बिचाऱ्या ताम्हिणीचा आता "विकास' होणार आहे...

शेखर नानजकर
बुधवार, 24 मे 2017

जंगलं असतील तर काजवे असतील. पण जंगल तर माणसाचं आहे. ते तो कधीही तोडू शकतो. आता तर हा हायवे होणार आहे. सगळीकडे लखलखाट होणार आहे. धनदांडगे सगळी जंगलं विकून, खाऊन टाकणार आहेत. "विकास' होणार आहे!

जानेवारी 1990 ....
मला अजून आठवतंय, 1990 सालच्या जानेवारीतले दिवस होते. "ताम्हिणी'च्या जंगलाविषयी एका नातेवाईकाकडून ऐकलं होतं. खूपच छान जंगल असल्याचं वर्णन ऐकून, "वाईल्ड' संघटनेच्या कार्यकर्त्यांची एक दिवसाची जंगल भेट ठरवली. तिथे दिवसात एकच एसटी जायची. तिचीही खात्री नव्हती. स्वतंत्र बस ठरवली. पन्नास एक जण निघालो. चांदणी चौक सोडून गाडी पौड रस्त्याला लागली. शहराचा संबंध संपला. थंड हवा आणि आजूबाजूला हिरवीगार झाडी दिसू लागली. मधे मधे शेतं दिसत होती. जास्त भात शेती असावी. भात काढून झाला होता. शेतकरी हरभरा, तूर, वाटणा वगैरे पिकांची मशागत करण्यात गुंतले होते. एक छोटासा घाट लागला. घाट उतरताना समोरचं दृष्य पाहून मन हरखून गेलं. क्षितिजापर्यंत सह्याद्रीच्या रांगा पसरल्या होत्या. पहावं तिकडे हिरवं गार दिसत होतं. त्या हिरवाईत एक छोटंसं गाव दिसत होतं. पिरंगुट! नाही म्हणायला एखादुसरी इंडस्ट्री दिसत होती. पण त्या हिरवाईत तो अभद्र पांढरा डाग त्यावेळी फारसा जाणवला नाही. कुठल्याही महाभयंकर रोगाची लक्षणं सुरुवातीला साधीच वाटतात!

गाडी पौडाच्या दिशेला लागली. आसपासच्या सगळ्या डोंगरांवर जंगल होतं. मध्येमध्ये घरं लागायची. घरं दगडामातीची होती. शाकारलेली होती. शेजारी गवताच्या गंज्या होत्या. घरांना कसलेही रंग दिलेले नव्हते. घराशेजारी गोठे होते. गोठ्यात गुरं होती. सारखे गाय बैल दिसायचे. बायका मुलं त्यांना शेतावर घेऊन चालली होती. अत्यंत अरुंद रस्ता होता. दर काही अंतरानी गाडीच्या मधे गुरं यायची. नऊवारीतल्या बायका आणि धोतर घातलेले बाप्ये, अंगावर कांबळं टाकून शेतात काम करताना दिसत होते. गाडीच्या आवाजानं कामं थांबवून गाडीकडे पाहायचे. पौडाला बाजार भरला होता. अनेक भाज्या विकायला होत्या. शहरी माणूस तिथं अभावानंच आढळत होता. लेंगा, सदरा, धोतर आणि लुगडी एवढीच वस्त्र दिसत होती. मधे एक चर्च दिसलं. डोंगराच्या पायथ्याला एकांतात चर्च शांततेत उभं होतं. बाजूला काही गोदामं होती. रस्ता पक्का म्हणता येणार नाही असा डांबरी होता. खडी वर आलेली होती. खूप खड्डे होते. मजल दरमजल करत गडी धरणापाशी आली. धरणाचा चढ चढली आणि समोर स्वर्गच होता!

चाहूबाजूनं जंगल होतं. उजवीकडे मुळशी धारणाचं निळाशार पाणी होतं. जंगलाचा हिरवा कडू वास गाडीतही जाणवत होता. आजूबाजूला एखादं घर दिसलं तर, नाहीतर फक्त जंगल होतं. वळणं वळणं घेत गडी एका ओढ्यात थांबली. इथे रस्ताच संपला होता. हे "ताम्हिणी' होतं! गाडीतून उतरलो. आजूबाजूला किर्र जंगल होतं. भर दुपारी रातकिडे ओरडत होते. हवा अंगावर काटा येण्याइतपत थंड होती. संपूर्ण दिवस ताम्हिणीच्या जंगलात फिरण्यात घालवला. रानडुकरं होती, भेकरं होती, सांबरं होती, शेकरं होती, ऊदमांजरं, पिसोरी, साळिंदरं, कोल्हे, जंगलात काय काय नव्हतं... दिवस जंगलात घालवला. मावळतीला परत निघालो. अंधार पडला. दृष्टीक्षेपात एकाही दिवा दिसत नव्हता. गाडीच्या दिव्यात काही रानडुकरं आडवी गेली. भेकरं पळाली. मुळशी धरणाच्या खाली पहिला दिवा दिसला. थोड्या अंतरावर पुन्हा अंधार पसरला. पौडात आणि पिरंगुट मधे थोडे दिवे दिसले. पुढे चांदणी चौकापर्यंत अंधारच होता. रस्त्याच्या आसपास वस्ती अशी नव्हतीच! कचरा डेपोपासून पुढे लाईट होते. शहर सुरु झालं होतं....

20 मे, 2017 ....
पुन्हा मुळशीत गेलो होतो. यावेळी गाड्यांचा प्रश्नच नव्हता. प्रत्येकाची "कार' होती. कोणती घ्यायची हा प्रश्न होता. विषय होता "काजवे' पहाणे! वाहतूक कापत पौड रस्त्यावरून चांदणी चौकात आलो. मित्र स्किलफुल ड्रायव्हिंग करत होता. चांदणी चौकातून गाडी खाली उतरली. सर्व दिशेला दहा पंधरा मजली इमारती वेगवेगळे रंग नेसून उभ्या होत्या. रस्ता रुंद आणि चांगला होता. वाहनं पळत होती. डाव्या उजव्या बाजूला निरनिराळी "गार्डन रेस्टॉरंट' दिमाखात उभी होती. वाईन शोप्स आणि बिअर बार होते. मोठमोठी हॉटेल्स गिऱ्हाईकांना लुभावत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्लास्टिकचा प्रचंड कचरा पडलेला होता. त्यात पिशव्या, पाण्याच्या बाटल्या होत्या. झाडांवर, झुडपांवर प्लास्टिकचे कागद लटकत होते. सर्व दृष्यावर धुळीचा एक थर जाणवत होता. जिकडे पाहू तिकडे दुकानंच दिसत होती. मधे मधे काही जागा मोकळ्या होत्या. पूर्वी तिथं शेती असल्याचं जाणवत होतं. पण आता ती विकली गेली असावी. त्यात काही झाडं उभी होती. बाभळी होत्या. पण सगळ्यांच्या फांद्या तोडलेल्या होत्या. हात तोडलेल्या गुन्हेगारासारखी त्यांची अवस्था दिसत होती. फाशीची शिक्षा झालेल्या, पण तारीख न ठरलेल्या गुन्हेगारासारखी कळा त्या झाडांवर आली होती. कुठल्याही क्षणी ती तोडली जातील. फाशीच्या गुन्हेगाराला जसा एक एक दिवस मोजावा लागत असेल, तसं त्याचं वाटत होतं. चहूबाजूला मोठमोठ्या "स्कीम्स' उभ्या रहात होत्या. मोठमोठी "टाउनशिप्स' दिमाखात चमकत होती. त्यांना जाणारे रस्ते रुंद आणि रेखीव होते. त्यांना भक्कम कुंपणं होती. गणवेषधारी संरक्षक शिपाई होते. मुळशीतली जंगलं तोडून त्या स्कीम्स उभ्या केलेल्या होत्या.

पिरंगुट तर घाटातून ओळखूच येत नव्हतं. एकेकाळी हिरवंगार पाचूसारखं पिरंगुट आता इमारतींनी झाकून गेलं होतं. जिथेतिथे "प्लॉटिंग' झालेलं होतं. दहाबारा मजली इमारती रंग लावून गिऱ्हाईकांची वाट बघत उभ्या होत्या. सर्व प्रकारची दुकानं होती. माझी नजर मॅक्‍डोनाल्ड, सीसीडी, सबवे, केएफसी वगैरे शोधत होती. पण अजून तरी नाही सापडलं. पुढे जागोजाग डोंगर फोडण्याचं काम सुरु होतं. जंगलं तोडून सुरुंग लावले जात होते. मोठमोठी यंत्रं डोंगर पोखरत होती. झाडं तर केंव्हाच संपली होती, आता मुळशीतली सुपीक जमीन उकरून खालची पांढरी मुरुमाड माती वर फेकली जात होती. डोंगरावर शिल्लक राहिलेल्या जंगलांमध्ये, मधे मधे शुभ्र रंगाचे बंगले चमकू लागले होते. दर काही वेळानं एखादा रस्ता डोंगरात घुसत होता. त्याच्या तोंडावर कसल्याशा टाउनशिपची पाटी दिसत होती. प्रत्येक डोंगरावर काहीतरी बांधकाम झालेलंच होतं. मोठमोठ्या शैक्षणिक, धार्मिक वगैरे संस्थांनी मोठ्या जागा अडवल्या होत्या.

हा रस्ता आता कोकणात उतरतो. तिथपर्यंत जमिनी विकल्या गेल्या आहेत. दिसणाऱ्या सगळ्या जंगलांना कुंपणं पडलेली आहेत. आता कळतं की एके काळी मी पाहिलेली ती घनदाट जंगलं खासगी मालकीची होती. माणसाच्या मालकीची होती. तो त्यांची पाहिजे तशी तोड करू शकतो. साफ करू शकतो. तिथे काहीही बांधू शकतो, विकू शकतो.. मी सव्वीस वर्षांपूर्वी पाहिलेलं जंगलं माणसाच्या दयेवर जिवंत होतं. ती दयाही नव्हती, ते जंगल विकलं जात नव्हतं म्हणून शिल्लक होतं. त्या जमिनीला "भाव' मिळेपर्यंत! तिथले प्राणी, पक्षी, किडे, झाडं, याचं जीवन म्हणजे माणसाच्या नशिबाची कृपा होती. आता ती संपली. माणसाला जमिनीचा चांगला भाव मिळू लागला. आता त्यांना जगण्याचा काय अधिकार? इथली सांबरं, भेकरं, साळींदरं, रानडुकरं, ससे, उदमांजरं, कुठे गेली असतील? ही जागा त्यांच्या "मालकी'ची नव्हती. त्यांना दाद मागायला कुठलंच न्यायालय नव्हतं. मरून गेली असतील बाराच्या भावात....

रात्री काजवे पहिले. आपल्याच नादात ते चमकत होते. जंगलं असतील तर काजवे असतील. पण जंगल तर माणसाचं आहे. ते तो कधीही तोडू शकतो. काजवे कधीही बेघर होऊ शकतात. संपू शकतात. पण काजव्यांना समजतच नव्हतं. आपल्याच नादात ते चमकत होते. माद्यांना साद घालत होते. ठार अंधारात काजवे सुंदर दिसतात. पण आता मुळशीतला दिव्यांचा प्रकाश टाळून त्यांना पाहावं लागतं. प्रखर दिव्यांपुढे त्यांची चमक आता मंद वाटते.

आता तर हा हायवे होणार आहे. सगळीकडे लखलखाट होणार आहे. जमिनीचा इंचनइंच विकला जाणार आहे. धनदांडगे सगळी जंगलं विकून, खाऊन टाकणार आहेत. "विकास' होणार आहे!

(लेखक प्रसिद्ध पर्यावरण व वन्यजीव अभ्यासक आहेत)

Web Title: Article regarding Tamhini and Development