येडियुरप्पाच किंग

yeddyurappa
yeddyurappa

पोटनिवडणुकांच्या निकालांनंतर कर्नाटकात येडियुरप्पांचे सरकार बहुमतात आले. ही पोटनिवडणूक नव्हे; तर विधानसभेसाठीची पूर्ण निवडणूक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण या निवडणुकीतूनच राज्याचे सरकार ठरणार होते. राज्यातील ही निवडणूक येडियुरप्पांना खूप काही देऊन गेली; तर काँग्रेसमधील गटबाजीचा फटका त्यांना पुन्हा एकदा जोरदार बसला. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) अवसानच संपल्यासारखे झाले. काँग्रेसचे १२ व जेडीएसचे ३ आमदार भाजपात गेले त्यापैकी १२ आमदार भाजपकडून सभागृहात परत आले. काँग्रेसला दोन मतदारसंघ राखता आले; तर जेडीएसला एकही मतदारसंघ राखता आला नाही.

महाराष्ट्रातील भाजपची सत्ता निसटल्यानंतर देशाचे लक्ष कर्नाटककडे लागले होते; तर हे राज्य गेल्यास देशाच्या नकाशातील आणखी एक मोठे राज्य भाजपचे कमी होईल, ही भीती पक्षाच्या दिल्लीश्वरांनाही होती. अर्थात, ती केवळ काळजी होती. त्यासाठी दिल्लीतून खूप मेहनत घेण्यात आल्याचे दिसले नाही. या निवडणुकीचे कर्ता करविता होते ते येडियुरप्पाच! येडियुरप्पा यांनी पोटनिवडणूक इतकी प्रतिष्ठेची का केली, त्यासाठी त्यांनी कोणतीही कसर ठेवली नाही. अलीकडच्या काळात येडियुरप्पांना डावलण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्षश्रेष्ठींनाही त्यांनी कर्नाटकात ‘मीच किंग’ हा संदेश पुन्हा एकदा दिला आहे.

येडियुरप्पा व श्रेष्ठी यांच्यातील संघर्षात नेहमी येडियुरप्पाच वरचढ ठरत असल्याचे धाडसाने सांगता येईल. त्याचे कारण काय, हे तपासण्यासाठी थोडा मागचा इतिहास समजून घ्यावा लागेल. येडियुरप्पा यांनी २००८ मध्ये दक्षिणेत पहिल्यांदा भाजपला सत्तेवर आणले होते. तोपर्यंत दक्षिणेत कमळ चर्चेतही नसायचे. त्यानंतर येडियुरप्पांचे पक्षातील वजन वाढत राहिल्याने त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. त्या वेळी त्यांनी पक्षाविरोधात बंड करून कर्नाटक जनता पक्ष स्थापन केला. २००४ ला सत्तेवर आलेले धरमसिंग सरकार कोसळल्यानंतर २००६ मध्ये जेडीएस व भाजपने सत्ता स्थापन केली. जेडीएस आणि भाजपची आघाडी राज्यासाठी धक्कादायक होती. ३ वर्षांसाठी प्रत्येकी दीड वर्ष मुख्यमंत्रिपद या फॉर्म्युल्यावर सरकार बनले. कुमारस्वामी पहिल्या टर्मला मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी भाजपला संधी देण्यास नकार दिला.

भाजपच्या येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीही; पण बहुमत सिद्ध करता न आल्याने केवळ सातच दिवसांत त्यांना पायउतार व्हावे लागले. याच गोष्टींचे भांडवल करून येडियुरप्पा यांनी राज्यभर दौरा करून ताकद वाढवली. येडियुरप्पांनी सहानुभूतीचा पुरेपूर फायदा उठवत सहा महिन्यांच्या राष्ट्रपती राजवटीनंतर झालेल्या निवडणुकीत कर्नाटकात पहिल्यांदाच बहुमताचे भाजपचे सरकार सत्तेवर आणले. तीन वर्षे कारभार चालवल्यानंतर त्यांच्यावर व काही मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने त्यांना पदावरून हटवणे भाग पडले. 

२०१३ च्या निवडणुकीला सामोरे जाताना भाजपात गटबाजी उफाळून आली होती. येडियुरप्पांना डावलण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने त्यांनी कर्नाटक जनता पक्ष (कजप) स्थापन केला. तीन वर्षांच्या कार्यकाळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, कृषी अर्थसंकल्प या योजना राबवल्याने व प्रभावी लिंगायत समाजातील नेते व मठाधीशांना धरून राहिल्याचा परिणाम निकालात दिसून आला. ‘कजप’ला जागा कमी मिळाल्या असल्या, तरी तब्बल ९० च्या आसपास भाजपच्या उमेदवारांचा पराभव हा येडियुरप्पांच्या ‘कजप’मुळे झाला. येडियुरप्पांचे वारे असूनही भाजपला ते ओळखता न आल्याने काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर भाजपला उशिरा शहाणपण सुचले. पुन्हा येडियुरप्पा यांना पायघड्या घालणे पक्षाला भाग पडले. नंतर येडियुरप्पा यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी मोदी यांच्या नावाची घाई सुरू केली ती पक्षातील अनेकांचा विरोध पत्करून; पण आज ही स्थिती उलट झाल्याचे दिसते. पंतप्रधानांचे नाव पुढे करणारे येडियुरप्पांचीच आज मोदींच्या नेतृत्वातील भाजपात फरफट होताना दिसली. त्याला कर्नाटकातील अलीकडच्या घटनांमुळे पुष्टी मिळते. 

२०१८ च्या निकालात १०५ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष राहूनही त्यांना मिशन कमळ (२००८ ला यशस्वी) राबवण्यास श्रेष्ठींनी सहकार्य केले नाही. त्यामुळे शपथविधी झाल्यानंतर दोनच दिवसांत येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. जेडीएस व काँग्रेस युतीचे सरकार सत्तेवर आले. म्हणून अलीकडचे मिशन कमळ येडियुरप्पांनी आपल्याच हाती घेऊन ते तडीस नेले. आता सरकार पूर्ण बहुमताचे झाले असले तरी येडियुरप्पांना साडेतीन वर्षे निर्धोक पार पाडण्याची कसोटी खेळायची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com