नैतिकता उंचीवर नेण्यासाठीही प्रयत्न केले. जुन्या गोष्टींचा आनंद घ्यावा, मात्र त्यात फार अडकून न पडता नव्या वाटा शोधाव्यात आणि नव्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करत राहावे, ही शिकवण त्यांच्याकडूनच मिळाली...

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी सांगतेनिमित्त त्यांचा नातू आशुतोष ठाकूर यांनी भाई आजोबांच्या आठवणींना दिलेला उजाळा.

मी  सतरा वर्षांचा होतो, त्या वेळची म्हणजे २००९ मधील गोष्ट. अमेरिकेतील महाविद्यालयीन शिक्षणासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून मला निबंध लिहून द्यायचा होता. विषय होता तुमच्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी व्यक्ती. त्या व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यावर नेमका काय प्रभाव पडला, हे लिहिणे अपेक्षित होते. माझ्यासाठी ही पर्वणीच होती. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत सोपा निबंध होता. मराठीतील एक महान लेखक पु. ल. देशपांडे हे माझे आजोबा. सांस्कृतिक नेतृत्व करणाऱ्या मंडळींचा समाजावर मोठा प्रभाव पडत असतो आणि त्यातून समाजाच्या प्रगतीच्या वाटा अधिक मजबूत होत असतात, ही बाब आजोबांच्या सहवासातून मला शिकायला मिळाली. अगदी लहान वयात ज्या वेळी इतर मुलांना पोलिस किंवा अशाच प्रकारचे काही तरी व्हावे असे वाटत असताना मी मात्र माझ्या आजोबांच्या पावलांवरून पाऊल टाकण्याचा निश्‍चय केला होता. पुलं हे साहित्य, नाटक, संगीत, वक्तृत्व आणि इतर कलांच्या माध्यमातून समाजाचे मनोरंजन करणारे अवलिया व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल, असे काम करतानाच त्यांनी समाजाची  नैतिकता उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न केले. पुलंची उंची गाठणे आपल्याला शक्‍य नाही हे मला अगदी सुरवातीलाच उमगले होते. मात्र त्यांचे  आयुष्य आणि अनुभवांतून मी बरेच काही शिकलो.

कुटुंबातील सर्वांत मोठा मुलगा असलेल्या पुलंवरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली. वेगवेगळ्या कला आणि संगीतातील गती हाच घरातून मिळालेला वारसा होता. त्याच्या आधारे पुलंनी आपला पुढचा प्रवास सुरू ठेवला. पुढे त्यांना ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ हा बहुमान प्राप्त झाला, तोही याच कला-कौशल्यांच्या बळावर. आयुष्यातील संघर्षामुळे पुलंना अगदी सुरवातीलाच शिक्षणाचे महत्त्व समजले होते. शिक्षण हेच पालकांनी आपल्याला दिलेली सर्वांत मोठी भेट असते आणि शिक्षणाच्या बळावर आपली स्वप्ने साकारत भविष्याला आकार देता येऊ शकतो, हे मी पुलंचा प्रवास पाहून शिकलो. भाई आजोबा केलेले कुठलेही काम असो, त्याची आजच्या तरुण पिढीलाही भुरळ पडतो. साहित्य, अभिनय, वक्ते, संगीतकार, गायक, चित्रपट दिग्दर्शक आणि कवी अशा सर्वच क्षेत्रांत पुलंनी मुशाफिरी करत, एकापेक्षा एक महान कलाकृतींची निर्मिती केली. आयुष्यभर अनेक मानसन्मान लाभलेले पुलं अखेरच्या क्षणापर्यंत त्याच उत्साहाने, समरसतेने काम करीत होते. जुन्या गोष्टींचा आनंद घ्यावा, मात्र त्यात फार अडकून न पडता नव्या वाटा शोधाव्यात आणि नव्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करत राहावे, ही शिकवण मला भाई आजोबांकडून मिळाली. त्यांनी मोठी संपत्ती कमावली होती, त्यामुळे त्यांनी ठरविले असते तर ते अतिशय सुखासीन आयुष्य जगू शकले असते. मात्र अखेरपर्यंत साधे आयुष्य जगून आपल्या संपत्तीमधील मोठा भाग त्यांनी समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांना देऊन टाकला. चांगले आयुष्य जगण्यासाठी भौतिक सुखांची रेलचेल आवश्‍यक नसते. त्यासाठी हवी असते इतरांच्या मदतीची आस असलेले संवेदनशील हृदय आणि नवनव्या कल्पनांनी भरलेले कलात्मक मन. हे भाई आजोबांकडे पाहूनच मी शिकलो.

समोरच्या व्यक्तींमधील सकारात्मक गुण फक्त पुलंना दिसत असत. इतरांच्या गुणांचे, कौशल्याचे कौतुक करण्याचा मोठेपणा त्यांच्या अंगी ठायी ठायी भरलेला होता. समोरच्यात दडलेला एखादा गुण दिसला, की पुलं त्याला हमखास सांगणार म्हणजे सांगणारच. हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे अनेक मोठे कलाकार उजेडात आले. प्रत्येक व्यक्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असतो, त्यामुळे इतरांमध्ये दडलेल्या गुणांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिल्यास त्या व्यक्तीला बळ मिळते, हा त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला प्रचंड भावला.

या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा मोठा सहवास मिळण्याचे भाग्य मला लाभले. मला तबल्याची ओळख त्यांनीच करून दिली. त्यांच्या आशीर्वादामुळेच मला भारतातील अनेक मोठे संगीतकार, अभिनेते, वक्ते आणि कवींचा सहवास लाभला. भारतीय संगीत आणि संस्कृतीमधील माझी रुची त्यांच्यामुळेच वाढली. त्याचबरोबर पाश्‍चिमात्य संस्कृती आणि विज्ञानाचे महत्त्वही त्यांनी मला समजावून सांगितले. समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आणि समाजाला घडविण्यासाठी चांगल्या सांस्कृतिक नेतृत्वाची फार आवश्‍यकता  असते, हे मला भाई आजोबांमुळेच समजले.

शेतकरी लोकांची भूक भागवतो, डॉक्‍टर त्यांना बरे करतो, लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर असते, मात्र लोकांना हसविण्याची, त्यांचे मनोरंजन करण्याची आणि त्यांच्यातील सर्जनशीलता वाढविण्याचे जन्मजात कौशल्य फार थोड्या जणांकडे असते... 
 ‘जीवन त्यांना कळले हो....’ 

आता या दहा वर्षांनंतर मला वाटणारा भाई आजोबा आणि माई आज्जी (सुनीता देशपांडे) यांच्याबद्दलचा आदर दिवसेंदिवस वाढतो आहे. मी अवघा आठ वर्षांचा होतो, त्या वेळी भाई आजोबा जग सोडून गेले. माझ्या आजोबांमुळेच मला भीम काका (भीमसेन जोशी) यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराचे प्रेम मिळाले. पैसे नसताना लहानपणी संगीत शिकण्यासाठी केलेली धडपड आणि विनातिकीट केलेला प्रवास आणि तिकीट तपासनीसाने पकडल्यानंतर गाणे गाऊन करून घेतलेली सुटका अशा अनेक गोष्टी भीम काका मला सांगत. ते मला दोस्त म्हणूनही हाक मारत. तबला आणि संगीत शिकण्याच्या माझ्या प्रवासात सत्यशील देशपांडे काका, प्रभाकर कारेकर काका, शंकर अभ्यंकर काका आणि गुरुजी सुरेश तळवलकर अशा अनेक मोठ्या कलाकारांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्याकडून मला लहान असताना मिळालेले प्रेम आजही कायम आहे. ही सारी भाई आजोबा आणि माई आजी यांची पुण्याई आहे.

कुमारगंधर्व, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, बेगम अख्तर अशा अनेकांबरोबरच्या त्यांच्या मैफिलींच्या आठवणी ऐकण्याची संधी मला आणि माझ्या कुटुंबीयांना भाई आजोबांमुळे मिळाली. आपली भाषणे आणि साहित्यातून लोकांना एकत्र आणण्याची हातोटी पुलंकडे होती. प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याचे नैसर्गिक कौशल्य त्यांच्याकडे होते. भाई आजोबा हे मैफिलीत रमणारे माणूस होते.

त्यांच्याभोवती सदैव त्यांच्या ‘गॅंग’ची उपस्थिती असायची. मग त्यात साहित्य, नाटक, संगीत अशा सर्वच क्षेत्रांतील बड्या मंडळींचा समावेश असायचा. आयुष्य ही एक मैफील आहे, असे समजूनच पुलं जगले. कुठल्याही मैफिलीत रंग भरण्याचे कसब हे तर पुलंचे वैशिष्ट्य होते. भाई आजोबांनी त्यांच्या पुस्तकांतून, रेखाटनांमधून, नाटकांतून अनेक काल्पनिक पात्रे रंगविली, जिवंत केली. या पात्रांचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अवकाशावर अमिट ठसा उमटलेला तुम्हाला दिसून येईल. पुलंचा विनोद हा नेहमीच वरच्या दर्जाचा असायचा. त्यांनी कधीही सामान्य दर्जाचा किंवा कमरेच्या खालील विनोदाला स्थान दिले नाही. स्वतःवरच हसता येते आणि अशा पद्धतीने हसता हसता स्वतःबद्दल शिकताही येते, हे पुलंनी आपल्या विनोदातून दाखवून दिले.

आपणच आपला आत्मशोध घेऊ शकतो, फक्त त्याला विनोदाची जोड दिली, की ही प्रक्रिया अतिशय आनंददायी बनते हे भाई आजोबांनी समाजाला आपल्या पद्धतीने समजावले. त्यांच्या साहित्यात बदलत्या कालखंडाचे प्रभावी चित्रण आहे. बदलत्या काळात जगलेल्या माणसांच्या कथा त्यांनी आपल्या साहित्यातून समोर आणल्या आहेत. विनोद आणि उपहासाचा आधार घेत तो काळ, त्या काळातील व्यक्तिमत्त्वे, संस्कृती आणि कलेचा पट आपल्या कलाकृतींमधून मांडला आहे. जुन्या काळातील अनेक गोष्टी मला भाई आजोबांच्या साहित्यामुळे कळू शकल्या. लिहिलेले शब्द आणि भाषेची शक्तीही मला भाई आजोबांमुळेच समजली. पुलं हे संगीतकार होते आणि अतिशय प्रभावीपणे आपली कला लोकांसमोर सादर करण्याचा गुणही त्यांच्याकडे होता. सहजता हा मला त्यांच्यातील कलाकारामध्ये असलेला सर्वांत मोठा गुण वाटत आलेला आहे. भीमसेन जोशी, कुमारगंधर्व अशा एकाहून एक सरस कलाकारांबरोबर पुलंनी काम केले आहे. समोर कितीही मोठा कलावंत असो, आपली छाप कार्यक्रमावर टाकणार नाहीत, ते पुलं कसले? मोठा कलावंत तयारी आणि रियाज यांच्या पलीकडे जात उपजेने आपली कला सादर करतो.

भाई आजोबा हे चार्ली चॅपलीनचे मोठे चाहते होते. चॅपलीनच्या ‘ग्रेट डिक्‍टेटर’ या प्रसिद्ध चित्रपटातील अखेरचे भाषण हे पुलंचे सर्वांत आवडते भाषण होते. ‘या दुनियेत प्रत्येकाला श्रीमंत करणारे खूप आहेत. त्यामुळे इतरांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा सारेजण आनंदाने जगू...’ या आशयाचे चॅपलीनचे शब्द पुलं हे अक्षरशः जगले, असे मला वाटते. इतरांवर हसण्याऐवजी स्वतःवर हसायला पुलंनी आपल्याला शिकविले. आयुष्य हे मुक्त आणि सुंदर आहे, हेच त्यांनी आपली कला, संगीत आदींमधून दाखवून दिले. ‘जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो...’ हे बोरकरांचे शब्द भाई आजोबांच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरे ठरतात!

(पुलंच्या नातवाने मूळ इंग्रजीत लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश)
(अनुवाद - अशोक जावळे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com