हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे....!

शेखर नानजकर
शनिवार, 8 एप्रिल 2017

इतक्‍यात झाडावरून काही माणसं उतरली. त्यांच्या हातात एक मुसळ होतं. हा जागचा हालू शकत नव्हता. भयानक वेदनांनी पिळवटून ओरडण्यासाठी त्यानं तोंड उघडताच, त्या माणसांनी ते मुसळ त्याच्या घशात घातलं. ताकद लावून आतपर्यंत कोंबलं. त्याचा श्वास गुदमरू लागला. वेदनांचा आगडोंब आणि वरून हे घशातलं मुसळ! तहान लागलेली, त्यात पाय हाडापर्यंत लोखंडी काटेरी चक्रात घुसलेला. घशात मुसळ... श्वास घुसमटलेला. तहान...रक्त... वेदना...तडफड... तडफड.... पाणी... पाणी... तो कोसळला. हळूहळू शांत होत गेला...

10 जानेवारी, 1968
ठिकाण - कोयना जंगल ....

उन्हं उतरून आता बराच वेळ झाला होता. शेकरंही आता ओरडायची थांबून घरट्यात परतली होती. बाकी पक्षीही आता गपगार झाले होते. दूरवर एक घुबड घुमू लागलं होतं. रातव्यांनी चक्कू, चक्कू, ताल धरला होता. हवेतला गारवा आता जंगलात पसरू लागला होता. ओढ्याच्या पाण्याचा मंद आवाज दूरवर येत होता. कडूसं पडलं होतं. दुपारभर झोपलेली पिल्लं आता ताजीतवानी झाली होती. तिच्या शेपटीची दोरी समजून त्यांची ओढओढी चालली होती. ती उगाचच आळसात पडून राहिली होती. पण आता उठायलाच हवं होतं. खूप तहान लागली होती. गेले तीन दिवस शिकार मिळाली नव्हती. पिल्लं मधे मधे दूध प्यायची, पण आता त्यांना शिकारीतला थोडासा वाटा हवा असायचा. ती तिघं होती. दोन नर आणि एक मादी, पाऊस संपता संपता जन्माला आली होती. तिनं एकदोनदा ताणून आळस दिला. तहान खूप लागली होती. भूकही सतावू लागली होती. ती उठली. तिनं प्रत्येक पिल्लाला थोडं थोडं चाटलं. मग थोडं गुरकावल्यासारखं केलं. पिल्लं मुकाट कपारीत पळाली. आता कपारीच्या अंधारातून फक्त सहा डोळे लुकलुकत होते. एक आशा पाझरत होती. आई जाईल. येताना काहीतरी शिकार घेऊन येईल. मग थोडासा खाऊ मिळेल. थोडसं दुदू. मग आई बरोबर खेळता येईल. तोवर कपारीतच राहायचं. त्यांच्या चेहेऱ्यावरची आशा तिला अंधुक प्रकाशातही जाणवत होती. वाघिणीनं एक सुस्कार टाकला. मिशांवरून जीभ फिरवली. मान वळवून ती जंगलाच्या दिशेनं डोंगर उतरू लागली.

अंधार पडला होता. रातव्यांनी ताल धरला होता. रातकिड्यांनी सूर धरला होता. तहान खूपच लागली होती. उंबराच्या पाण्याकडे जायचं, असं तिनं ठरवलं. कालच तिनं उंबराच्या पाण्याच्या पलीकडे सांबरांचा कळप हेरून ठेवला होता. पण तहान खूपच लागली होती. आधी पाण्यावर जाऊन मगच तिकडे जायला हवं होतं. ती झपझप पाउलं उचलू लागली. कदंब मागे पडला, टेटूला वळसा घालून काळ्या खडकामागून ती मैदानात उतरली. चंद्र वर आला होता. मंद असलं, तरी मैदानावर चांदणं पसरलं होतं. गवत स्पष्ट दिसत होतं. ते आता वाळलं होतं. पण उभं होतं. मैदान पार करून ती समोरच्या जंगलात शिरली. आता उंबराचं पाणी जवळ आलं होतं. ती ओढ्यात उतरली. समोरच उंबराचं झाड होतं. त्याच्या खालीच मोठा पाणवठा होता. थंडगार पाण्यानं भरलेला! तिला तहान असह्य झाली. दोन चार ढांगातच ती ती पाण्यापाशी पोहोचली. बेडकं ओरडायची थांबली. दोनचार बेडकांनी पाण्यात सूर मारले. त्यांच्यावर टपून बसलेलं फांदीवरचं एक घुबड डोळे गोल गोल करत उगाचच मन वेळावू लागलं. पाणनिवळ्या पाण्यावर गरागरा फिरून गोंधळ माजवू लागल्या. पाण्यावर येण्याच्या विचारात असलेलं एक उदमांजर पुन्हा बिळात घुसलं. दूरवर कुठेतरी भेकर ओरडलं. पण पाणवठ्यावर एकदम शांतता पसरली....

उताराची जागा निवडून ती पाण्यापाशी आली. चार पायांवर खाली बसली. तोंड पाण्याला लावता लावता ती सांबरांचा विचार करू लागली. खूप पाणी प्यावसं वाटत होतं. एकदोन घोट घेतले इतक्‍यात काहीतरी मोठ्ठा आवाज झाला. जळतं कोलीत छातीत शिरावं असं काहीतरी छातीत शिरलं. ती कोलमडली. तेवढ्यात दुसरा आवाज झाला. असंच जळतं कोलीत डोक्‍यात शिरलं. उभं राहायच्या प्रयत्नात ती पुन्हा कोसळली. अंग झाडू लागली. अंगाची आग आग होत होती. रक्ताच्या धारा लागल्या होत्या. तहान तहान होत होतं. डोळ्यापुढे अंधारी येत होती. पाणी.. पाणी... पाण्याच्या इतक्‍या जवळ असून पाण्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. अंधाराच्या खोल खोल गर्तेत जाता जाता तिला पिल्लांची आठवण झाली. काय करत असतील ती? माझी बाळं माझ्या वाटेकडे डोळे लाऊन बसली असतील.... त्यांना खाऊ घेऊन जायचा होता... तिनं पुन्हा एकदा ताकद लाऊन उठण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण पुन्हा एक आवाज झाला आणि ती कोसळली. तिनं एक दोन झटके दिले. आणि तिचं अंग शिथिल पडू लागलं. का मारलं असेल त्यांनी मला? फक्त भूक लागल्यावर पोटासाठीच शिकार हा प्राणीजगताचा नियम तिला माहित होता. मग मला का....? सगळं अंग शिथिल पडलं. हळू हळू मंदावणाऱ्या डोळ्यांना अंधुक चित्र दिसलं.... दोन माणसं झाडावरून उतरताना दिसली. ती हळूहळू तिच्या जवळ आली. त्यांच्या हातात लांबडं काहीतरी होतं. एकानं तिच्या रक्त वाहत असलेल्या छातीवर बुटाचा पाय रोवला. आणि तो ओरडला, लवकर फोटू काढ, जनावर मरतंय अजून! मुंडकं राजेसाहेबांना देऊ आणि कातडं आपण ठेऊ... क्‍लिक असा आवाज येऊन एक लख्ख प्रकाश फाकला... आणि हळूहळू तिच्या संवेदना संपत गेल्या..... कपारीतल्या अंधारात एकमेकांशी खेळण्यात गर्क असलेले तीन जीव त्या आवाजानं दचकले. एकमेकांना चिकटून बसले. अंधारात सहा डोळे लुकलुकत राहिले...

27 एप्रिल, 2013
ठिकाण चंद्रपूर....

उन्हाची काहिली पेटली होती. चंद्रपूरचं जंगल वणवा लागल्यागत तापलं होतं. अंधारलं तरी अंगाची लाही लाही होत होती. तहानेनं जीभ कोरडी पडली होती. एकदोनदा या अंगावरचं त्या अंगावर वळून तो धीर धरून उठला. पुढं मागं झुकून त्यानं आळस दिला. निघावंसं वाटत नव्हातं. पण तहान खूप लागली होती. पाण्यावर जायलाच हवं होतं. मनाचा हिय्या करून तो निघाला. अंधार दाटला होता. चंद्र उगवला असावा. वाघांना अंधुक प्रकाशातही स्पष्ट दिसतं. सगळ्या झाडांचे खराटे झाले होते. नावाला हिरवं पान शिल्लक नव्हतं. जंगल दाट असलं तरी दूरवरचं दिसत होतं. पखमांजरांचा केविलवाणा आवाज दूरवरून येत होता. रातव्यांनीही सूर धरला होता. त्या भागातला पाणवठा बराच दूर होता. पाचोळ्यानं भरलेल्या रानवाटांवरून आवाज होऊ न देता तो चालत राहिला. लांब कुठेतरी चितळ केकाटलं, पण त्यानं लक्ष दिलं नाही. मैदानं गेली, कोरडे ओढे गेले. मग थोडं जंगलं लागलं. सागाला फुलोरा आला होता. पळसाच्या तांबड्या लाल फुलांनी ओंजळी उघडल्या होत्या. मोहाचा सुगंध दरवळत होता. एक अस्वल मोहाच्या झाडावर चढून गोंधळ घालत होतं. पण त्यानं तिकडेही दुर्लक्ष केलं. खूप तहान लागली होती. दुरूनच त्याला तो पाणवठा दिसला... एकाच अरुंद वाट त्या पाणवठ्याकडे जात होती. तिथं थोडी दाट झाडी होती. तो त्या झाडीत शिरला...

सहाएक उन्हाळे त्यानं पाहीले असतील. हा सातवा. पण यंदाचा उन्हाळा जरा जास्तच कडक होता. आई पासून दूर होऊन त्याला चारएक उन्हाळे झाले असतील. तेंव्हा तो लहान होता. दोन अडीच वर्षांचा! पण वेगळा झाल्यापासून त्याला अनेक वाघांशी युद्ध करावी लागली होती. सुरुवातीला त्याला कोणीच त्यांच्या त्यांच्या जंगलात येऊ देत नव्हतं. प्रत्येक जंगलातल्या नराशी त्यानं युद्ध करून पाहिलं होतं. सपाटून मारही खाल्ला होता. सगळे नर त्याच्यापेक्षा वयानं मोठे आणि ताकदवान होते. कुठेही जावं तरी तो कुणाचा ना कुणाचातरी प्रदेश असायचाच! भुरट्या चोरासारखे त्यानं दोनेक पावसाळे काढले होते. पण शेवटी एका प्रौढ नराशी दोन दिवस युद्ध करून त्यानं हे जंगलं मिळवलं होतं. तरीही रोजचं युद्ध सुरूच होत. त्यानं तीन माद्या मिळवल्या होत्या. दोघींना त्याच्यापासून पिल्लंही झाली होती. पण इथवर येण्याकरता त्यानं खूप लढा दिला होता. जंगलाशी, इतर नर वाघांशी, शिकार मिळवण्यासाठी, माद्या मिळवण्यासाठी, आपलं राज्य मिळवण्यासाठी आणि ते राखण्यासाठी... प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी त्याला लढाच द्यावा लागला होता! आता कुठे तो स्थिरावला होता. कसं जगायचं ते तो अनुभवानं शिकला होता. जंगलाचे सगळे नियम त्याला माहित होते. अनावश्‍यक युद्ध टाळायचं, हा जंगलाचा नियम त्याच्या अंगात भिनला होता. त्याच्यात इतकी ताकद होती की जंगलातली सगळी चितळं, सांबरं, भेकरांची कत्तल तो करू शकला असता. पण भुकेपुरतीच शिकार हा निसर्गाचा नियम सगळेच वाघ पाळत असत. तोही त्याला अपवाद नव्हता! आता पाणवठा दिसू लागला होता. त्याची पावलं अजून भराभर पडू लागली. तहान सहन करण्याच्या शेवटच्या स्थितीत पोहोचली होती. आणि त्याचा पाय वाटेवरच्या गवतात लपवलेल्या कशावर तरी पडला....

खटकन एक खटका वाजला. खचकन एक काटेरी गोल खटका मिटला गेला. काटेरी अशा कशात तरी त्याचा पाय अडकला. त्या मिटलेल्या गोलाचे काटे त्याच्या पायाच्या मनगटातून आरपार घुसले. हाडातून आरपार गेले. असह्य वेदनांचा डोंब त्याच्या अंगात उसळला. तो जीवाच्या आकांतानं ओरडला. ती डरकाळी इतकी भयानक होती, की सगळं जंगल हादरलं. वेदनांचा डोंब उसळला. हाडांपर्यंत घुसलेल्या त्या काटेरी चक्राला त्यानं ओढण्याचा प्रयत्न केला. पण ते काटेरी चक्र जमिनीत पुरलेलं होतं. हालू शकत नव्हतं. तोही तसूभर हळू शकत नव्हता. त्यानं जीवाच्या आकांतानं पुन्हा एकदा अडकलेला आपला पाय ओढायचा प्रयत्न केला. पुन्हा वेदनांचा डोंब उसळला. त्यानं जीवाच्या आकांतानं पुन्हा डरकाळी फोडली. त्याला तसूभरही जागचं हलता येईना. वेदनांनी कळवळत तो नुसत्या डरकाळ्या फोडत राहिला...

इतक्‍यात झाडावरून काही माणसं उतरली. त्यांच्या हातात एक मुसळ होतं. हा जागचा हालू शकत नव्हता. भयानक वेदनांनी पिळवटून ओरडण्यासाठी त्यानं तोंड उघडताच, त्या माणसांनी ते मुसळ त्याच्या घशात घातलं. ताकद लावून आतपर्यंत कोंबलं. त्याचा श्वास गुदमरू लागला. वेदनांचा आगडोंब आणि वरून हे घशातलं मुसळ! तहान लागलेली, त्यात पाय हाडापर्यंत लोखंडी काटेरी चक्रात घुसलेला. घशात मुसळ... श्वास घुसमटलेला. तहान...रक्त... वेदना...तडफड... तडफड.... पाणी... पाणी... तो कोसळला. हळूहळू शांत होत गेला... शेवटचे विचार मनात येऊ लागले. का मारलं असेल त्यांनी मला? अन्नासाठीच शिकार हा जंगलाचा नियम त्यांना माहित नसेल का? मी त्यांचं भक्ष्य कुठे आहे? ते वाघांना खात नाहीत. माझं अन त्यांचं काहीच वैर नाही. त्याला काहीच समजेना.... पाणी हवं होतं... श्वास घुसमटून डोक्‍यात काहीतरी फुटलं..... दोनचार वेळा आचके दिले.... हळू हळू तो मंद पडत गेला... कुणाचेतरी शब्द त्याच्या कानावर आले. अरे, जल्दी फाडो उसको... खून गरम है तबतक ही खाल आच्छी निकलेगी. ये खाल, हड्डी कल तक तैवान पहूचाने है.... त्यांनी गळ्यापासून त्याला फाडायला सुरुवात केल्याचं त्याला जाणवलं.... पण ती शेवटचीच जाणीव! फक्त प्रश्न मागे राहिला... का मारलं त्यांनी मला?

(लेखक प्रसिद्ध पर्यावरण व वन्यजीव अभ्यासक आहेत)

Web Title: Article regarding poaching by Shekhar Nanajkar