विविध आजार आणि व्यायाम

डॉ. राजीव शारंगपाणी
बुधवार, 17 एप्रिल 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

हेल्थ वर्क
सामान्यपणे आरोग्याची उत्तम व्याख्या म्हणजे शरीराची मनाला आणि मनाची शरीराला जाणीव नसणे. कोणत्याही प्रकारे ही जाणीव व्हायला लागली की, आरोग्य नाहीसे झालेच. आरोग्य ही स्थिती नाही, ही सतत बदलत राहणारी घडामोड आहे. त्यामुळे लहानपणी केलेल्या व्यायामामुळे आयुष्यभर निरोगी राहता येत नाही. आरोग्य टिकवावे लागते. एवढेच नाही, तर ते सतत वाढवण्याचा प्रयत्न करायचा असतो, मगच जीवनाचा दर्जा सुधारतो. नुसते जिवंत असणे हा एक अत्यानंदाचा भाग होतो.

आपल्या शरीर आणि मनाचे आरोग्य सुधारण्याची इच्छा असणाऱ्याला फक्त आपल्यापुरते बघून चालत नाही. कारण, आपले शरीर आणि मन हे त्या बदलत्या निसर्गाचा एक भाग आहे. निसर्गात होणारे बदल हे आपल्या मनावर आणि शरीरावर सतत परिणाम करतात. सकाळी उठल्यावर घराबाहेर आल्यावर प्राजक्ताचा सडा पडलेला पाहावा. बकुळीच्या सुगंधाची झुळूक आली की, मन आणि शरीराला छान उभारी येते. त्याऐवजी घराबाहेर कुजणाऱ्या उकिरड्याची दुर्गंधी आल्यास मन कोमेजून जाते आणि शरीराचीही उभारी नाहीशी होते. 

त्यामुळे, व्यायाम करणे हे व्याधीमुक्त राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असले, तरी आसपासचे पर्यावरणदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. शरीराची अजिबात हालचाल न करणे आणि दूषित हवा, पाणी आणि अन्न यांमुळे होणाऱ्या व्याधी या एकमेकांना पूरक ठरतात. उदाहरणार्थ, शरीराची अजिबात हालचाल न करण्यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी, मान व कंबरदुखी, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी विकार होतात. हवेच्या प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगापासून न्यूमोनियापर्यंत अनेक आजार होतात. पाणी व अन्नाच्या प्रदूषणामुळे आतड्याचे अनेक विकार होतात.

गोंगाटामुळे मानसिक संतुलन ढळते. रक्तदाब वाढणे, चिडचिड होणे, नैराश्‍य येणे असे प्रकार होतात. उत्तम आरोग्य असलेला माणूस हे प्रकार सहन करू शकतो, पण आसमंत प्रसन्न असल्यास साहजिकच आरोग्य टिकवायला अधिक मदत होते.
(पुढील भागात - लठ्ठपणा कसा कमी कराल?)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rajeev sharangpani all is well sakal pune today