आम्ही जिजाऊच्या पोरी आम्ही सावित्रीच्या लेकी!!!

विद्या बनाफर
गुरुवार, 3 जानेवारी 2019

3 जानेवारी आणि 12 जानेवारी आमच्या हृदयातल्या दिनदर्शिकेतील दिवाळीच. कारण स्त्री जन्माच्या इतिहासातील नवे पर्व या दिवशी सुरू झालेले.

माय सावित्री चा जन्म झाला सुकाळ आम्हाला
अन जिजाऊने वसा जन्मोजन्मीचा हो दिला
दिला नवा श्वास त्यांनी अन आभाळ ही नवं,
खऱ्या स्वातंत्र्याचे बघा आम्ही ठरलो वारस

3 जानेवारी आणि 12 जानेवारी आमच्या हृदयातल्या दिनदर्शिकेतील दिवाळीच. कारण स्त्री जन्माच्या इतिहासातील नवे पर्व या दिवशी सुरू झालेले.

संपूर्ण रात्र गेली खुलला पहाटवारा....
मनाच्या सुकलेल्या देठाना हिरवे पण मिळाले... आणि तिमिराच्या केसात कोणी किरणांची मोरपिसे खोवली... चित्रातल्या चौकटीतली स्त्री चौकटीबाहेर निघाली... उंबरठ्याबाहेरचे आकाश तिने बघितले ते फक्त सावित्री-जिजाऊ मुळे.

उन्हाला कोंब फुटत होती, तिचे दुःख काळ कोठडीच्या अंधारात गर्भार होत होतं, दुःखातुन दुख प्रसवित  होतं... दिवसागणिक वाढत होतं, वर्षानुवर्षापासून.आणि एक क्रांतीची ज्योत अंधाराच्या साम्राज्यावर मात करीत आली आणि भयाण अंधाराच्या समुद्रावर एक छोटीशी पणती ही राज्य करू शकते हे तिने समाजाला दाखवून दिले. सावित्रीने प्रवाहाविरुद्ध वाहून जिंकून दाखविले... पण अजून लढाई संपलेली नाही .सावित्रीच्या या वाटेत या समाजाने विखुरलेले, पसरविलेले काटे अद्याप आहेतच. अजून ती लढत आहे. अनेक रूपात सावित्रीने दिलेली हिम्मत,शक्तिशाली विचार, जिजाऊच्या लखलखत्या तलवारी च्या पात्यासारख्या  मुली व महिला लढत आहेत .जुन्या चालीरीती रूढी-परंपरांचे माजलेले तण अमर्याद आहे. त्यामुळे ती अविरत लढत आहे व मार्गक्रमण करीत आहे .जिजाऊ सावित्रीच्या विचारांचा गारवा डोक्यात घेऊन शांतपणे सांगत आहेत ....बाबांनो उगाच माझ्या वाटेला जाऊ नका ,उगाच होईल तुमची शोभा.. ती आता रडत नाही, चिंब भिजते रिमझिम पावसात ....सूर्य मिळाला नाही म्हणून काजव्यांना नाकारत नाही... संघर्षातही परिघाला छेदून जाण्याची हिंमत ठेवते... हसऱ्या दुःखाची सुंदर गाणी बनविते... गुणगुणते ...पिंपळपाषाणागत हटकून उगवते .. एक एक क्षण आनंदाने जगते.

सावित्रीच्या पुण्याईने, जिजाऊचा आदर्शावर, तत्वांवर स्वतःला नव्याने उभारते. सावित्रीची जिद्द, जिजाऊची चिकाटी, निर्भयता, मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व एकाच ठिकाणी कसे वसते याचे चिंतन करत ती घेते आकाशातून भरारी नवीन नक्षी कोरते आभाळात तिच्या नावाची कल्पना चावला बनून. जिंकून घेते उच्च पद पुरुष प्रधान संस्कृतीचा झेंडा मिरविणाऱ्या जगात प्रतिभा पाटील बनून. कारण ती असते जिजाऊची लेक आणि सावित्रीची मुलगी. जन्मोजन्मी पुरेल एवढी शिदोरी दिली त्यांनी आम्हाला. तरी ज्या महिला अजूनही दबकत आहेत एक पाऊल पुढे टाकण्याला, घाबरत आहेत उंबरठा ओलांडण्यास, धजत नाहीत शहरात व ग्रामीण भागात. त्यांच्यातील आत्मविश्वास जागवायला सक्षम महिलांनी पुढे यायला हवं त्यांना हात देऊन त्यांच्यातील अस्मिता जागवायला हवी.

सावित्रीचे ऋण फेडायचे तिच्या श्वासांचे उपकार फेडायचेत. तिचे सगळे श्वास आपल्यासाठीच .होते स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून तिने घर सोडले, कुटुंब सोडले, हाल सोसले, समाजाचा विरोध पत्करून एका विधवेचा यशवंत दत्तक घेऊन त्याला पालकत्व दिले. तिचा त्याग केवळ त्याग होता ज्योतिबा व सावित्री हे कर्मठ सुधारक होते फक्त भाषणा, लेखनातून उपदेश करणारे नव्हते .हजार शब्दांपेक्षा एक कृती श्रेष्ठ असते हे त्यांनी जगण्यातून सिद्ध केले. जिजाऊ एक आदर्श माता, आदर्श नेता याचे ऐतिहासिक उदाहरण आहे लढाई सुरूच आहे अजूनही. आपला कुणाचा तरी मुलगा रस्त्याने मुलीची छेड काढतो, सामूहिक बलात्कार होतात परस्त्री मातेसमान मानणाऱ्या शिवरायाच्या, जिजाऊंच्या महाराष्ट्रात कलंकित करणार्‍या या घटनांना ऊत आला आहे. मग कोरडी भाषणे केल्यापेक्षा कृती करण्याची वेळ आली आहे. सख्यांनो अंगात संचारु द्या, सावित्री घुमू द्या सर्वशक्ति निशी. तुटुन पडा या बलात्काऱ्यांवर सावित्री पडली होती तशी. वादळागत. तरच तुम्ही सावित्रीच्या लेकी... 

बीजा मधले हिरवे पण मी जपेन म्हणते
आज उद्या या खडकावरती रुजेन म्हणते
लाख दिवे माझ्या ज्योतीने पेटून उठले
तुफानास मी पुरून आता उरेन म्हणते
सावित्री व जिजाऊ यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतींना सूर्याच्या सहस्त्र किरणांनी ओवाळले तरी हे ऋण फीटणार नाहीत...

Web Title: Article on Savitribai Phule on Birth Anniversary