लोक काय विचार करतात, हे विसरा! (सद्‌गुरू)

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

इनर इंजिनिअरिंग

प्रश्न : नमस्कार सद्‌गुरू! माझ्याबद्दल दुसरे काय विचार करतात, हे मी खूप गांभीर्याने घेते. यातून बाहेर पडायचा मार्ग कोणता?

सद्‌गुरू : सर्वप्रथम तुमच्या मागे काय घडत आहे, हे खरंच तुम्हाला माहीत आहे का? की काय घडत असावं, ही तुमची निव्वळ एक कल्पना आहे? कल्पनांच्या कुशीत गुरफटू नका. कोणी तुमचा विचार करत असल्यास ती त्यांची समस्या आहे, तुमची नाही. त्यांचे विचार हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना वाटेल तो विचार करू द्या. तुम्हाला असं वाटतं का की, तुम्ही एवढे विलोभनीय, आकर्षक आहात की, सर्वजण नेहमी तुमचाच विचार करत बसतात? आणि कोणी तुमच्याबद्दल विचार करत नसल्यास तुमच्यासाठी भलीमोठी मोकळीक. त्यांना काय वाटत असेल याचा विचार तुम्ही का करता? त्याची गरज नाही. तुम्हाला काय करायचं आहे, यावरच लक्ष केंद्रित करा. दुसऱ्यांना काय करायचं आहे, ते त्यांना ठरवू द्या. कदाचित त्यांच्याकडं विचार करण्यासारखं अजून काही चांगलं नसेल, म्हणून ते तुमच्याबद्दल चिंतन करतात. कोणीतरी नेहमी आपल्याबद्दल विचार करत आहे, असं वाटणं हा फक्त तुमच्या मनाचा आभास आहे.

बहुतेक लोक आपापल्या चिंतेत गर्क आहेत. तुम्ही त्यांच्या ध्यानीमनीही नसता आणि ते बरं आहे. कोणी आपल्याबद्दल विचार करत आहे का, याने काही फरक पडत नाही. इतर लोकांची काळजी करू नका. ते काय विचार करतात याबद्दल तुम्ही काही करू शकत नाही. मग त्रास का करून घ्यायचा?

त्यांचे मानसिक व्याप त्यांच्याकडंच असू द्या. तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना हवा तेवढा व्यर्थ विचार ते करू शकतात. त्यामुळं तुमच्या अस्तित्वावर परिणाम का व्हावा? जर तुम्हाला वाटतं की तुम्ही ठीक आहात, मग चांगलं आहे. इतरांना तुम्ही ठीक वाटत नसल्यास ती त्यांची समस्या आहे. इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील, या विवंचनेत असल्यास तुम्ही आयुष्यात काही साध्य करू शकणार नाही. तुम्हाला जे करावंसं वाटतं त्या गोष्टींसाठी सर्वांकडून मान्यता कधीच मिळणार नाही. म्हणून, अशा गोष्टीची चिंता करू नका. तुम्हाला काय करावंसं वाटतं याकडं लक्ष पुरवा.

Web Title: Article by Sadguru in All is well supplement of Sakal Pune Today