काँग्रेसी विचारांनीच काँग्रेसवर मात

शेखर गुप्ता, ज्येष्ठ पत्रकार
रविवार, 30 जून 2019

बुद्धीपेक्षा जिगर हवी
सध्या क्रिकेटचा मोसम असल्यामुळे असदुद्दीन ओवेसी यांनी व्हिव रिचर्डस्‌शी मोदींची तुलना केल्याचे उदाहरण येथे देण्याचा मोह होत आहे. गोलंदाजांकडे तुच्छतेने बघणाऱ्या रिचर्डस्‌ यांच्या तोऱ्यात मोदी यांनी संसदेत प्रवेश केला आहे. परंतु, इंग्लंडने रिचर्डस्‌ यांना रोखण्याचा चांगला उपाय शोधून काढला होता. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या रिचर्डस्‌ यांच्यासाठी बचावात्मक क्षेत्ररक्षण लावून त्यांचे फटके सीमारेषेवर अडविण्याचा ‘प्लॅन’ इंग्लंडने आखला. जोरदार फटक्‍यांवर धावा होत नसल्याने कंटाळा येत मग ते स्वतः चुकीचा फटका मारून बाद व्हायचे. न संपणारा संयम, स्वतःची शक्ती राखून ठेवणे तसेच विरोधकाने चूक करण्याच्या संधीचा शोध घेणे, हा विचारसुद्धा व्यूहरचनेचा भाग असू शकतो. पण, त्यासाठी बुद्धीपेक्षा जिगर आणि पोटात आग असणे अधिक गरजेचे आहे.

नरेंद्र मोदी हे एक अजेय नेते आहेत, यावर सर्वांचे एकमत आहे. गरिबांशी जवळीक आणि दुर्बल विरोधक, यामुळे त्यांचे स्थान अधिकच बळकट वाटत आहे.

कल्याणकारी योजना, राष्ट्रीय सुरक्षेचा ध्यास आणि बलाढ्य व्यक्तिपूजेचे स्तोम, यावर आधारित काँग्रेसच्या खेळात मोदी यांनी त्यांचा पराभव केला असल्याचा मोदीनिष्ठांचा विश्‍वास आहे. अगदी क्रिकेट संघाच्या पोशाखाच्या रंगावरूनही वाद घालण्याच्या ध्रुवीकरणाच्या वातावरणात मोदीनिष्ठ आणि त्यांचे विरोधक एका मतावर मात्र ठाम आहेत; ते म्हणजे ‘सध्या आणि नजीकच्या भविष्यात मोदी हे अजेय आहेत.’

राष्ट्रवादी उजव्यांना संधी
प्रथम मोदीनिष्ठांचे म्हणणे पाहूया..! येत्या २५ वर्षांत कुणी धक्का लावू शकणार नाही एवढी सत्तेवर जबरदस्त पकड असल्याचे मोदीनिष्ठांना वाटते. १९७७ आणि १९७९ चा अपवाद वगळता १९५२ ते १९८९ पर्यंत काँग्रेसची ज्याप्रमाणे सत्तेवर एकहाती पकड होती; तशीच स्थिती आता असल्याचे त्यांना वाटते. स्वातंत्र्यानंतर धर्मनिरपेक्ष डाव्यांनी ज्याप्रमाणे या देशाची घडण केली; त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादी उजव्यांना तशी संधी मिळणे, हे एकप्रकारे योग्यच असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. जुनाट सामाजिक-राजकीय सूत्राचा विचार ठिसूळ असल्याचे त्यांनी गेल्या पाच वर्षांत दाखवून दिले. समतावाद आणि कल्याणाचा जुना मध्य-डावा विचार अधिक प्रभावीपणे मांडून त्याचा लाभ गरिबांपर्यंत पोचविताना त्याचे मतांमध्ये परिवर्तन करणे किती सोपे आहे, हेही मागील पाच वर्षांमध्ये दिसून आले. विचारवंत आणि बुद्धिवाद्यांच्या गटांची विचारसरणी तसेच तत्त्वज्ञानाचा रंग बदलण्याची योजना चांगल्या गतीने पुढे जात आहे.

हिंदुराष्ट्रात रूपांतर
दुसऱ्यांदा बहुमत मिळाल्यामुळे २०२५ मध्ये मोदी यांचा तिसरा कार्यकाळ सुरू होण्याच्या आधीपर्यंत विचारसरणीशी संबंधित उद्दिष्टांची पूर्तता आरामात केली जाऊ शकेल, असे मोदीनिष्ठांना वाटते. येत्या सहा वर्षांत भारताला हिंदुराष्ट्राच्या संकल्पनेत रूपांतरित केले जाऊ शकते. भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून हे सारे शक्‍य आहे, असाही त्यांना विश्‍वास आहे. २०२५ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे शंभरावे वर्षही आहे.

जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच मोदी यांनीही या देशातील गरिबांशी एक सामाजिक बंध जोडला आहे. हिंदू राष्ट्रीयत्व नव्हे, तर काँग्रेसच्याच विचारांचा आधार घेत मोदी यांनी काँग्रेसला चीत केले असल्याचे त्यांना वाटते. गरिबांसाठी कल्याणकारी विचार, राष्ट्रीय सुरक्षेचा ध्यास आणि दणकट व्यक्तिपूजेचे स्तोम, या काँग्रेसच्याच हुकमी विचारांचा वापर मोदी यांनी खुबीने केल्याचा तर्क यासाठी दिला जातो. गरिबांशी सामाजिक बंध जोडण्याच्या कृतीमुळेच मोदी हे आजच्या घडीला अजेय नेते असल्याचे निष्ठावंतांचे म्हणणे आहे.

भांबावलेले विरोधक
सर्वोत्तम सैन्यही एखादे युद्ध हरू शकते. पण, सर्वोत्तम सैन्याची खरी परीक्षा होते ती शिस्तबद्ध माघार आणि मोठ्या विजयात. काँग्रेसच्या नेतृत्वातील विरोधी आघाडीची शकले पडणे सुरू झाले असून आत्मघाताच्या मार्गावर तिची पीछेहाट सुरू आहे. निवडणुकीतील पराभवाचा राग विरोधी पक्ष जणू भारतीय मतदारांवर काढत आहे. ‘मोदी जिंकले असले, तरीही भारताचा पराभव झाला आहे,’ असे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या या वक्तव्याचा उल्लेख संसदेत करून पंतप्रधानांनी त्यांना चांगलेच टोमणे मारले. काँग्रेसचे साथीदार आणि अन्य पक्षांमध्ये तर बरेच बरे आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. देवेगौडा यांनी बेरोजगारांना उद्देशून केलेल्या विधानाचे देता येईल. ‘तुम्ही मोदींना मत दिले. आता त्यांनाच रोजगाराचे विचारा,’ असे ते म्हणाले होते. ‘बसप’च्या प्रमुखांनी तर पराभवासाठी थेट मित्रपक्षाचे नेते अखिलेश यादव यांनाच जबाबदार धरले.

मायावती आणि त्यांच्या पाठोपाठ ममता बॅनर्जी या प्रचंड बावचळल्या आहेत. भाजपच्या विरोधात आघाडी उघडण्यासाठी काँग्रेस आणि डाव्यांनी आपल्यासोबत यावे, अशी ममतांनी केलेली सूचना नैतिकदृष्ट्या दिवाळखोरीची आणि राजकीयदृष्ट्या मूर्खपणाची आहे. आगामी विधानसभा निवडणूक त्यांनी जणू आधीच हरलेली आहे. डाव्यांव्यतिरिक्त नवीन पटनाईक, जगन मोहन रेड्डी, केसीआर आणि एम. के. स्टॅलीन हे तर खिजगणतीतही नाहीत. मोदी हे अजेय असल्याच्या काँग्रेसच्या विचाराशी सहमत व्हावे अशीच एकूण परिस्थिती आहे. पण, देशातील मतदारांना हुकूमशहा हवा असेल, तर तुम्ही काय करू शकता?

राजीव गांधी यांच्या कार्यकाळानंतर पक्षाच्या मोठ्या पराभवासाठी सर्वसामान्य जनतेला जबाबदार धरण्याची काँग्रेसची भूमिका राहिली आहे. पराभवासाठी हा पक्ष मतदारांचा एवढा तिटकारा करतो, की त्यांच्यात जाऊन पक्षाला मते का दिली नाहीत, हे जाणून घेत नाही. राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी यासंदर्भात एक धक्कादायक खुलासा केला आहे. एखाद्या राज्यात काँग्रेसच्या मतांचा टक्का २० खाली घसरला, की तेथे हा पक्ष पुन्हा उभा राहू शकत नाही. मतदारांच्या ‘मूर्खपणा’वर हा पक्ष संतापून तुम्ही आमच्या पात्रतेचे नाहीत आणि तुमच्यासारख्या कृतघ्न लोकांची आम्हाला गरज नाही, असे म्हणतो. गांधी घराण्याशी निष्ठावान असलेल्या अमेठी या मतदारसंघाला राहुल गांधी यांनी पराभवानंतर भेट दिली नाही, हे पक्षाच्या वर उल्लेख केलेल्या मानसिकतेचे उत्तम उदाहरण ठरावे.

राजकारणाचा चक्राकार प्रवास
जर मोदीनिष्ठ आणि विरोधकांना ते अजेय आहेत, असे वाटत असेल; तर पहिले बळी आमच्यासारखे राजकीय भाष्यकार ठरतील. दोन्ही गटांनी हे मान्य केले, तर टिप्पणी करण्यासाठी मुद्दाच शिल्लक राहत नाही. परंतु, वस्तुस्थिती अशी आहे, की राजकारण फार काळ गोठलेले, थिजलेले राहू शकत नाही. राजकारणाचा प्रवास चक्राकार असतो आणि कधी कधी हे चाक फिरण्यास फार वेळ लागतो. जसे नेहरू-गांधी घराण्याच्या राजवटीत झाले. विजय वा पराभव फार लवकर घोषित केला आहे, अशांच्या स्वयंघाताच्या उदाहरणांनी लोकशाहीचा इतिहास भारलेला आहे. पण, काही असेही असतात, की असे धक्के पचवून संयमाने पुन्हा उभे राहतात.

आणीबाणीनंतरचा इंदिरा गांधी यांचा काँग्रेस पक्ष आणि अडवानी-वाजपेयी यांचा भाजप, अशी दोन उदाहरणे यासाठी देता येतील. इंदिरा गांधी यांनी अडीच वर्षांत पक्ष पुन्हा उभा केला. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर जनता सरकार कमजोर असल्याचे दिसून आले आणि या मुद्द्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांनी यश मिळविले. ८० च्या दशकात वाजपेयी आणि अडवानी यांनी आपल्या पराभूत सैन्यासह शिस्तबद्ध माघार घेत भारतीय जनता पक्ष हा नवा पक्ष स्थापन केला. १९८४ नंतर पुढील तीन वर्षांच्या काळात संपूर्ण धूळधाण झालेल्या विरोधी पक्षाने राजीव गांधी यांची पार वाट लावली. यासाठी राजीव गांधी यांच्या चुका जरूर जबाबदार होत्या. परंतु, भाजपने संसद आणि बाहेर चमकदार कामगिरी केली. विरोधी पक्ष, काँग्रेसमधील असंतुष्ट, कार्यकर्ते आणि माध्यमांना हाताशी धरून बोफोर्स आणि अन्य गैरव्यवहार भाजपने बाहेर काढले.

तुम्हाला आवडो अथवा नाही. पण, मतदारांपुढे पर्याय उभा करण्यासाठी राम मंदिरासारख्या एका मोठ्या विचाराची गरज असते. भाजपला यासाठी ३५ वर्षे लागली खरी; पण आज हा पक्ष गतकाळातील काँग्रेसएवढा वर्चस्व राखणारा झाला आहे. मोदी यांच्याभोवती एका जगज्जेत्याप्रमाणे वलय असले, तरीही ते मनुष्यच आहेत, कुणी ‘अवतार’ नाहीत. २०१४ च्या विजयानंतर लगेचच केजरीवाल यांनी दिल्लीत त्यांचा ६७-३ असा पराभव केला होता. याचे प्रमुख कारण ‘आप’ हा एक नवा विचार होता.

(अनुवाद - किशोर जामकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Shekhar Gupta