
दहावीमध्ये इंग्रजी आणि गणित यात एकेकाळी पोरं धापाधाप पडायची. आता म्हणे परीक्षारुपी तलावाऐवजी काठावरच चाचण्या होतात, त्यामुळं कोणी गटांगळ्या खायचा प्रश्नच येत नाही. आधी काठावर पास झाल्याचा आनंद असायचा, आता सगळे काठावरच उभं राहून आपोआप पास होतात, असं ऐकलंय. मला परीक्षांचं फार कौतुक नाही, उलट आमच्यावेळी दोन परीक्षा कमी असत्या तर चार पुस्तकं जास्त वाचू शकलो असतो, याचं दुःख आहे.
दहावीमध्ये इंग्रजी आणि गणित यात एकेकाळी पोरं धापाधाप पडायची. आता म्हणे परीक्षारुपी तलावाऐवजी काठावरच चाचण्या होतात, त्यामुळं कोणी गटांगळ्या खायचा प्रश्नच येत नाही. आधी काठावर पास झाल्याचा आनंद असायचा, आता सगळे काठावरच उभं राहून आपोआप पास होतात, असं ऐकलंय. मला परीक्षांचं फार कौतुक नाही, उलट आमच्यावेळी दोन परीक्षा कमी असत्या तर चार पुस्तकं जास्त वाचू शकलो असतो, याचं दुःख आहे. इंग्रजी आणि गणिताबरोबर गट्टी जमली, तरी ती पेपर पुरतीच मर्यादित राहते. रोजच्या जीवनात त्याचा वापर करणं म्हणजे विषयच वेगळा. कारण तिथं मराठी, इंग्रजी आणि गणित एकाच वेळी, एकाच ओळीत येतात. आणि मग ‘वी कॅनॉट पुट टू अँड टू टूगेदर...’
वाढदिवसादिवशी अशीच पंचाईत होते. यादिवशी कोणीतरी बुजुर्ग आपल्याला ‘कितवा वाढदिवस आहे तुझा बाळ,’ असं विचारतात आणि गोंधळ सुरू होतो.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मी : आज माझा अडतीसावा वाढदिवस आहे, परंतु एकोतिसावा birthday.
बुजुर्ग : अरे, असं कसं? तुझं वय किती झालं आता?
मी : अडतीस वर्ष
बुजुर्ग : पूर्ण की complete की running?
आपल्याकडं हे अमुक वर्ष पूर्ण आणि अमुक प्लस एक वर्ष रनिंगचं खुळ कुठून आलं, मला माहीत नाही. तसंही आमच्या आधीच्या पिढ्या फार रनिंग करायच्या, असं नाही. अगदी ‘आम्ही बहात्तरच्या दुष्काळात खड्डे खणून अमेरिकन मयलोच पीठ खाऊन जगलो,’ म्हणणाऱ्या मंडळींनी सुद्धा सुबत्ता आल्यानंतर कधी रनिंग वगैरे केल्याचा काही पुरावा नाही. आपलं लहानपण खेड्यात गेल्यामुळं आयुष्यभर निरोगी आणि फिट राहू या भाबड्या समजुतीनं आमच्या आधीच्या पिढीनं मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग ओढवून घेतला आणि तो आम्हाला ‘वसिहत’ म्हणून दिला. असो, सांगायचा मुद्दा असा की रनिंगचा आणि आपला फारसा संबंध नाही.
इंग्रजी म्हणजे ‘वाघिणीचं दूध’ असं चिपळूणकर म्हणाले होते. मात्र, गणित कच्चं असल्यामुळं एका आकड्यापेक्षा वाघांची संख्या जास्त झाल्यावर ती मोजता येणार नाही, म्हणून त्यांची नसबंदी करायचा प्रस्ताव आम्ही मांडला होता. वाढदिवस आणि कितवा वाढदिवस दोन्ही एकाच वाक्यात आल्यामुळं आपल्या आकड्यांचा घोळ होतो. कारण बर्थ डे म्हणजे जन्मदिवस. तो पहिल्यांदा वयाच्या पहिल्याच दिवशी येतो. एका वर्षानं दुसरा जन्मदिवस, बर्थ डे येतो, पण वाढदिवस पहिलाच असतो.
या गोंधळात आपलं वय लपवण्याची काही लोकांना खोड असते. विशीत आणि तिशीत आपल्याला गांभीर्यानं घेतलं जावं म्हणून वय जास्त सांगणं, चाळीशीत आणि पन्नाशीत नव्या पिढीनं ‘अंकल’ म्हणू नये म्हणून कमी सांगणं, यामुळं साठीत आपल्याला आपलंच वय किती आहे हे आठवत नाही. आणि सत्तरीत काहीच आठवत नाही. यामुळं आज मी अमुक अमुक वयाचा आहे, असं ठामपणे, प्रामाणिकपणे आणि अचूकपणे म्हणायचा योग क्वचितच येतो.
आणि हो! हे लोकांच्या चुका काढण्यासाठी नाही लिहिलं. म्हणजे तशी आम्हला सवय आहे, नाही असं नाही. पण उद्या हा नेमका आपला कितवा स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य मिळवून किती वर्षं झाली, यात आपला फार वेळ जाऊ नये, आणि तो वेळ आपण मराठी, इंग्रजी आणि गणिताची ट्रिग्नॉमेट्री सोडविण्यात घालविण्यापेक्षा इतिहास वाचण्यात घालवावा म्हणून हा सगळा खटाटोप.
आपला उद्या ७४ वा स्वातंत्र्य दिन आहे आणि आज मध्यरात्री भारत स्वतंत्र होऊन ७३ वर्ष होतील. खूप खूप शुभेच्छा. जय हिंद!
Edited By - Prashant Patil