कोलेस्टेरॉल समज-गैरसमज...

colesterol
colesterol

आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ
गेल्या दोनतीन वर्षांपासून आम्हाला सोशल मीडियामध्ये कोलेस्टेरॉलविषयी काही धोकादायक माहिती दिसतेय. उदाहरणार्थ ‘कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगामध्ये कोणताही दुवा नाही,’ ‘कोलेस्टेरॉल - तथ्ये आणि डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्याविषयी वाचा,’ ‘उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयरोग होत नाही’. इंटरनेटवर चुकीच्या माहिती देणाऱ्या साइट्सचा पूर आला आहे. त्या रुग्णांना चुकीच्या दिशेने नेत असतात. त्यातून सामान्य माणसाची  दिशाभूल होतेय. आपण यात काही शास्त्रीय तथ्ये आहेत का ते पाहू. आम्ही डॉक्टर ‘एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन’ म्हणजेच शास्त्रीय पुराव्याचे पालन करतो. यामध्ये वैद्यकीय पाठ्यपुस्तके, शास्त्रीय चाचण्या, आंतरराष्ट्रीय शोधनिबंध व आंतरराष्ट्रीय हृदयविषयक संस्थांच्या नियमावली (गाइडलाइन्स) समाविष्ट असतात. हे डॉक्टरांचे वैद्यकीय शिक्षण सुरू ठेवण्याचे स्रोत आहेत. ते सोशल मीडियासारखे अनियंत्रित नाहीत. कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला हा वरील गोष्टींवर आधारित असतो, सोशल मीडिया अथवा इंटरनेटवर नाही.
आपण कोलेस्टेरॉलविषयक काही मूलभूत गोष्टी जाणून घेऊयात.

कोलेस्टेरॉल म्हणजे काय? ते काय करते?
कोलेस्टेरॉल म्हणजे रक्तातील चरबीचे प्रमाण. कोलेस्टेरॉल हे प्राथमिकरीत्या वाईट अथवा धोकादायक नाही. योग्य प्रमाणात ते शरीरातील विविध प्रक्रियांसाठी आवश्यक आहे. उदा. स्मरणशक्ती, पेशींची वाढ इत्यादींसाठी कोलेस्टेरॉलची शरीराला गरज असते. परंतु शरीरामध्ये अधिक प्रमाणात कोलेस्टेरॉलचा संचय झाल्यास ते हृदयासाठी हानिकारक असते. 
कोलेस्टेरॉल दोन स्रोतांमधून येते. आपले यकृत आपल्याला आवश्यक असलेले कोलेस्टेरॉल बनवते. शरीराला उर्वरित प्राणिजन्य पदार्थांमधून कोलेस्टरॉल मिळते. उदाहरणार्थ- मांस, पोल्ट्री आणि फुल-फॅट डेअरी उत्पादनांमध्ये कोलेस्टरॉल असते. त्याला आहारातील कोलेस्टेरॉल म्हणतात.

कोलेस्टेरॉलचे काही प्रकार :
 १)    एलडीएल कोलेस्टेरॉल : यालाच वाईट अथवा धोकादायक कोलेस्टेरॉल म्हणतात. हे कोलेस्टेरॉल यकृतामधून चरबी कोरोनरी आर्टरीच्या भिंतीमध्ये  नेऊन अथेरोस्क्लेरॉसीस निर्माण करतात. अधिक प्रमाणात एलडीएल कोलेस्टेरॉल हे अथेरोस्क्लेरॉसीसला ठिसूळ बनवते (व्हल्नरेबल प्लाक) आणि रक्ताची गुठळी होऊन हदयविकाराची शक्यता कित्येक पटीने वाढविते. थोडक्यात, एलडीएल कोलेस्टेरॉलची मात्र जास्त तेवढा हृदयविकाराचा धोका असतो.  

२)    एचडीएल कोलेस्टेरॉल : हे चांगले अथवा उपयुक्त कोलेस्टेरॉल आहे. याचे काम म्हणजे कोलेस्टरॉल अथेरोस्क्लेरॉसीस प्लाकमधून काढून घेऊन लिव्हरद्वारे त्याचे विघटन करणे. थोडक्यात एचडीएल कोलेस्टेरॉल हे रक्तातील कोलेस्टेरॉलची मात्रा कमी करण्यास मदत करते. यालाच ‘रिव्हर्स ट्रान्सपोर्ट’ असेही म्हणतात. एचडीएल कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी हृदयविकाराची संरक्षक असते. काही औषधे आणि आहार घटक हे पातळी वाढवण्यास मदत करतात. नियासिन हे जीवनसत्त्व, मासे, ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स , नियमित व्यायाम,  काही प्रकारची तेले एचडीएल कोलेस्टेरॉल वाढविण्यास मदत करतात. धूम्रपान थांबवणेही गरजेचे आहे.

३)    ट्रायग्लिसरायड्स -  हा आपल्या रक्तातील चरबीचा प्रकार आहे. आपले शरीर त्यांना ऊर्जेसाठी वापरते. चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला काही ट्रायग्लिसराइड्सची आवश्यकता आहे. परंतु उच्च ट्रायग्लिसरायड्समुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. ते मेटाबोलिक सिंड्रोमचे चिन्ह असू शकते. मेटाबोलिक सिंड्रोम हा उच्च रक्तदाब, उच्च रक्त शर्करा, कंबरेमध्ये खूप जास्त चरबी, कमी एचडीएल  कोलेस्टरॉल आणि उच्च ट्रायग्लिसरायड्स यांचे मिश्रण आहे. मेटाबॉलिक सिंड्रोममुळे हृदयरोग, मधुमेह आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. टाइप २ मधुमेहामध्ये ट्रायग्लिसरायड्सचे प्रमाण वाढलेले असते. 

    लठ्ठपणा, अनियंत्रित मधुमेह, हाइपोथायरॉईडझम, किडनी रोग, आहारात नियमितपणे अधिक उष्मांक घेणे, अधिक मद्यपान करणे या कारणांमुळे ट्रायग्लिसरायड्सची पातळी वाढते. ट्रायग्लिसरायड्सचे प्रमाण अतिउच्च झाल्यास स्वादुपिंडाला सूज (पॅनक्रियाटायटिस) येऊ शकते. ती धोकादायक असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com