धरणीमाता वगैरे सब झूट.. निव्वळ एक दांभिकपणा....!

शेखर नानजकर
गुरुवार, 13 एप्रिल 2017

जंगलं तोडली, डोंगर फोडले, नद्या अडवल्या, त्यावर धरणं बांधली, ओढेनाले प्रदूषित करून टाकले. कारखान्याचं पाणी जमिनीत सोडलं, त्यानं जमिनीच्या जमिनी विषारी, उजाड झाल्या. पृथ्वीला "आई' म्हणत म्हणत माणसानं जमेल ते अत्याचार तिच्यावर केले....

धरती माता, जननी, पृथ्वी, ही आपली माता आहे, वगैरे संस्कारातच मी वाढलो आहे. गादीवरून उठताना जमिनीला पाय लावण्यापूर्वी "विष्णुपत्नी नम:स्तुभ्यं, पादास्पर्शम क्षमस्वमे,' अशी धरतीमातेची क्षमा मागून जमिनीला पाय लावावा, असे माझ्यावर झालेले संस्कार! लहानपणी आपण भाबडे असतो. मोठे जे सांगतील ते खरं वाटतं. धरतीला पाय लावण्यापूर्वी तिची क्षमा मागावी, इतक्‍या खोलवर विचार केलेली माझी संस्कृती आहे याचा सार्थ अभिमान वाटायचा. सुजलाम सुफलाम धरती म्हणजे खरंच अलंकारांनी नटलेली, साजशृंगार केलेली माता आहे, असं प्रत्येकजण समजतो आहे, असचं वाटायचं. मग आपल्यालाही असंच वाटतंय याबद्दल उर भरून यायचा. ती अथांग धरणं, ते पाटबंधारे, त्यावर डोलणारी ती शेतं, विविध हिरव्या रंगाचे ते पट्टे... खरंच असं वाटायचं, धरती माता कशी नटली आहे! ती शेतं, त्यातले ते खळखळ वाहणारे पाट बघून असं वाटायचं की धरतीमातेनं माणसाला जणु वरदानच दिलं आहे. त्यात जणु वगैरे शब्द वापरले की एकदम मोहित व्हायलाच व्हायचं. हळू हळू वयानं मोठा झालो. आल्हादायक उषेची हळूहळू दुपार झाली. सकाळची कोवळी किरणं जाउन रखरखीत उन्हाची दुपार झाली. सकाळच्या कोवळ्या उन्हात मखमली दिसणाऱ्या गोष्टी दुपारच्या उन्हात खरखरीत आणि काटेरी दिसू लागल्या.

माणूस अप्रगत आवस्थेत होता, तेव्हा त्याला नातेसंबंधातल्या इतक्‍या खोल गोष्टी समजतच नव्हत्या. त्याला पृथ्वी ही आपली आई आहे वगैरे गोष्टी जरी समजत नसल्या, तरी तो झाडाला लागेल ते फळ खायचा. पोटापुरती शिकार करायचा. मिळेल ते पाणी प्यायचा. निसर्गत: निर्माण झालेल्या गुहांमध्ये रहायचा. पृथ्वी ही आपली आई आहे असं जरी त्याला वाटत नसलं, तरी तिला काहीही धक्का न लावता तो जगायचा. त्याची संख्याही खूपच कमी होती. पृथ्वीवरच्या इतर प्राण्यांसारखाच तो एक होता. भटका होता. त्या विशिष्ट टप्प्यात त्याची बुद्धिमत्ताही इतर प्राण्यांच्यापेक्षा फार जास्त नव्हती. थोडक्‍यात निसर्गानं जसे इतर जीव निर्माण केले तसाच तो होता. जरी पृथ्वीला आई मानण्या इतका त्याच्या बुद्धीचा विकास झाला नसला, तरी तो निसर्गाचा एक पुत्र होता. पण कसा काय कुणास ठाउक, पण माणसाच्या बुद्धीचा अचानक खूप विकास झाला. इथून इतर प्राण्यांपेक्षा तो वेगळा झाला. वेगळा वागू लागला. त्याची एक संस्कृती विकसित होऊ लागली. आणि याच संस्कृती विकासाच्या दरम्यान त्यानं पृथ्वीला 'माता' म्हणायला सुरुवात केली.

या भटक्‍या माणसाला शेतीचं तंत्र अवगत झालं, आणि तो स्थिरावला. पृथ्वीला "माता' म्हणण्याबरोबरच त्यानं जंगलतोड करून तिथे शेती पिकवायला सुरुवात केली. शेती आणि स्थैर्याबरोबरच त्याची संख्याही वाढायला सुरुवात झाली. जंगल सर्वांसाठी होतं. झाडं, वेली, गवतं, पशू, पक्षी, माणूस, सगळ्यांसाठीच. पण माणसानं हे जंगलं तोडून सुरु केलेली शेती ही फक्त त्याच्यासाठीच होती. तिथं इतरांना प्रवेश निषिद्ध होता. माणसांची संख्या वाढली, तशी शेती वाढली. शेती वाढली तशी माणसं वाढली. शेती आणि माणसं वाढली, तशी जंगलं कमी होऊ लागली. इतर प्राण्यांना पृथ्वीवर वावरण्यासाठीचा भूभाग कमीकमी होऊ लागला. हळूहळू त्यांची संख्या कमी होऊ लागली. तीही याच धरतीची लेकरं होती, ज्या धरतीला माणूस आई म्हणू लागला होता; या आईला पृथ्वीवर जंगलं हवी होती, स्वच्छ पाण्याचे झरे, ओढे हवे होते आणि तिच्या अंगाखांद्यावर खेळणारे असंख्य प्राणी हवे होते. हे प्राणी आणि त्यांची विविधता, ही तिची निर्मिती होती. ते राहावं, समृद्ध व्हावं, लेकरांनी तिच्या अंगाखांद्यावर खेळावं, अशी तिची इच्छा होती. पण काही काळातच अचानक झालेल्या बुद्धिमत्तेच्या अफाट वाढीनंतर माणसानं तिची इच्छा काय असेल याचा विचार करणंच सोडून दिलं.

बुद्धिमत्तेच्या या अचानक, अतर्क्‍य आणि राक्षसी वाढीमुळेच माणसाला यंत्रांचा शोध लागला. मग त्याच्या हातात भस्मासुराची शक्ती आली. तो ज्या ज्या वर हात ठेवेल ते ते भस्म होऊ लागलं. प्रचंड संख्याबळाच्या ताकदीवर त्यानं पृथ्वीवरचा सगळा भूभाग व्याप्त केला. तिथली जंगलं साफ करून त्यानं शेती सुरु केली. तिथले सगळे प्राणी मारले किंवा पळवून लावले. हौसेपोटी त्यांच्या प्रचंड शिकारी केल्या. नद्यांवर धरणं बांधून सगळं पाणी आपल्या ताब्यात घेतलं. मोठमोठी शहरं निर्माण केली. रस्ते बांधले, रेल्वे रूळ टाकले. विमानतळ बांधले. शहरं, गावं, रस्ते, शेती, याच्या अफाट वाढीनं माणसानं सगळी पृथ्वीच व्याप्त केली. प्राण्यांना जागाच उरली नाही. मोठमोठे कारखाने बांधले. ते धूर ओकू लागले. त्यानं पृथ्वीवरची हवा प्रदूषित होऊ लागली. त्या विषारी वायूंनी पृथ्वीवरच्या ओझोनच्या संरक्षक कवचाला भोक पडलं. त्यातून अतिनील किरणं आत येऊ लागली. त्यानं पृथ्वीचं सामान्य तापमान वाढू लागलं. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण धृवावरचं बर्फ वितळू लागलं. त्यामुळं अनेक जीव मेले. समुद्राची पातळी वाढू लागली. अनेक बेटं पाण्याखाली गेली. अनेक भूभाग बुडाले. कारखान्यातलं विषारी पाणी नदी, ओढ्यांना मिळू लागलं. त्यातले जीव तडफडून मरू लागले. काहींनी ते विषारी पाणी समुद्रात सोडलं. मग समुद्रातले जीव मरू लागले. प्रवाळ मरू लागले. हवा विषारी होऊ लागली. पाणी विषारी झालं. पृथ्वीवरचा इतर कुठलाच जीव वातावरणात असं विष सोडत नव्हता. माणूस ते सोडू लागला. मग त्यानं "अर्थ मूव्हर्स' नावाची यंत्रं विकसित केली. त्यानं तो डोंगरच्या डोंगर फोडू लागला. जंगलांचा सत्यानाश झाला, माती उकरून काढली, ती इकडची तिकडे फेकली. पृथ्वीच्या पोटात सुरुंग लावले, बोगदे खणले. समुद्र मागे हटवून तिथे जमीन तयार केली. जमिनीला भोकं पाडली. त्यातून जमिनीच्या पोटातलं पाणी शोषून घेतलं. मोठमोठी जागतिक युद्ध केली. जमिनीच्या पोटात अणुस्फोट केले. हजारोंच्या संख्येनं पृष्ठभागावरही केले. जंगलं तोडली, डोंगर फोडले, नद्या अडवल्या, त्यावर धरणं बांधली, ओढेनाले प्रदूषित करून टाकले. कारखान्याचं पाणी जमिनीत सोडलं, त्यानं जमिनीच्या जमिनी विषारी, उजाड झाल्या. पृथ्वीला "आई' म्हणत म्हणत माणसानं जमेल ते अत्याचार तिच्यावर केले....

माणूस ही पृथ्वीवरची एकमेव अत्यंत स्वार्थी जमात आहे. पृथ्वीला "आई' ही संकल्पना देऊ न शकलेल्या इतर संस्कृतींचा प्रश्नच नव्हता. त्यांनी तर या पृथ्वीला वारांगनेसारखंच वापरलं. जंगलांच्या रूपांनी असलेलं तिचं हिरवं वस्त्रच फेडलं. त्यांनी तिच्याकडे फक्त उपभोग्य वस्तू म्हणूनच पाहिलं. आणि ती मरेपर्यंत तिचा भोग घेण्याचीच दृष्टी ठेवली. एक वारांगना भोग घेताना मेली तर काय इतकंसं? दुसरी बघू, या मानसिकतेतून दुसऱ्या ग्रहावर वस्ती करता येईल का, या दृष्टीनं त्यांचा विचार आणि कृतीही सुरु झाली. पण कितीही मानलं नाही तरी आई ही आईच! अखिल ब्रम्हांडात असा दुसरा ग्रह, दुसरी आई त्यांना सापडू शकलेली नाही. जरी भविष्यात सापडली तरी तिचंही असंच वस्त्रहरण करून, तिच्यावर अत्याचार करून, तिचंही असंच शोषण करून, ती मरायला लागेल त्यावेळेस तिसरा असा ग्रह सापडतोय का याचा शोध तो घेऊ लागेल.

रोज सकाळी "कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती...' असं प्रात:स्मरण नियमानं म्हणणारेसुद्धा याला अपवाद नाहीत. 'समुद्र वसने देवी, पर्वत: स्तनमंडले..,' असं म्हणत विकासाच्या नावाखाली डोंगर फोडणाऱ्यांना, निरनिराळ्या राक्षसी प्रकल्पांना मान्यता देणाऱ्यांना, विकासाचा आंधळा अजेंडा घेऊन चालणाऱ्यांना खऱ्या संस्कृतीचा विसर पडलेला दिसतोय. "सर्वेपि सुखिन: सन्तु, सर्वे संतु निरामय:' यातल्या "सर्वे'कडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यासारखं वाटतंय.

मनुष्य पहिल्यापासूनच अत्यंत स्वार्थी, अप्पलपोटी आणि आत्मकेंद्री होता आणि आहे. पृथ्वीवर प्रेम करतानासुद्धा त्याला ती "सुजलाम सुफलाम' हवी असते. म्हणजे पाण्यानं भरून वहाणारी आणि त्यावर डोलणारी शेतं असलेली. आणि ही शेती फक्त माणसाकरताच "सुफलाम' हवी असते. पृथ्वीवरच्या इतर जीवांचा त्यानं कधीच विचार केला नाही. आणि केलाच तर त्यांचा स्वत:साठी कसा वापर करून घेता येईल, असाच विचार केला. पृथ्वीवरचं आहे ते आहे तसंच असावं असं त्याला कधीच मान्य नव्हतं. पृथ्वीवर जे होतं, ते सगळं फक्त आणि फक्त स्वत:करताच हवं होतं. प्राण्यांना स्वार्थ समजत नाही. त्यांनी कधीच पृथ्वीचा विनाश केला नाही. प्रत्येक गोष्ट त्यांनी गरजेपुरतीच वापरली. पृथ्वी त्यांची खरी आई आहे. ते तिला सोडून जाऊ शकत नाहीत. तसा विचार देखील करू शकत नाहीत. त्यांचं जगणं मरणं तिच्याबरोबरच आहे. माणूस धरतीला खरंच माता म्हणत असता, तर त्यानं इतर सगळ्या जीवांना भाऊ मानलं असतं. पण ना तो धरतीला आई मानतो, ना इतर जीवांना बंधू.....

आणि हाच माणूस ढोंगीपणे पृथ्वीला धरणी माता म्हणतो....

(लेखक प्रसिद्ध पर्यावरण व वन्यजीव अभ्यासक आहेत)

Web Title: article regarding man-environment conflict