#MokaleVha बोल ना हलके हलके...

marriage
marriage

प्रसंग पहिला
‘सुजय, अरे चल ना नाष्टा करायला’, गौरवने आवाज दिला. ‘नाही, नको. तुम्ही जाऊन या.’ सुजय म्हणाला.
गौरव त्याच्या मित्रांसोबत चहा-नाष्टा करून सुजयसाठी पार्सल चहा-नाष्टा घेऊन आला आणि म्हणाला, ‘आय नो यार! बाबांच्या ट्रीटमेंटसाठी खूप पैसा गेला, आई कसेतरी भागवतेय. पण उपाशी राहून काय होणार? खा आणि मस्त अभ्यास कर. आई-बाबांचा आधार बनायचंय ना? कीप स्मायली लाईक मी.’

प्रसंग दुसरा 
‘श्रेया तू गप्प का आहेस गं? कर ना अभ्यास.’
पुस्तक उघडून श्रेया मुसमुसत रडायला लागली. खुशी पुन्हा म्हणाली, ‘काय झालं गं? रडतेस का? तुला काही त्रास होतो आहे का?’
डोळे पुसत श्रेयाने सांगितले, ‘मी ‘ताई-जिजूं’च्या घरी राहते. आई-बाबांनी विश्वासाने ठेवलंय मला त्यांच्याकडे पण काल रात्री त्यांचा भाऊ आलेला, त्याने हात लावायचा प्रयत्न केला गं. मी काय करू?’

असे कित्येक सुजय आणि श्रेया या शिक्षणासाठी शहरात येताना दिसतात. कधी त्यांच्या मानसिकतेचा विचार व्हावा, असे समाजाला वाटत नाही का?आणि कितपत? मुले शिक्षणासाठी बाहेर राहतात तेव्हा भलीमोठी फी भरून पालकांचे कर्तव्य संपते का? अंगभर वस्त्रे, शैक्षणिक साहित्य, राहण्याची सुरक्षित सोय, येण्या-जाण्याची सोय एवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या व पुरेशा आहेत का? आपले मूळ कोणत्या कुटुंबातून, संस्कारांतून आले आहे; त्याची संगत कशी व कोणाशी आहे, हे पाहणे पालकांचे आद्य कर्तव्य असावे.
वेळोवेळी अभ्यास कसा चालू आहे व जेवण केलेस का? हे फोनवरून विचारले जाते. पण, कधी स्वतः येऊन मुलांशी मनमोकळा संवाद साधावा, याचाही विचार व्हावा.

शहरातील वातावरणाशी जुळवून घेताना बरेच जण बुजतात. त्यांच्यामध्ये न्यूनगंड येऊच नये म्हणून काळजी घ्यावी. मुले मोहाच्या दुनियेत भरकटतात, त्या वेळी पालकांनी वेळीच सावध भूमिका घ्यावी. आपण आपली जमा पुंजी किंवा स्थावर मालमत्ता गहाण ठेवून किंवा विकून शिक्षणासाठी पैसा उभा करतो, याची जाणीव मुलांना द्यावी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घरातून संस्कारच मूळ चांगले असतील, तर मुले भरकटत नाहीत.

कुसंगतीची लागण त्यांना होतच नाही. इतरांच्या संगतीने हुशार, शांत किंवा बुजऱ्या मुलांना त्रास होतो. त्याची आपण स्वतः काळजी घ्यावी व वेळ आल्यास शिक्षकांची मदत घ्यावी. मुले गावी सुट्टीला आल्यानंतर त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधावा. अडचणी विचाराव्यात. मित्रत्वाच्या नात्याने वागणूक द्यावी. आपल्या कष्टाचे पाढे त्यांच्यापुढे सतत गाऊ नयेत.

वयातील होणारे बदल लक्षात घ्यावेत, हार्मोन्स बदलामुळे मुले चिडचिडी, रागीट किंवा अतिशय शांत होतात. ह्या बदलांना वेळीच आवर घातला नाही तर हाच बदल आयुष्यभर अंगीकारला जाऊ शकतो. मुलांना जवळ घेऊन मित्र-मैत्रिणींसोबत कशा पद्धतीने वागणे असावे, या गोष्टी सोदाहरण सांगावे अथवा स्पष्टपणे बोलून वेळ आली; तर प्रत्यक्ष समाजातील वास्तव दाखवावे. मुलांच्या मानसिक बदलांचा स्वीकार आधी पालकांनी समजून घ्यावा. आपल्या पाल्याच्या वागण्याचा इतरांना त्रास होत असेल तर वेळीच प्रबंध व उपाय करावेत. आपल्या मुलांचे संस्कार हेच आपल्या कुटुंबाची समाजातील प्रतिमा असते. सावध आणि जागरूक पालकत्व उद्याची उज्ज्वल, सुसंस्कृत, सुशिक्षित पिढी घडविते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com